esakal | पंढरपूरकरांचा यंदा प्रबोधनाचा गणेशोत्सव! मंडळांकडून कोरोना जनजागृती
sakal

बोलून बातमी शोधा

पंढरपूरकरांचा यंदा प्रबोधनाचा गणेशोत्सव! मंडळांकडून कोरोना जनजागृती

पंढरपूर शहरातील सर्वच मंडळांच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत साधेपणाने उत्सव साजरा करण्याची भूमिका घेतली आहे.

पंढरपूरकरांचा यंदा प्रबोधनाचा गणेशोत्सव !

sakal_logo
By
अभय जोशी - सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर (सोलापूर) : कोरोनाच्या (Covid-19) पार्श्वभूमीवरील निर्बंधांमुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी श्री गणरायाच्या मोठ्या मूर्ती, मोठे मंडप आणि अनावश्‍यक खर्चाला फाटा देत उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. पंढरपूर (Pandharpur) शहरातील सर्वच मंडळांच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत साधेपणाने उत्सव साजरा करण्याची भूमिका घेतली आहे. कोरोना प्रतिबंधक जनजागृती, रक्तदान शिबिर, मोफत रुग्ण तपासणी आणि उपचार अशा शिबिरांचे आयोजन काही मंडळांनी केले आहे. यंदा गणेशोत्सव (Ganesh Chaturthi) कोरोनाच्या सावटाखालीच साजरा होणार आहे.

हेही वाचा: गौरी सजावटीच्या साहित्यांनी सजल्या बाजारपेठा !

कोरोनाच्या सावटामुळे शहरात यात्रा भरू शकल्या नाहीत. वारकरी आणि व्यापारी मंडळींनी प्रशासनाला सहकार्य करण्याची भूमिका घेतली होती. गेल्या काही दिवसांपूर्वी तालुक्‍याच्या ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढत होती. त्यामुळे प्रशासनाने ग्रामीण भागातील निर्बंध कडक केले होते. आता रुग्णसंख्या घटली असली तरी गणेशोत्सवाच्या काळात गर्दी होऊन प्रार्दुभाव पुन्हा वाढू नये यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. शहरात सुमारे शंभर लहान- मोठी मंडळे गणेशोत्सव साजरा करतात. परंतु, मागील वर्षीपासून कोरोनाच्या सावटामुळे कार्यकर्त्यांनी साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याची भूमिका घेतली होती. यंदा देखील भव्य मंडप उभारून तिथे मोठ्या मूर्ती बसवण्याऐवजी छोट्या मंडपात अथवा परिसरातील सोईस्कर ठिकाणी छोट्या मूर्ती बसवून साधेपणाने गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे.

दरवर्षी शहरातील काही प्रमुख मंडळे आकर्षक विद्युत रोषणाई करत असतात. यंदा या मंडळांनी विद्युत रोषणाईसह अनावश्‍यक खर्चाला फाटा देण्याचे ठरवले आहे. काही मंडळे दरवर्षी अथर्वशिर्ष पठण, विविध प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन करत असतात. यंदा असे कार्यक्रम न करता कोरोना रुग्णांची संख्या वाढू नये यासाठी लोकांमध्ये जागृती करण्यासाठी काही मंडळे प्रयत्न करणार आहेत. त्यासाठी कोरोना प्रतिबंधक जनजागृती करणारे फलक लावणे, पत्रके वाटणे, रक्तदान शिबिर आणि मोफत रुग्ण तपासणी शिबिरांचे आयोजन करण्याचा निर्णय शहरातील काही प्रमुख मंडळांनी घेतला आहे.

हेही वाचा: दुपारी 1.50 पर्यंत करा गणेशाची स्थापना : पंचांगकर्ते मोहन दाते

मूर्ती खरेदीसाठी स्टॉलवर गर्दी

गणेशमूर्तींची खरेदी करण्यासाठी नागरिकांची विक्री स्टॉलवर लगबग दिसत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील निर्बंधांमुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये निरुत्साह दिसून येत आहे. अलीकडच्या काही दिवसात शहर व तालुक्‍यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली असली तरी अद्यापही निर्बंध शिथील करण्यात आलेले नाहीत. गणेशोत्सवासाठी जिल्हा प्रशासनाने खबरदारी घेत सार्वजनिक गणेशोत्सवासाठी नियमावली जाहीर केली आहे.

कोरोना विषाणू येण्यापूर्वी गणेशोत्सवाच्या आठ दिवस आधी मूर्तींचे 60 ते 70 टक्के आगाऊ बुकींग व्हायचे. यंदा मात्र 30 टक्के देखील बुकींग झालेले नाही. अशातच डिझेल आणि मूर्तीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचे दर वाढल्यामुळे मूर्तींच्या किंमतीमध्ये 20 ते 30 टक्के वाढ झाली आहे.

- नीलेश कुंभारकर, गणेश मूर्ती विक्रेते, पंढरपूर

शासकीय नियमांच्या आधीन राहून आम्ही यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करणार आहोत. रुग्ण तपासणी शिबिर, कोरोना व इतर साथरोग या बाबत जनजागृती कार्यक्रम आदी सामाजिक उपक्रम राबवण्यावर भर देणार आहे.

- श्रीनिवास बोरगावकर, अष्टविनायक गणेश मंडळ, पंढरपूर

मोठी मूर्ती आणि सजावटीवर खर्च केला जाणार नाही. सद्य:परिस्थिती लक्षात घेऊन प्रबोधनात्मक समाजोपयोगी कार्यक्रम मंडळाच्या वतीने केले जाणार आहेत.

- धनंजय मनमाडकर, लोकमान्य गणेश मंडळ, पंढरपूर

loading image
go to top