आजोबा गणपतीचे कृत्रिम तलावात प्रतिकात्मक विसर्जन 

श्‍याम जोशी 
Tuesday, 1 September 2020

सोलापुरात सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरवात होऊन 135 वर्षे झाली. यंदा पहिल्यांदाच कोरोना महामारीमुळे विसर्जन मिरवणुका निघाल्या नसल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. अखंड हिंदुस्थानातील पहिले सार्वजनिक गणपती अशी ओळख असलेल्या तसेच सार्वजनिक मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळांसह सोलापूरकरांचा मानाचा असलेल्या आजोबा गणपतीचेही यंदा अनोख्या पद्धतीने विसर्जन करण्यात आले. 

दक्षिण सोलापूर (सोलापूर) : ना ढोल, ना ताशे, ना लेझीम, ना झांज पथक, ना गुलालाची उधळण, ना मिरवणूक, ना जल्लोष अशा वातावरणात केवळ "पुढच्या वर्षी लवकर या...'चा जयघोष करीत सोलापूरच्या सार्वजनिक मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाअंतर्गत असलेल्या मानाच्या आजोबा गणपतीसह अन्य मंडळांच्या व घरगुती गणपतींचे विसर्जन कृत्रिम तलावासह संकलन केंद्रात मूर्ती जमा करत प्रतिकात्मकरीत्या करण्यात आले. 

सोलापुरात सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरवात होऊन 135 वर्षे झाली. यंदा पहिल्यांदाच कोरोना महामारीमुळे विसर्जन मिरवणुका निघाल्या नसल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. अखंड हिंदुस्थानातील पहिले सार्वजनिक गणपती अशी ओळख असलेल्या तसेच सार्वजनिक मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळांसह सोलापूरकरांचा मानाचा असलेल्या आजोबा गणपतीचेही यंदा अनोख्या पद्धतीने विसर्जन करण्यात आले. ट्रस्टचे अध्यक्ष ऍड. गौरीशंकर फुलारी यांच्या उपस्थितीत मंदिरासमोर एक लोखंडी जलकुंड तयार करून त्यात सिद्धेश्वर तलावातील विष्णू घाट येथील पाणी आणून घालण्यात आले. प्रथा आणि परंपरेप्रमाणे आजोबा गणपती मंदिरात गणेश चतुर्थीला स्थापनेदिवशी प्रतिकात्मक गणेशरूपात मांडण्यात आलेल्या सुपारीचे जलकुंडात विधिवत पूजन करून विसर्जन करण्यात आले. वेदमूर्ती रतिकांत स्वामी यांनी पौरोहित्य केले. या वेळी मंडळाचे उपाध्यक्ष चिदानंद वनारोटे, प्रसिद्धिप्रमुख सिद्धारुढ निंबाळे, अनिल सावंत, कमलाकर करमाळकर, चंद्रकांत कळमणकर आदींसह अन्य पदाधिकारी, सदस्य व कार्यकर्ते तसेच सार्वजनिक मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. 

दरम्यान सार्वजनिक मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या शिवानुभव मंगल कार्यालयातील गणेश प्रतिमेचे सकाळी 11 वाजता पूजनाने विसर्जन झाले. त्यानंतर मानाचा पहिला असलेल्या देशमुख गणपतीचे विसर्जन दुपारी दोन वाजता दक्षिण कसब्यातील देशमुख वाड्यात घरच्या घरीच करण्यात आले. यावेळी "श्रीं'च्या मूर्तीला परंपरेनुसार पालखीत ठेवून शंभर पावले चालत मिरवणूक काढण्यात आली. या वेळी महापौर श्रीकांचना यन्नम, माजी पालकमंत्री व आमदार विजयकुमार देशमुख, नगरसेवक डॉ. किरण देशमुख, सार्वजनिक मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष व माजी आमदार नरसिंग मेंगजी, कार्यवाह संजय शिंदे, ट्रस्टी विजय पुकाळे, आंबादास गुत्तीकोंडा, उत्सव अध्यक्ष सिद्राम मजगे, सेक्रेटरी सोमनाथ मेंडके, उपाध्यक्ष महेश मेंगजी आदींसह पदाधिकारी व ट्रस्टी तसेच देशमुख कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. 

देशमुख वाड्यातील मूर्ती महापालिकेचे नगर अभियंता संदीप कारंजे यांच्या स्वाधीन करत रीतसर विसर्जन करण्यात आले. यंदा सिद्धेश्वर तलावावरील गणपती घाट, विष्णू घाट यासह सर्व बाजूस कडक पोलिस बंदोबस्त तैनात होता. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे गणेश विसर्जनाची गर्दी नसल्याने तलाव परिसरात निरव शांतता होती. दत्त चौक, चौपाड, दक्षिण कसबा, उत्तर कसबा, बाळीवेस, तुळजापूर वेस, टिळक चौक, शुक्रवार पेठ, चाटी गल्ली या परिसरातील घरगुती गणेश विसर्जनाची सोय महापालिकेच्या तसेच विविध शाळा, समाजमंदिर, मंगल कार्यालयांसह 108 ठिकाणी मूर्ती संकलन केंद्रांत करण्यात आली होती. सकाळपासूनच नागरिकांनी या संकलन केंद्रांत मूर्ती आणून देत प्रशासनास चांगले सहकार्य केले. हजारोंच्या संख्येने मूर्तींचे संकलन या ठिकाणी झाले. या मूर्ती ट्रॅक्‍टरमधे भरून तुळजापूर रोडवरील मंठाळकर खाणीतील विसर्जन कुंडात विसर्जन करण्यात आले. याची पाहणीही सार्वजनिक मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी केली. 

विसर्जनाला निसर्गाकडूनच रंगांची झाली उधळण 
यंदा गणरायाच्या विसर्जन मिरवणुका नसल्याने अर्गजा व गुलालाची उधळण नव्हती. मात्र सायंकाळी आकाशात तयार झालेल्या तांबूस रंगाच्या छटांनी गणरायाला निरोप देताना निसर्गाकडूनच रंगांची मुक्त उधळण झाली होती. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Anant Chaturdashi 2020 : Symbolic immersion of Ajoba Ganapati in an artificial lake