संकेश्वर (बेळगाव) : साधारणतः ३०० वर्षांचा इतिहास असलेल्या येथील हेद्दूरशेट्टी घराण्याच्या निलगार गणपतीची किर्ती कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा या तीन राज्यात पसरलेली आहे. `नवसाला पावणारा` अशी या गणपतीवर भक्तांची सर्वदूर श्रद्धा आहे. त्यामुळे दरवर्षी उत्सवात २२ ते २५ लाखावर भाविक दर्शन घेतात. प्रत्येक वर्षी भाविकांच्या संख्येत हजोरोंनी भर पडत आहे. या उत्सवामुळे संकेश्वर शहराला महिनाभर यात्रेचे स्वरुप येते. गेल्या 20 वर्षात या उत्सवाची व्याप्ती व ख्याती खूपच वाढलेली आहे.
निलगार गणपतीची माहिती खूपच रोचक आहे. मुळात हा गणपती हेद्दूरशेट्टी घराण्याचा घरगुत्ती गणपती आहे. उपलब्ध माहितीनुसार ईश्वराप्पा सिद्धाप्पा हेद्दूरशेट्टी यांच्या काळापासून हा गणपती प्रसिद्धीच्या झोतात आला. सध्या हेद्दूरशेट्टी परिवारातील शिवपुत्र, वीरभद्र व हणमंत हे तिघे बंधू उत्सवाची सर्व जबाबदारी पेलत आहेत.
व्यवसायावरून झाले `निलगार` नामकरण
गणपतीचे `निलगार` असे नामकरण हेद्दूरशेट्टी यांच्या व्यवसायावरुन पडले. हेद्दूरशेट्टी घराण्याचा सुतकताई व कपड्यांना रंगकाम करण्याचा पारंपरिक व्यवसाय होता. त्यावरुन त्यांना निलगार नावाने ओळखले जात. पुढे त्यांच्या गणपतीला `निलगार गणपती` हे नाव पडले. सध्या कालपरत्वे हेद्दूरशेट्टी यांचा व्यवसाय बदलला, पण नाव मात्र कायम राहिले आहे. नवसाला पावणारा गणपती अशी ख्याती होऊन भाविकांची संख्या प्रचंड वाढली आहे.
गणेश चतुर्थी दिवशी संपूर्ण हेद्दूररशेट्टी कुटुंबीय कडक उपवास करतात. मूर्ती सुतार यांच्या घरातून दुपारी वाजत-गाजत मिरवणुकीने आणली जाते. पहिल्या दिवशी घरात मंचावर ठेऊन शास्त्रोक्त पूजा केली जाते. दुसऱया दिवशी सार्वजनिक भक्तांसाठी नेहमीच्या ठिकाणी मूर्ती ठेवली जाते. त्यानंतर भाविकांकडून दर्शन सुरु होते. दररोज लाख-सव्वा लाखावर भाविक दर्शन घेतात.
सुतार कुटुंबीयांना मूर्ती बनविण्याचा मान
सुतार कुटुंबीयांना निलगार गणपतीची मूर्ती बनविण्याचा मान आहे. धोंडीबा सुतार यांचा मुलगा बाळकृष्ण सुतार व आता नातू पुंडलिक सुतार हे मूर्ती बनवितात. परंपरेप्रमाणे हेद्दूरशेट्टी कुटुंबीय सुतार यांना मानाचा विडा देऊन मूर्तीची बनविण्यास सांगतात. मूर्ती बनविण्याच्या कामाचा प्रारंभही मुहूर्त पाहूनच केला जातो.
मूर्तीचा रंग लाल, उंची २७ इंच
संपूर्ण लाल रंगात रंगवलेली गणपतीची मूर्ती अतिशय आकर्षक असते. मूर्तीची उंची २७ इंच, लाल रंग व सजावट ठरलेली असते. त्यामध्ये कोणताही बदल केला जात नाही. मूर्तीकाम केलेल्यांना आहेर व मानधन दिले जाते. मूर्तीचे छायाचित्र काढण्यास बंदी असते. या गणपतीला पिठी साखर, कापुर, दुर्वा व लाल फुल प्रिय आहे. संकष्टीनंतर येणाऱ्या पहिल्या गुरुवारी किवा सोमवारी या गणपतीचे हिरण्यकेशी नदीपात्रात श्री शंकराचार्य मठासमोर विधीवत विसर्जन केले जाते. उत्सव कालावधीत शहरातील अनेक स्वयंसेवी संस्था, मान्यवर व व्यक्तींकडून अन्नदान आणि इतर सुविधा पुरवल्या जातात.
