वऱ्हाडातील सर्वात जुना गणपती बाराभाई गणपती 

The oldest Ganapati in Akola Varada is Barabhai Ganapati
The oldest Ganapati in Akola Varada is Barabhai Ganapati

अकोला: जुने शहरातील जयहिंद चौक नजीकच्या सितला माता मंदिरा जवळ-जवळ सव्वाशे वर्षा पूर्वीचा इतिहास असलेल्या मानाचा गणपती म्हणून श्री बाराभाई गणपती संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध आहे. 


आजही या गणपतीला अनेक भक्तगण मोठ्या भक्तिभावाने दर्शनाला येऊन मनोकामना पूर्ण करतात. विसर्जनाच्या वेळी सर्वात आधी मानाचा गणपती म्हणून पहिल्या क्रमांकावर श्री बाराभाई गणपतीची विधीवत पूजा अर्चा आरती करून अकोल्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ होतो ही परंपरा अजूनही कायम आहे.

अकोला जिल्ह्याचे आकर्षण 
श्री बाराभाई गणपती शहरातील गणेश उत्सवाचे आगळे आकर्षण आहे.अकोल्यातील श्री बाराभाई गणपती अकोल्यातच नव्हे तर संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध आहे.हा गणपती शहरातील गणेश उत्सवात मानाचा गणपती म्हणून विशेष मान आहे.

गणेश उत्सवात पुरातन काळापासून हा गणपती प्रथम क्रमांकावर असतो व तो मानाचा गणपती आहे ही वैशिष्टय पूर्ण प्रथा कदापिही बंद पडणार नाही. वऱ्हाडातील सर्वात जुना गणपती म्हणून बाराभाई गणपती प्रसिध्द आहे. म्हणून या गणपतीला गणेश उत्सवात आगळे वेगळे वैशिष्ट्यपूर्ण स्थान प्राप्त झाले आहे ते त्याच्या आगळ्या वेगळ्या इतिहासनेच.

अनेक दंतकथा 
सुप्रसिद्ध अशा बाराभाई गणपती बाबत अनेक प्रश्न निर्माण होतात ते हे की बाराभाई गणपती म्हणजे काय तो कुठे व केव्हा स्थापन झाला या विषयी जनमानसात अनेक दंत कथा ऐकावयास मिळतात. 


श्री बाराभाई गणपतीची स्थापना नेमकी केव्हा पासून सुरू झाली हया बाबत अजून पर्यंत कोणतीही नोंद सापडलेली नाही. श्री बाराभाई गणपतीचे मुख्य प्रवर्तक व परंपरागत चालक श्री धर्मनाथ एकनाथ इंगळे व श्री जनार्धन पंढरीनाथ इंगळे यांच्या मते हा गणपती पेशवे कालीन असावा व पेशवे कालीन बाराभाईच्या कारस्थानाशी याचा निकट संबंध असावा म्हणूनच याला बाराभाई गणपती हे नाव प्राप्त झाले आहे. अशी परंपरागत माहिती ते सांगतात.श्री बाराभाई गणपती पूर्णतः नाथ कुटुंबाचा आहे दरवर्षी बाराभाईच्या गणपतीची स्थापना, पूजाअर्चा आणि विसर्जन नाथ कुटुंबियांनकडून होते. 

विशेष हे की बाराभाई गणपती उत्सवासाठी कुणाकडूनही वर्गणी गोळा केली जात नाही असे आजचे अध्यक्ष श्री धर्मनाथ एकनाथ इंगळे हे सांगतात. श्री बाराभाई गणपतीचे सर्वोसर्वा नाथ कुटुंब कसे झाले या करिता भूतकाळत जावे लागेल.

