सिंधुदुर्ग : ओटवणेतील कुळाचा गणपतीची साडेचारशे वर्षांची परंपरा 

महेश चव्हाण
Friday, 6 September 2019

सिंधुदुर्ग -  ओटवणे गावाच्या एकतेचे प्रतिक म्हणून येथील कुळघरातील अर्थात गावच्या गणपती उत्सवाचे पाहिले जाते. जवळपास साडेचारशे वर्षाची परंपरा असलेल्या या गणेशोत्सवाला गावात खूप मोठे महत्त्व आहे. 

सिंधुदुर्ग -  ओटवणे गावाच्या एकतेचे प्रतिक म्हणून येथील कुळघरातील अर्थात गावच्या गणपती उत्सवाचे पाहिले जाते. जवळपास साडेचारशे वर्षाची परंपरा असलेल्या या गणेशोत्सवाला गावात खूप मोठे महत्त्व आहे. 

सुमारे साडेचारशे वर्षापूर्वीची ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या ओटवणे गावाची धार्मिकता सर्वानच परिचीत आहे. येथील प्रत्येक कार्यात धार्मिकतेचा विविधांगी अंश दिसून येतो. ओटवणे कुळघर येथे स्थानापन्न झालेली श्रींची मुर्ती ही अशाच आगळ्या वेगळ्या धार्मिकतेचे प्रतिक आहे. 

ओटवणे गावप्रमुख मानकरी रविंद्र गांवकर यांच्या निवासस्थानी म्हणजे कुळघराकडे स्थानापन्न होणाऱ्या मुर्तीला कुळाचा गणपती तसेच गावाचा गणपती म्हणून संबोधले जाते. 
गांवकर घराण्याची 5 वी पिढी म्हणजे सुमारे 18 व्या शतकाच्या उत्तरार्धातात या गावाच्या सार्वत्रिक गणपती पूजनाला सुरुवात झाली असावी असे जाणकार सांगतात.काळाच्या ओघात बाप्पाच्या मुर्ती पूजनाची संख्या वाढत गेली. तरी कुळाचा म्हणजे गावाचा गणपती त्यावेळी गावात एकमेव होता. 
ओटवणे गावाच्या गणपतीची धार्मिकता ही विशेष आहे.

या मुर्तीच्या मातीच्या गोळ्यापासून ते विसर्जनापर्यंत विविध धार्मिक चालिरीती दिसून येतात. ही मुर्ती बनविण्यासाठी घेण्यात येणाऱ्या मातीच्या गोळ्याची विधिवत पूजा करण्यात येते. तसेच ही मुर्ती घडविण्यासाठी सुद्धा पौर्णिमा, नागपंचमी, गोकुळअष्टमी आदी दिवसातील मुहुर्तावरच तिची घडवणूक केली जाते. तर मुर्तीच्या रंगकामात देखील विशेषतः आढळून येते. रक्तवर्णस्वरूपाची मुर्ती असलेल्या या गावाच्या गणपतीचे रंगकाम गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी म्हणजे हरतालिकेच्या रात्री करण्यात येते.

सुर्यास्तानंतर या मुर्तीचे रंगकाम सुरू होते व सुर्योदयापूर्वी म्हणजे गणेश चतुर्थीच्या दिवशी रंगकाम पूर्ण करण्याची धार्मिक प्रथा आहे. मुर्तीचे रक्तवर्ण स्वरूपाचे रंगकाम पूर्ण झाल्यानंतर त्या मुर्तीच्या धार्मिकतेचे तेज अधिकच वाढते. अशा मुर्तीच्या नेत्राची रेखणी करण्यासाठी सुद्धा विशेष प्रथा येथे आहे. सुर्योदयापूर्वी रंगकाम पूर्ण झाल्यानंतर गावाचे प्रमुख मानकरी यांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन व श्रीफळ ठेवून (तळी ठेवून) नजर उघडली जाते. ही परंपरा आजही त्याच धार्मिकतेने सुरू आहे. 

रक्तवर्ण स्वरूपाचा गणपती 
गावाचा हा गणपती रक्तवर्ण स्वरूपाचा असल्याने त्याचे पावित्रय अधिक जपावे लागते. रक्तवर्ण म्हणजे लाल रंगाचा गणपती बाप्पाचा क्रोध उग्र असतो. त्यामुळे निटनेटकेपणा, स्वच्छता या बाप्पाजवळ अधिक बाळगली जाते. त्यामुळे अशा प्रकारच्या मुर्ती क्वचितच ठिकाणी असतात. तत्कालीन गावप्रमुख कै. गुणाजी गांवकर, त्यानंतर गावप्रमुख कै. बाबली गुणाजी गांवकर (न्हानगो दादा) व आता श्री रविंद्रनाथ बाबली गावकर अशी पिढी या गावाच्या गणपतीचे त्याच परंपरेने पूजन करीत आहे. 

गावाचा म्हणजेच कुळाचा गणपती नवसाला पावणारा गणपती असल्याची येथील भाविकांची धारणा आहे. त्यामुळे गावातील प्रत्येकाच्या घरी आता बाप्पाचे पूजन झाले तरी न चुकता गावाच्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी लोक आतुरलेले असतात. एवढेच नव्हे तर गावातील कुळाच्या परिसरातील येणारी भजन मंडळे भजनाची सुरूवात गावाच्या गणपतीपासूनच करतात. ही परंपरा आजही सुरू आहे. गावाचा या गणपतीची मुर्ती ओटवणेचे प्रसिद्ध कलावंत चंद्रकांत मेस्त्री यांच्या गणेशचित्र शाळेत बनविली जाते. तत्कालीन कै. गंगाराम मेस्त्री, त्यानंतर सिद्धहस्त मुर्तीकार शिल्पकारागिर कै.अनंत मेस्त्री व त्यानंतर त्यांचे पुत्र श्री. आनंद मेस्त्री ही तिसरी पिढी त्यांचा वारसा चालवित आहे. 

त्रिवेणी संगमावर मूर्तीचे विसर्जन 
गावाच्या म्हणजे कुळाच्या गणपतीचे विसर्जन हे सावंतवाडी राजेशाही संस्थानचे राजे श्रीमंत खेमा सावंत भोसले यांच्या समाधी स्थळाजवळील तेरेखोल नदी, गडनदी व दाभिल नदीच्या त्रिवेणी संगमावर करण्यात येते. कुळघर ते त्रिवेणी संगम असा दीड किलोमीटरचा प्रवास पालखी मिरवणुकीने या गणपतीचा करण्यात येतो. एवढा प्रवास लांब असून देखील गाडी वापरली जात नाही. 

रितीरीवाजाप्रमाणे साज 
आजच्या घडीला गणपती बाप्पा पूजनाला आणताना किंवा विसर्जनाला नेताना प्रवासासाठी गाडीचा सर्रास वापर केला जातो. तसेच आधुनिक डिजेचा साजही बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतो; पण ओटवणे गावाचा गणपती बाबतची धार्मिकता वेगळी आहे. या गणपतीचे विसर्जन करण्यासाठी पालखी स्वरूपात ढाचा तयार करून किंवा मूर्ती पालखीत बसवून खांद्यावरून विसर्जनाला न्यावी लागते आणि आजही ती नेली जाते. काही वेळा गाडीने नेण्याचा प्रयत्न केला गेला होता; परंतु प्रवासात अडचणी येत असल्याचे जाणकार सांगतात. तर विसर्जनावेळी ढोल ताशांचा मराठमोळा साज रितीरीवाजाप्रमाणे केला जातो.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sindhudurg Otavane Ganesh 450 years tradition special story