शंकराचार्य मठाचा आशीर्वाद
विसर्जन मिरवणुकीला पंचक्रोशीसह विविध राज्यातील लाखो भाविक उपस्थित राहतात. येथील महालक्ष्मी मंदिरासमोर रात्रभर फटाक्यांची आतषबाजी केली जाते. या गणपतीला श्री शंकराचार्य मठाचा आशीर्वाद आहे. त्यामुळे हा एकच असा गणपती आहे की मठातून त्याला विसर्जन स्थळी जाण्यास प्रवेश दिला जातो. उत्सव काळात मठाधीश या गणपतीचे दर्शन घेतात. उत्सव काळात विविध भजनी मंडळे व कलाकार येथे हजेरी लावून भक्तीसह सेवा करतात. अनेक लोकप्रिय सेलिब्रेटीही येथे हजेरी लावून गेले आहेत.
हेही वाचा- कोल्हापुरातील तालमीनी अशी घेतली खबरदारी ःपरवानगी असेल तरच हॉलमध्ये प्रवेश -
यंदा दर्शन पूर्णपणे बंद
निलगार गणपतीच्या ख्यातीमुळे सकाळपासूनच भाविकांची दीड-दोन किलो मीटर रांग लागलेली असते. गर्दीवर नियंत्रणासाठी पोलिस व स्वयंसेवक कार्यरत असतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा मात्र या उत्सवावर शासनाने बंदी घातली आहे. अतिशय साध्या पद्धतीने निलगार गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. सार्वजनिक भाविक-भक्तांसाठी यंदा दर्शन पूर्णपणे बंद राहणार आहे. त्यामुळे याची नोंद घेऊन कोणीही उत्सव स्थळी येऊ नये, असे आवाहन हेद्दूरशेट्टी कुटुंबीयांनी केले आहे.
संकष्टीनंतरच्या गुरुवारी किंवा सोमवारी विसर्जन
या गणपतीचे वास्तव्य किमान २१ दिवसांपुढे असते. गणेश चतुर्थीला प्रतिष्ठापना होऊन संकष्टीनंतर येणाऱ्या पहिल्या गुरुवारी किंवा सोमवारी या गणपतीचे विसर्जन होते. दरम्यानच्या काळात दररोज हजारो भक्त दर्शन घेऊन नवस बोलतात. यामध्ये नवीन लग्न झालेली जोडपी व शालेय विद्यार्थ्यांची संख्या मोठी असते. नवस फेडण्यासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या हजारोंनी असते.
उत्सवात कोटय़वधींची उलाढाल
तीन राज्यातील भाविक विविध वाहनांनी उत्सवात हजेरी लावतात. त्यामुळे मंदिर परिसर अक्षरशः गजबजून जातो. पेढे, साखर, कापूरसह अन्य पूजेच्या साहित्याचे शेकडो स्टाॅल लावले जातात. त्यासह हाॅटेल व अन्य व्यवसायांची चलती असल्याने उत्सव काळात कोटय़वधींची उलाढाल होते.
हेही वाचा- शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूंची कारवाईची इतकी घाई कुणाच्या हितासाठी -
मुळात हा गणपती आमचा घरचा गणपती आहे. पण अलीकडे येणाऱ्या भाविकांचे नवस पूर्ण करणारा निलगार गणपती म्हणून अशी त्याची ख्याती दूरवर पसरलेली आहे. भक्ताची संख्याही वाढतच चालली आहे. त्यांना दर्शन सुलभ होण्यासाठी प्रयत्नशील असतो. हेद्दूरशेट्टी कुटुबीयांच्या प्रथा, परंपरा सांभाळत आम्ही हा उत्सव साजरा करतो.
शिवपुत्र हेद्दूरशेट्टी, संकेश्वर
एक नजर...
-`निलगार` हा हेद्दूरशेट्टी घराण्याचा घरचा गणपती
-उत्सव काळात संकेश्वरला यात्रेचे स्वरूप
-गेल्या २० वर्षात वाढली ख्याती
-२० ते २५ लाखावर भाविकांकडून दर्शन
-नवीन जोडपी, विद्यार्थी व भाविकांकडून नवस
-मूर्तीचे छायाचित्र काढण्यास बंदी
-विसर्जनासाठी देखील मोठी गर्दी
संपादन - अर्चना बनगे
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.