कुर्डुवाडीमध्ये गणपती विसर्जनासाठी नगरपालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद 

विजयकुमार कन्हेरे 
Tuesday, 1 September 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेच्या वतीने नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी गणेश मूर्तींचे विसर्जन न करण्याबाबत आवाहन करण्यात आले होते. नगरपालिकेच्या वतीने बालोद्यानाजवळ व नगरपालिका कार्यालय या ठिकाणी मूर्ती स्वीकारण्याची सुविधा उपलब्ध केली होती.

कुर्डुवाडी (सोलापूर) : "गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या...' या जयघोषात कुर्डुवाडी शहरातील बहुतांश नागरिकांनी नगरपालिकेने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत श्री गणेशाची मूर्ती विसर्जनासाठी नगरपालिकेकडे सुपूर्द केल्या. काही नागरिकांनी घरातील पाण्यातच श्रीगणेशाच्या मूर्तींचे विधिपूर्वक विसर्जन केले. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेच्या वतीने नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी गणेश मूर्तींचे विसर्जन न करण्याबाबत आवाहन करण्यात आले होते. नगरपालिकेच्या वतीने बालोद्यानाजवळ व नगरपालिका कार्यालय या ठिकाणी मूर्ती स्वीकारण्याची सुविधा उपलब्ध केली होती. प्रभारी मुख्याधिकारी चरण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली अतुल शिंदे, रवींद्र भांबुरे, स्वप्नील बाळेकर, नंदकुमार कदम, सुरेश कदम, शिवाजी खवळे यांनी नियोजन केले. सकाळपासून मूर्ती स्वीकारण्यास सुरवात झाली. 

काही नागरिकांनी पुन्हा नवीन मूर्ती तयार करण्यासाठी या मूर्तीचे दान केले. नगरपालिका कर्मचाऱ्यांनी टेंभुर्णी रस्त्यालगत असलेल्या विहिरीमध्ये या मूर्तींचे विधिपूर्वक विसर्जन केले. यासाठी राजू चोपडे, रमेश शिवशरण, दादा ठेंगल, कुमार कोळी, सुदर्शन साठे, अशोक पलंगे, वसीम मणेरी, हरी मोडेकर यासह इतरांनी परिश्रम घेतले. या ठिकाणी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Anant Chaturdashi 2020 : The response to the call made by the municipality for immersion of Ganpati in Kurduwadi was received