मनोरंजक इतिहास 
सार्वजनिक असणारा बाराभाई गणपती इंगळे घराण्याकडे कसा आला याचा इतिहास मनोरंजक आहे. २१ शतकांच्या पूर्वधात आयुष्याचे अर्धशतक ओलांडलेले आजचे अध्यक्ष धर्मनाथ एकनाथ इंगळे व जनार्धन पंढरीनाथ इंगळे यांची परंपरागत ऐकीव माहिती सांगतात श्री बाराभाई गणपती रूढीपरंपरेने स्थापन केल्या जात असे. मात्र कालांतराने त्यातला उत्साह कमी होत गेला त्यातल्यात्यात सामाजिक व राजकीय निरुउत्साहाचा तो काळ लोकांमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव साजरा न करण्याचे ठरले. मंडळे जवळपास संपुष्टात आली पण बाराभाई गणपतीचे काय होणार अशा वेळी पुढे आले त्या वेळचे संस्थापक अध्यक्ष कै भगवाननाथजी बाळनाथजी इंगळे. 
सार्वजनिक नाही तर नाही पण बाराभाईचा गणेश उत्सव साजरा झाला नाही,असे होऊ नये म्हणून त्यांनी बाराभाईचा गणपती आपल्या घरी स्थापन केला आणि त्या वर्षी पासून बरभाईचा गणपती नाथ कुटुंबाचा झाला त्यानंतर बाराभाई गणपतीने नाथाचे घर सोडले नाही, भगवाननाथजी इंगळे यांनी जणू बारभाईच्या गणपतीला अभयच दिले.

गणपती मनाचा कसा 
बाराभाईचा गणपती मानाचा समजला जातो. तो त्याच्या कैक वर्षाच्या इतिहासाने. श्री बाराभाई गणपतीला मानाचे स्थान प्राप्त होऊन आज १२५ हून अधिक वर्षे झालीत. लोकमान्य टिळकांनी संपूर्ण महाराष्ट्रात सार्वजनिक स्वरूपात गणेश उत्सवाची सुरुवात केली. त्या वेळी किल्ला भोवतीच्या छोट्याशा अकोला शहरातही पाच सात मंडळे स्थापन झाली. 


गणेश उत्सव मोठया प्रमाणात साजरा होऊ लागला परिणामी मिरवणुकीचे निघणे साहजिकच होते. विसर्जनाच्या मिरवणूकीत जुना गणपती म्हणून प्रथम स्थान श्री बाराभाई गणपतीला मिळाले. 


त्याला दुसरेही एक कारण होते ते मिळविले होते कै. भगवाननाथ इंगळे यांनी त्यावेळी मिरवणूक काढायचे म्हणजे एक महान दिव्य होते. स्वातंत्र्य पर्वकाळात ब्रिटिश सरकारचे जाचक कायद्याची अंमलबजावणी करणे कठीणच होते.


पण कै. भगवाननाथजी इंगळे यांनी या दिव्यातून जाण्याची तयारी ठेवली. परधर्मीय बंधूंच्या भावना न दुखवता परधर्मीय प्रार्थना स्थळापासून नेत असतांना मिरवणूक शांत संयमी व रुंगामी वृत्तीचे दर्शन जनतेला घडविले त्या काळी शहरातील विविध समाजाच्या सहकार्याने व बंधुभावाचे प्रतीक म्हणून सर्व जनता श्री बाराभाई गणपतीकडे पाहू लागली.


तेव्हा पासूनच अकोलेकारांनी प्रथम मानाचा मुजरा केला. श्री विसर्जनाच्या मिरवणुकीत पहिल्या स्थानावर श्री राजेश्वराचे गणपती अलिखित आहे. अकोल्यातील ही प्रथा सन १८९० च्या सुमारास सुरू झाली व ती आजतागायत सुरू आहे.

