esakal | गौराई आली सोन्याच्या पावलांनी गं!
sakal

बोलून बातमी शोधा

गौराई आली सोन्याच्या पावलांनी गं!

कोरोनाच्या सावटामुळे बाजारातही वस्तू खरेदी करण्यासाठी महिलांना धाकधूक वाटत आहे. गौरीच्या साड्या खरेदी करण्यापासून ते मुखवटे, दागिने व विविध देखाव्यासाठी लागणारे साहित्य व डेकोरशनसाठी महिलांची बाजारात लगबग दिसून येते. मात्र, घरी कोणालाही बोलवता येणार नसल्याने ब-याच सखींनी साध्या पध्दतीने गौरी बसवण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे सातारा शहरातही गौराईचे आगमन साध्या पध्दतीनेच झाले.

गौराई आली सोन्याच्या पावलांनी गं!

sakal_logo
By
बाळकृष्ण मधाळे

सातारा : गणरायापाठोपाठ माहेरवाशीण ज्येष्ठा गौरीचेही मंगळवारी (ता. २५) घरोघरी शुभागमन झाले. 'गौराई आली सोन्याच्या पावलांनी, गौराई आली माणिक मोतींच्या पावलांनी' असे म्हणत लाडक्या गौराईची घरोघरी प्रतिष्ठापना करण्यात आली. हे तीन दिवसांचे पूजन नक्षत्रप्रधान आहे. ज्येष्ठा नक्षत्रावर पूजन, महानैवेद्य व मूळ नक्षत्रावर विसर्जन केले जाते. गौराई घरी येणार म्हणून अनेक महिलांनी आधीच आरास करुन ठेवली होती. घरात करंज्या-पापड्या करून ठेवल्या होत्या. दारात सुबक रांगोळी काढली होती, तर दाराला तोरण लावलं होतं. 

गणेशोत्सवाच्या निमित्ताने कुटुंबातील सगळे जण एकत्र येतात. त्यावेळी आपल्या घरी माहेरवाशीण म्हणून ३ दिवस राहणाऱ्या या गौरींसाठी छानशी सजावटही केली जाते. यामध्ये फुलांनी, घरातील स्त्रियांनी केलेल्या कलाकुसरीच्या वस्तूंनी किंवा बाजारात तयार मिळणारे सजावटीचे सामान वापरुन सजावट केली जाते. गौरीच्या मुखवट्यांमध्येही शाडूच्या, पितळ्याच्या, कापडाच्या, फायबरच्या असे बरेच प्रकार पाहायला मिळतात. काहींकडे केवळ मुखवट्यांची पूजा होते, तर काहींकडे पूर्ण उभ्या गौरी असतात.

जिल्ह्याबाहेरील जैव वैद्यकीय कचरा विनापरवानगी स्वीकारत नाही : सागर जाधव

दरम्यान, मंगळवारी पहिल्या दिवशी या गौरी आपल्याकडे माहेरवाशीण म्हणून आल्याने त्यांना खाण्यासाठी लाडू, चिवडा, करंज्या असे फराळाचे पदार्थ, मिठाई, फळे यांचा नैवेद्य दाखविण्यात आला. तसेच गौरीला विविध प्रकारची फुले आणि पत्री वाहण्यात आली. तद्नंतर नातेवाईक, शेजारी आणि मित्र-मैत्रिणींना हळदी-कुंकवासाठी आणि गौरींचे दर्शन घेण्यासाठी बोलविण्यात आले. शहरातील अनेक घरांत गौरीचे आगमन होताच गौराईची खणा-नारळाने ओटी भरण्यात आली. तद्नंतर विधीवत पूजा करुन नैवद्य दाखविण्यात आला. उद्या बुधवार गौरीपुजनाचा सर्वात महत्त्वाचा दिवस, त्याच पार्श्वभूमीवर महिलांची लगबग पहायला मिळत आहे. 

दुर्वाचे अस्तित्व धोक्यात; जाणून घ्या नेमकं कारण

कोरोनाच्या सावटामुळे बाजारातही वस्तू खरेदी करण्यासाठी महिलांना धाकधूक वाटत आहे. गौरीच्या साड्या खरेदी करण्यापासून ते मुखवटे, दागिने व विविध देखाव्यासाठी लागणारे साहित्य व डेकोरशनसाठी महिलांची बाजारात लगबग दिसून येते. मात्र, घरी कोणालाही बोलवता येणार नसल्याने ब-याच सखींनी साध्या पध्दतीने गौरी बसवण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे सातारा शहरातही गौराईचे आगमन साध्या पध्दतीनेच झाले. शासनाच्या नियमांचे पालन करत महिलांनी गर्दी न करता गौरी आगमनाचा कार्यक्रम मोजक्या सखींना सोबत घेऊन पूर्ण केला.

go to top