esakal | शतकोत्तरी रौप्य महोत्सवी वर्ष पूर्ण केलेला सोलापूरचा मानाचा आजोबा गणपती 
sakal

बोलून बातमी शोधा

Ajoba Ganpati

महाराष्ट्रात 1893 मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरवात झाली. परंतु त्यापूर्वीच आठ वर्षे अगोदर म्हणजे 1885 मध्ये सोलापुरातील शुक्रवार पेठेतील कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन सार्वजनिक स्वरूपात आजोबा गणपतीची स्थापना केली. भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक 1875 पासून सोलापुरात येत असत. गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप देण्याची प्रेरणा लोकमान्य टिळकांना सोलापुरातील शुक्रवार पेठेतील आजोबा गणपतीकडून मिळाली, असे मानले जाते. 

शतकोत्तरी रौप्य महोत्सवी वर्ष पूर्ण केलेला सोलापूरचा मानाचा आजोबा गणपती 

sakal_logo
By
श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : सोलापूर हे स्वातंत्र्य लढ्यापासून सर्वार्थाने नावाजलेले शहर. स्वातंत्र्य चळवळ असो किंवा राजकीय, सामाजिक घडामोडी असो, सोलापूरकरांनी नेहमी आपला वेगळा ठसा देशावर उमटवला आहे. आध्यात्मिक व धार्मिक क्षेत्रही याला अपवाद नाही. श्रद्धानंद समाजाचा मानाचा आजोबा गणपती हा तर सोलापूरच्या आध्यात्मिक क्षेत्राचा मानबिंदूच. आजोबा गणपती म्हटले, की सर्व लहानथोर गणेशभक्तांच्या डोळ्यासमोर एक आकर्षण व विशिष्ट श्री गणेशाची मूर्ती नजरेसमोर येते. भक्ताला पावणारा श्री गणराया अशी आजोबा गणपतीची ख्याती आहे. अशा या श्रद्धानंद समाजाच्या आजोबा गणपतीला 135 वर्षांची मोठी परंपरा लाभली आहे. आजोबा गणतीच्या प्रतिष्ठापनेला शतकोत्तरी रौप्य महोत्सवी वर्ष पूर्ण झाले आहे. 

1885 मध्ये आजोबा गणपतीची स्थापना 
भारतीय समाजाला एकत्रित आणून लोकसंघटन, लोकजागृती निर्माण करण्यासाठी आणि स्वातंत्र्याची चळवळ सामान्य जनतेपर्यंत पोचविण्यासाठी लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप प्राप्त करून दिले. स्वातंत्र लढ्याला प्रेरक अशी शक्ती गणेशोत्सवातून निर्माण झाली. महाराष्ट्रात 1893 मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरवात झाली. परंतु त्यापूर्वीच आठ वर्षे अगोदर म्हणजे 1885 मध्ये सोलापुरातील शुक्रवार पेठेतील कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन सार्वजनिक स्वरूपात आजोबा गणपतीची स्थापना केली. भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक 1875 पासून सोलापुरात येत असत. गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप देण्याची प्रेरणा लोकमान्य टिळकांना सोलापुरातील शुक्रवार पेठेतील आजोबा गणपतीकडून मिळाली, असे मानले जाते. 

आजोबा गणपतीच्या स्थापनेसाठी त्यावेळचे कार्यकर्ते मल्लिकार्जुन कावळे, महालिंगप्पा वजीरकर, मल्लिकार्जुनप्पा शेटे, संगनबसय्या नंदीमठ, देवबा मंठाळकर, देशमुख, गणेशारी, पारकर, म्हमाणे, ओणामे, दर्गोपाटील, नंदयाळ, आवटे आदी घराण्यातील व्यक्ती एकत्रित आली होती. आजोबा गणपती सुरवातीला काही वर्षे शुक्रवार पेठेतील शेटे यांच्या घरासमोर व त्यानंतर त्रिपुरांतकेश्वर मंदिरात बसवून तेथेच गणेशोत्सव साजरा करण्यात येत होता. त्यानंतर अनेक वर्षे तत्कालीन महापौर (स्व.) विश्वनाथ बनशेट्टी यांच्या माणिक चौकाजवळील ट्रंक कारखान्यत गणेशोत्सवात आजोबा गणपती बसविण्यात येत होता. 