श्री बाराभाई गणपतीची मूर्ती कायमची 
कै.भगवन नाथांच्या मृत्यू नंतर सन १९२० साली श्री बाराभाई गणपतीचा कारभार त्यांचे चिरंजीव कै. पंढरीनाथजी इंगळे व कै. एकनाथजी इंगळे यांच्याकडे आला. गेली ७० वर्षे त्यांनी आपली नोकरी व व्यावसाय सांभाळून हा गणेश उत्सव साजरा . श्री बरभाईची मूर्ती गेल्या १०० वर्षांपासून एकच आहे. त्या आधी कैक वर्ष पूर्ण आकार व पुर्ण स्वरूपाची नवी मूर्ती जुन्या पिढीतील मूर्तिकार कै. ओंकाररावजी मोरे ठाकुर हे ती मूर्ती तयार करीत असत त्यांच्या मृत्यूनंतर बारभाईची मूर्ती तयार झालीच नाही. नवीन मूर्ती तयार करण्यासाठी परंपरागत चालक एकनाथ व रघुनाथ यांनी कईकदा प्रयत्न केले पण यश आले नाही. त्यामुळे ही मानाची मूर्ती विसर्जित होत नाही पण पूजेच्या मूर्तीचे विसर्जन होते.

दिंडी  प्रथा
श्री बाराभाई गणपतीला लाभलेला दिंडी उत्सवही वैशिष्ट्यपूर्ण आहे.अगदी जुन्या काळापासून विसर्जन मिरवणुकीसाठी गावातून दिंड्या येत असत. येथे येणाऱ्या दिंड्या या भक्तिभावाने येत असतात. त्यांच्या काहीही माणधन नको असते ते गणेशाच्या गळ्यातील हार ते आपला गौरव समजतात. श्री बाराभाई गणपतीची पालखी वाहणारे भोईराज सुद्धा पिढ्यान पिढया आपली सेवा गणेश चरणी अर्पण करीत आहे.

श्री बाराभाई गणपती मानाचा कसा 
पेशवे काळातील हा गणपती सर्वात जुना व अकोल्यातील पहिला गणपती आहे. ज्यावेळी लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेश उत्सवाला सुरुवात केली तेव्हा मिरवणुकीची प्रथा आपसूक आलीच. मिरवणुक अनंत चतुर्थीला निघत होती व हा गणपती बारासला उठत असे तेव्हा सार्वजनिक मिरवणुकीत सामील होण्याकरिता त्यावेळचे बारभाईचे संस्थापक अध्यक्ष कै. भगवाननाथजी इंगळे ह्यांच्याकडे सार्वजनिक उत्सव करणारी मंडळी त्यांच्याकडे आली. बाराभाई गणपती सर्वात जुना असल्यामुळे तुम्ही सार्वजनिक गणपती उत्सवात सामील व्हा. असा आग्रह त्या मंडळींनी धरला तेव्हा कै. भगवाननाथजी इंगळे यांनी त्या मंडळींना प्रश्न केला की, आम्ही जर आमचा गणपती तुमच्या सोबत मिरवणूकीत आणला तर तुम्ही या जुन्या गणपतीला काय मान द्याल तेव्हा अकोल्यातील सर्व सार्वजनिक मंडळींनी कै. भगवाननाथजी इंगळे ह्यांचा सोबत श्री राजेश्वर मंदिरामध्ये जाऊन श्री राजराजेश्वराला समक्ष सांगितले की, हा गणपती सार्वजनिक मिरवणुकीमध्ये प्रथम क्रमांकावर राहील तेव्हा पासून ही प्रथा आजतागायत सुरू आहे.

नवसाला पावणारा गणपती 
श्री बाराभाईचा गणपती हा विदर्भवासी यांचा श्रद्धेचा गणपती आहे. अनेक वर्षांपासून असलेल्या ह्या गणपतीबाबत अकोलेकरांच्या मनात श्रद्धेचे भाव आहेत. अनेक जण ह्या गणपतीला साकडे घालतात. नवस करतात इच्छा करतात. श्रद्धेने आणि विश्वावासाने विश्वासाला आणि श्रद्धेला ह्या गणेशाने कधीही तडा जाऊ दिला नाही असे अनेक अकोलेकर आपल्या अनुभवावरून सांगतात असा हा इंगळे नाथ कुटुंबीयांचा मानाचा श्री बाराभाई गणपती . त्यांच्या चरणी साष्टांग दंडवत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com