माढा नगर पंचायतीच्या मूर्ती दान कक्षात जमा झाल्या पाचशे गणेशमूर्ती 

किरण चव्हाण
Tuesday, 1 September 2020

माढा नगर पंचायतीच्या नगराध्यक्षा ऍड. मीनल साठे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना गणेशमूर्ती विसर्जनासाठी माढा नगर पंचायतीकडे मूर्ती दान करण्याचे आवाहन केले होते. या उपक्रमाला माढेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, सुमारे पाचशे गणेशमूर्ती नगर पंचायतीच्या सहकारमहर्षी (कै.) गणपतराव साठे सभागृहातील मूर्ती दान कक्षात जमा झाल्याचे ऍड. साठे यांनी सांगितले. 

माढा (सोलापूर) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची एकत्र होणारी गर्दी टाळण्यासाठी तसेच नद्या, ओढे, विहिरीमध्ये होणारे प्रदूषण रोखण्यासाठी माढा नगर पंचायतीने मूर्ती दान करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत माढा शहरातील गणेशभक्तांनी घराघरातील शेकडो गणेशमूर्ती माढा नगरपंचायतीच्या मूर्ती दान कक्षात जमा केल्या आहेत. 

माढा नगर पंचायतीच्या नगराध्यक्षा ऍड. मीनल साठे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना गणेशमूर्ती विसर्जनासाठी माढा नगर पंचायतीकडे मूर्ती दान करण्याचे आवाहन केले होते. यासाठी नगर पंचायतीने प्रत्येक प्रभागात ध्वनिक्षेपकावरून आवाहन केले. तसेच प्रत्येक प्रभागात गणेशमूर्ती गोळा करण्यासाठी वाहनांची व्यवस्था केली होती. या उपक्रमाला माढेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, सुमारे पाचशे गणेशमूर्ती नगर पंचायतीच्या सहकारमहर्षी (कै.) गणपतराव साठे सभागृहातील मूर्ती दान कक्षात जमा झाल्याचे ऍड. साठे यांनी सांगितले. माढा नगर पंचायतीने धार्मिक विधीनुसार तयार केलेल्या कृत्रिम हौदामध्ये मूर्तींचे विसर्जन केले. 

नगर पंचायतीने माढ्यातील गणेशोत्सव मंडळांना एक गाव एक गणपती या उपक्रमासाठीही आवाहन केले होते. त्यालाही मंडळांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. त्यामुळे माढा शहरातील नागरिक, गणेशोत्सव मंडळांनी नगर पंचायतीच्या आवाहनाला प्रतिसाद दिल्याने यंदा माढ्यात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यात आला. या वेळी नगराध्यक्षा ऍड. मीनल साठे, मुख्याधिकारी चरण कोल्हे, माजी नगराध्यक्ष राहुल लंकेश्वर, सभापती कल्पना जगदाळे, नगरसेविका सुप्रिया बंडगर, शिवाजी जगदाळे नगर पंचायतीचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Anant Chaturdashi 2020 : Five hundred idols of Ganesha were collected in the idol donation room of Madha Nagar Panchayat