श्रद्धांनद समाजाची स्थापना 
लाला मुनसीराम हे लाहोर उच्च न्यायालयातील प्रसिद्ध वकील होते. त्यांनी संन्यास घेतल्यानंतर ते स्वामी श्रद्धानंद या नावाने ओळखले जात असत. बनारस येथे स्वामी 
दयानंद सरस्वती यांची भेट झाल्यानंतर ते आर्य समाज संस्थेत दाखल झाले होते. 18 डिसेंबर 1926 रोजी एका धर्मांध माथेफिरू तरुणाने त्यांच्या निवासस्थानी जाऊन बंदुकीची गोळी झाढून त्यांची हत्या केली. या घटनेच्या निषेधार्थ सोलापुरात बंद पाळण्यात आला होता. त्या दिवशी सोलापुरातील कै. सिद्रामप्या फुलारी, कै. रेवणसिद्धप्पा खराडे, कै. नागण्णा शरणार्थी, कै. नागय्या धोत्री, कै. इरय्या कोरे आदींनी त्रिपुरांतकेश्वर देवालयात एकत्रित येऊन त्यांची स्मृती व कार्य नागरिकांसमोर ठेवण्यासाठी श्रद्धानंद समाजाची स्थापना केली. श्रद्धानंद समाजाची स्थापना झाल्यानंतर केवळ गणेशोत्सव साजरा न करता तरुणांमध्ये उत्साह, आत्मविश्वास व राष्ट्रप्रेम निर्माण करण्याच्या उद्देशाने कै. सिद्रामप्पा फुलारी यांनी लाठी, तलवार व दांडपट्टा चालविण्याचा वर्ग सुरू करून त्यांचे प्रशिक्षण दिले. त्यामुळे कार्यकर्त्यांची नवी फळी उभी राहिली. श्रद्धानंद समाजातर्फे व्यायामशाळा ही 1942 मध्ये सुरू करण्यात आली. यामध्येही कै. सिद्रामप्पा फुलारी यांचे योगदान खूप मोलाचे आहे. त्या व्यायामशाळेचे व्यवस्थापक म्हणून हुतात्मा कै. मलप्पा धनशेट्टी हे होते. कै. सिद्रामप्पा फुलारी यांनी तरुणांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी सतत 52 तास लाठी फिरविण्याचा विक्रम सोलापुरातील सिद्धेश्वर मंदिरात केला होता. श्रद्धानंद समाजाच्या निर्मितीत व उभारणीत कै. सिद्रामप्पा फुलारी, कै. पंचप्पा जिरगे, कै. रेवणसिद्धप्पा खराडे, कै. इरप्पा कोरे, कै. बाबूराव कावळे, कै. गंगाधर हब्बू, कै. डॉ. चिकवीरय्या नंदीमठ, कै. बाबूराव विंचूरकर, कै. गुंडला, कै. लक्ष्मणराव भांबुरे, कै. गुंडप्पा उंबरजे, कै. सिद्रामप्पा गुज्जे, कै. शिवशंकरअप्पा पटणे, कै. मल्लिकार्जुनअप्पा देशमुख, कै. वेंकप्पा वडजे, कै. तात्याबा सलगर, कै. काशिनाथ महिंद्रकर, कै. रामभाऊ कळमणकर, कै. रामभाऊ निंबर्गीकर, कै. शिवप्पा साबळे, कै. रामभाऊ नायडू, कै. बाबूराव लालबोंदे, कै. विश्वनाथ मंठाळकर, कै. नागनाथ रसाळे, कै. विश्वनाथ बनशेट्टी आदींचा वाटा आहे. ब्रिटिशांनी श्रद्धानंद समाजाच्या कार्यावर स्वातंत्र्य चळवळीच्या कार्यावर बंदी घातल्यानंतर सर्व कागदपत्रे जाळण्यात आली होती. महात्मा गांधींना अटक झाल्यानंतर कायदेभंगाची चळवळ चालू राहण्यासाठी शेठ गुलाबचंद वालचंद यांनी श्रद्धानंद समाजाच्या कार्यकर्त्यांना आर्थिक मदत करून स्वातंत्र्य चळवळीला चांगला हातभार लावला. 

गणेशोत्सवातील मेळे गाजले 
कै. कवी संजीव, कै. अंबण्णा शेडजाळे, कै. श्‍याम सांगळे, कै. शिवलिंगप्पा जिरगे, कै. चिंकवीरय्या स्वामी, कै. माधवराव दीक्षित यांच्या उत्तमोत्तम संवादामुळे त्या काळात हे मेळे खूप लोकप्रिय झाले. संभाजी महाराजांचा वध, आग्य्राहून सुटका, बाजीप्रभू आदी विषयांवर मेळे झाले. तर महाराष्ट्राचा मुकूट, तेजस्वी तारा, कित्तूरचन्नम्मा ही नाटके श्रद्धानंद समाजाच्या गणेशोत्सवात सादर करण्यात आली. 

सामाजिक बांधिलकीची जाणीव करून देणारा आजोबा गणपती 
स्वातंत्र्यतेच्या आंदोलनाबाबत राष्ट्रीय भावना जागविण्यासाठी लोकमान्य टिळकांनी 1893 मध्ये महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरवात केली. मात्र त्याआधी 1885 पासून सोलापुरात आजोबा गणपतीच्या रूपाने सार्वजनिक गणेशोत्सवाला प्रारंभ झाला होता. लोकमान्य टिळक सोलापुरात कै. अप्पासाहेब वारद यांच्याकडे आले असताना, शुक्रवार पेठेतील आजोबा गणपती उत्सवात पानसुपारी कार्यक्रमास उपस्थित राहिले. कार्यक्रमासाठी एकत्रित येणारे नागरिक पाहून टिळकांना सार्वजनिक गणेशोत्सवाची कल्पना सुचली, असे जुन्या पिढीतील लोकांकडून सांगण्यात येते. यावरून सार्वजनिक गणेशोत्सव या संकल्पनेचा उगम आजोबा गणपती ट्रस्टकडून झाला आहे, असे म्हणता येईल. 

सामाजिक बांधिलकी जपणारा आजोबा गणपती 
सध्या सगळीकडेच इको-फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्याची मागणी होत आहे. मात्र 135 वर्षांपूर्वीच सोलापूरच्या आजोबा गणपती ट्रस्टने या संकल्पनेची मुहूर्तमेढ रोवली. 1885 मध्ये रद्दी कागद, कामट्या व खळ, डिंक, कापड आदी पर्यावरणपूरक साधनांचा वापर करून "श्रीं'ची सुंदर व सुबक मूर्ती तयार करण्यात आली. खऱ्या अर्थाने इको-फ्रेंडली गणेशोत्सव या संकल्पनेचा उद्‌गाता देखील आजोबा गणपती आहे व ते भारतातील पहिले इको-फ्रेंडली म्हटल्यास वावगे ठरणार नाही. 1885 सालची मूर्ती जुनी झाल्याने 1983 मध्ये केरळच्या कलाकारांकडून तणस, गूळ, कापड, गवत, शाडू, डिंक या साहित्याचा वापर करून शास्त्रशुद्ध पद्धतीने मूर्ती बनवण्यात आली. केवळ सुरवात न करता इको-फ्रेंडली गणेशोत्सवाचा आजपर्यंत अवलंबन करण्याचा आदर्श सार्वजनिक आजोबा गणपती ट्रस्टने गणेशोत्सव मंडळांसमोर ठेवला आहे. लोकमान्य टिळकांनी राष्ट्रीय ध्येय समोर ठेवून गणेशोत्सवाला प्रारंभ केला. मात्र स्वातंत्र्यप्राप्ती झाल्यानंतर विविध सामाजिक कार्यांतून आजोबा गणपतीने समाजाशी असलेली सामाजिक बांधिलकी जपली. आजोबा गणपतीने सामाजिक बांधिलकी जपत असताना इतर गणेशोत्सव मंडळांना सामाजिक बांधिलकीची जाणीवही करून दिली, असे या ठिकाणी म्हणता येईल. 

