esakal | "लोकमान्य'च्या "श्रीं'चे जागेवरच विसर्जन; पाचजणांनी केला प्लाझ्मा दान 
sakal

बोलून बातमी शोधा

Lokmanya

लोकमान्य गणेशोत्सव मध्यवर्ती मंडळाचे अध्यक्ष प्रकाश ढवळे यांच्या हस्ते सायंकाळी गणरायाच्या निरोपाची पूजा होणार आहे. यावेळी मंडळाचे मार्गदर्शक श्रीकांत घाडगे यांच्यासह अन्य पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांना या भयावह आजारावर मात करता यावी या हेतूने या मंडळाच्या आवाहनानुसार पाच लोकांनी प्लाझ्मा दान केला आहे. 

"लोकमान्य'च्या "श्रीं'चे जागेवरच विसर्जन; पाचजणांनी केला प्लाझ्मा दान 

sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : कोरोनाच्या वैश्विक संकटामुळे यंदाचा गणेशोत्सव अतिशय साधेपणाने व नीटनेटका साजरा करण्यात आला. शहरातील लोकमान्य मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाने यंदा कोरोनाचे संकट दूर होण्यासाठी गणरायाला साकडे घातले. या मंडळातर्फे सायंकाळच्या सुमारास साधेपणाने जागेवरच गणेश मूर्तीचे विसर्जन केले जाणार आहे. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी केलेल्या आवाहनानुसार या मंडळाने पाच जणांकडून प्लाझ्मा घेतला आहे. 

लोकमान्य गणेशोत्सव मध्यवर्ती मंडळाचे अध्यक्ष प्रकाश ढवळे यांच्या हस्ते सायंकाळी गणरायाच्या निरोपाची पूजा होणार आहे. यावेळी मंडळाचे मार्गदर्शक श्रीकांत घाडगे यांच्यासह अन्य पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांना या भयावह आजारावर मात करता यावी या हेतूने या मंडळाच्या आवाहनानुसार पाच लोकांनी प्लाझ्मा दान केला आहे. आता तो प्लाझ्मा गरजू रुग्णांना दिला जाणार आहे, असेही घाडगे यांनी यावेळी सांगितले. 

महापौर व आयुक्तांनी गणरायाला घातले साकडे 
गणेश उत्सवावरील कोरोनाचे विघ्न लवकर हद्दपार करण्याची ताकद दे, सोलापूरकर सुखरूप राहू दे, असे महापौर श्रीकांचना यन्नम यांनी गणरायाला साकडे घालत गणरायाला निरोप दिला. आयुक्त पी. शिवशंकर यांनी नागरिकांना गर्दी न करता, शक्‍यतो मूर्तींचे घरीच विसर्जन करण्याचे आवाहन केले. 

नगरसेवकांची सामाजिक बांधिलकी 
कोरोनामुळे यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यात आला. या वेळी शहरातील सर्वच मध्यवर्ती मंडळांनी पोलिस व महापालिका प्रशासनाला मोठे सहकार्य केले. रक्तदान शिबिरे, मोफत आरोग्य शिबिरे घेतली. अँटीजेन टेस्टसाठी व प्लाझ्मा डोनेशनसाठीही आवाहन केले. दुसरीकडे विसर्जनासाठी गर्दी होऊ नये म्हणून नगरसेवक विनायक विटकर, माजी नगरसेवक जगदीश पाटील यांच्यासह काही नगरसेवकांनी घरोघरी जाऊन नागरिकांकडील गणेशमूर्तींच्या विसर्जनाची सोय उपलब्ध करून दिली. तर महापालिकेच्या वतीने शहरातील आठ प्रभागातील 110 ठिकाणी गणेशमूर्तींचे संकलन सुरू केले आहे. आरोग्य निरीक्षक, झोन अधिकारी, सफाई कर्मचारी यांची त्या ठिकाणी नेमणूक करण्यात आली आहे. सकाळपासून संकलित मूर्तींचे विसर्जन तुळजापूर रोडवरील खाणीतील पाण्यात करण्यात येत आहे. त्या वेळी त्या ठिकाणी विधिवत पूजा केली जात आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल