भाविकांचे श्रध्दास्थान श्री शंकर पार्वती गणपती (महादेव)

शकील शेख, सातारा.
Saturday, 22 August 2020

महाराष्ट्राच्या बहुतांशी शहरात तुम्हाला मानाचे गणपती व त्यांच्या निरनिराळ्या प्रथा आढळतील, सातारा शहर पण याला अपवाद नाहीये, पण साताऱ्यात मानाच्या गणपतीच्या बाबतची एक प्रथा निश्‍चितच अत्यंत वेगळी आहे ती म्हणजे बहुतांशी ठिकाणी गणपती उत्सवात मानांच्या गणपतींना सर्वात आधी विसर्जनाचा मान असतो पण याउलट साताऱ्यात मात्र मानाचे गणपती हे सर्वात शेवटी विसर्जित होतात. साताऱ्यातील असाच सर्वात मानाचा समाजाला जाणारा व सर्वात शेवटी विसर्जित होणारा गणपती म्हणजेच हजारो भाविकांचे श्रध्दास्थान असणारा शनिवार पेठेतला श्री शंकर-पार्वती-गणपती होय. 

सातारा : सातारा शहरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेला श्री शंकर - पार्वती - गणपती नवसाला पावणारा महादेव म्हणून देखील ओळखला जातो, याचे मुख्य वैशिष्ठय म्हणजे या गणपतीचे कोणतेही मंडळ, देवस्थान किंवा ट्रस्ट नाहीये, यासाठी कोणतीही वर्गणी गोळा केली जात नाही, भाविकांनी श्रद्धेने अर्पण केलेल्या वस्तू व पैश्‍यामधूनच उत्सवाचा खर्च भागविला जातो, शनिवार पेठेतील परदेशी कुटुंबीय यांच्या कढून या मूर्तीची गणपतीचा उत्सवकाळात 10 दिवस प्रतिष्ठापणा त्यांच्याच खासगी जागेत केली केली जाते, ही परंपरा गेल्या तीन पिढ्यांपासून अखंडित सुरु आहे, आत्ताच्या चौथ्या पिढीत हि मूर्ती राहुल परदेशी बनवितात. शंकर त्याच्या उजव्या बाजूला गणपती तर डाव्या बाजूला पार्वती असणारी ही मूर्ती पूर्णपणे शाडूची बनवलेली असते, ती प्रत्येक वर्षी पारंपरिक पद्धतीने विसर्जित केली जाते, गणपती उत्सवाच्या 10 दिवसात हजारो भाविक या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी, नवस बोलण्यासाठी व आधीचा नवस फेडण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करतात, अनंत चतुर्दशीला मिरवणुकीद्वारे या मूर्तीचे विसर्जन केले जाते.

या शंकर-पार्वती-गणपतीची विसर्जन मिरवणूक म्हणजे एक मंगलदायी सोहळाच असतो, एका ट्रॅक्‍टर-ट्रॉली वर सुशोभित मंडप उभारून त्यात मूर्ती ठेवली जाते, संपूर्ण मिरवणुकीत फक्त दोन छोट्या स्पीकरवर शंकराची गाणी हळू आवाजात लावलेली असतात, त्यामुळे कोणतेही ध्वनी प्रदूषण नसते, मिरवणुकीत कोणीही हिडीस नृत्य करत नाही, कोणीही मद्यपान करून सहभागी होत नाही, गुलाल सुद्धा अजिबात नसतो, मिरवणुकीच्या पुढे फक्त दोनच मंगलवाद्ये असतात, विशेष म्हणजे ती वाजवण्याचा मानही मुस्लिम समाजातील व्यक्तींना आहे, या मिरवणुकीचे अजून एक वैशिष्ठय म्हणजे यात 'गणपती बाप्पा मोरया ऐवजी' शिव - सांब , हर - हर असा जयघोष केला जातो, संपूर्ण विसर्जन मिरवणूक मार्गात घरा-घरातून या मूर्तीचे स्वागत, पूजा, आरती केली जाते.

भाविकांनो.. साताऱ्यातील या मानाच्या गणपतीचे घेता येणार वर्षभर दर्शन, कोणी घेतला निर्णय वाचा

सातारा शहरात सर्वात शेवटी विसर्जन होणारे पाच गणपती हे मानाचे समजले जातात, या विसर्जन मिरवणुकीत सर्वात शेवटी विसर्जन होण्याचा मान हा सातारकरांनी श्री शंकर - पार्वती - गणपतीस दिला आहे, या श्री शंकर - पार्वती - गणपतीचे विसर्जन झालेवरच सातारा शहरातील गणेशोत्सवाची व विसर्जन मिरवणुकीची सांगता होते, या नंतर दुसरी कोणतीही मूर्ती विसर्जित होत नाही, सातारकरांनी हि परंपरा गेली कित्येक वर्षे अखंडित पणे जपली आहे.

संपादन : सिद्धार्थ लाटकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Manacha Ganpati Shri Shankar Pavarti Ganpati