आजोबा गणपतीतर्फे सामाजिक उपक्रम 
आजपर्यंत अनेक सामाजिक उपक्रम ट्रस्ट राबवित आहे. त्यामध्ये नैसर्गिक आपद्‌ग्रस्तांना मदत, गरीब रुग्णांना आर्थिक व वैद्यकीय मदत, कुष्ठरोग्यांना मिष्टान्न वाटप, बालसुधारगृहामध्ये फळेवाटप, मुक्‍या जनावरांसाठी पाणपोई, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, लर्निंग लायसन्स शिबिर, वृक्षारोपण, ऐच्छिक रक्तदान, स्त्री-भ्रूणहत्याविरोधी जनजागरण, लेक वाचवा, पाणी वाचवा, जल पुनर्भरण, स्त्रियांवरील अत्याचार या विषयांवर जनजागृती, समाजातील विविध यशवंत मान्यवरांचा सत्कार, किल्लारी येथील भूकंपग्रस्तांना मदत, पशू-पक्ष्यांसाठी पाणपोई, रक्तदान शिबिर, मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर, तुळजापूर, श्रीशैल, गुड्डापूर, 68 लिंग येथे जाणाऱ्या भाविकांना प्रसादवाटप, श्री सिद्धेश्वर महाराजांच्या पालख्या, चन्नवीर शिवाचार्य आत्मज्योत आदी यात्रांचे स्वागत, दुर्धर आजाराने त्रस्त रुग्णांना मदत अशा सामाजिक उपक्रमांची रेलचेल आजोबा गणपती ट्रस्टच्या कार्यात आपल्याला पाहावयास मिळते. आगामी काळात आजोबा गणपती आरोग्य सेवा केंद्र, आजोबा गणपती ध्यान मंदिर, आजोबा गणपती संस्कार केंद्र, आजोबा गणपती वसतिगृह आदी उपक्रम राबविण्याचा ट्रस्टचा मानस आहे. 

आजोबा गणपती मूर्तीची वैशिष्ट्ये 
आजोबा गणपतीची मूर्ती बैठी असून, तिचे चारही हात सुटे आहेत. डाव्या हातात मोदक आहे तर उजवा हात आशीर्वाद देत आहे. डोक्‍यावर सुंदर सोन्याचा मुकूट असून, 
सोंडेवर नक्षीकाम केले आहे. मूर्तीचे डोळे कमालीचे बोलके असून, या डोळ्यांमध्ये गणरायाची प्रसन्नता, सात्त्विकता आणि उदारता एकवटली आहे. भक्तांना या 
गणेशमूर्तीचे तेज जाणवते. सोन्याच्या विविध प्रकारच्या दागिन्यांनी मढवलेल्या मूर्तीचे वैभव दिसते. तसेच मूर्तीच्या बोलक्‍या डोळ्यांतून व्यक्त होणारे भावही अनुभवता येतात. दर्शनासाठी येणारे भाविक मूर्तीसमोर नकळतच नतमस्त होतात. 

आजोबा गणपतीचे 1994 मध्ये माणिक चौक येथे स्वतःच्या जागेत आकर्षक मंदिर उभारण्यात आले, तेव्हापासून मंदिरात नित्यनियमाने शास्त्रोक्त पद्धतीने दररोज सकाळी व संध्याकाळी पूजा व आरती होते. या ठिकाणी गणेश चतुर्थी, संकष्टी चतुर्थी, अंगारकी चतुर्थी, गणेश जयंती, दसरा, दिवाळी, पाडवा, महाशिवरात्र या दिवशी हजारो भाविक दर्शनाला येतात. दर चतुर्थीला आजोबा गणपती महिला मंडळातर्फे अथर्वशीर्ष पठण केले जाते. 

सध्या आजोबा गणपती ट्रस्टचे अध्यक्ष ऍड. गौरीशंकर फुलारी, उपाध्यक्ष चिदानंद वनारोटे, सचिव अनिल सावंत, सहसचिव कमलाकर करमाळकर, कोषाध्यक्ष चंद्रकांत 
कळमणकर व प्रसिद्धिप्रमुख सिध्दारूढ निंबाळे हे कामकाज पाहात आहेत. इतकेच नव्हे तर शहरातील मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीतही आजोबा गणपतीला मान आहे. मिरवणुकीत सर्वांत शेवटचा मानाचा गणपती हा आजोबा गणपती असतो. विविध सोन्या-चांदीची आभूषणे, कपडे परिधान केलेला आजोबा गणपती हा मिरवणुकीचा मानबिंदू ठरतो. मिरवणूक मार्गावर शेकडोंच्या संख्येने पूजा केल्या जातात. अग्रभागी तरुणांचा लेझीम ताफा व युवक-युवतींचे ढोल व ताशांचे पथक असते. एकसारखा गणवेश व शांततेने लेझीम व ढोल खेळणारे उत्साही व शिस्तप्रिय तरुण, मर्यादित आवाजातील वाद्यवृंद या गोष्टींमुळे पाहणाऱ्यांच्या डोळ्यांचे 
पारणे फिटल्याशिवाय राहात नाही.

loading image
go to top