नरवण्याचा १६४ वर्षांचा गणेशोत्सव!

फिरोज तांबोळी
Wednesday, 4 September 2019

समाजप्रबोधनासाठी लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरू केला. मात्र, त्याही आधीपासून नरवण्यात सुरू असलेला गणेशोत्सव सामाजिक सलोखा जोपासत आहे. त्यामुळे संपूर्ण गाव एक कुटुंब बनलेले आहे.
- दत्ता काशीद, यात्रा समिती सदस्य, नरवणे

गोंदवले - ना आवाजाच्या भिंती...ना गुलालाची उधळण...गणेश मूर्तीदेखील इको फ्रेंडली आणि उत्सवात सर्वधर्मियांचा उत्स्फूर्त सहभाग, ही परंपरा तब्बल १६४ वर्षे नरवणे (ता. माण) येथे सुरू आहे. यंदाही टाळ-मृदंगाच्या गजरात ‘श्रीं’चे सर्वेश्वर मंदिरात आगमन झाले. यानिमित्ताने येथे मोठी यात्राही भरली आहे. शासनाकडून या उपक्रमाला प्रोत्साहन मिळण्याची गरज आहे. 

पूर्वी नारायणदेवाचे मंदिर असल्याने या भागाला नारायणवन म्हणून ओळखले जात असे. या वनावरूनच नरवण व पुढे नरवणे असे नाव पडलेले हे गाव. पूर्वीपासून अध्यात्म व वारकरी संप्रदायाचे वलय असलेल्या नरवण्याला अनेक संत, महात्म्यांचा सहवास लाभलेला आहे. हा वारसा आजही येथील ग्रामस्थांनी जपल्याचे पाहायला मिळते. याच नरवणेकरांनी ‘एक गाव, एक गणपती’ ची परंपरादेखील तब्बल १६४ वर्षे अखंडितपणे जोपासलेली आहे. गावातील लोक एकदिलाने एकत्रित यावेत, जातीभेद टाळावा, या उद्देशानेच १८५५ च्या सुमारास हा उत्सव सुरू करण्यात आल्याचे ग्रामस्थ सांगतात. ही परंपरा आजही येथे भक्तिभावाने जपली जात आहे.

गावाच्या मध्यवर्ती भागात सर्वेश्वर मंदिर असून, विविध देवतांसह श्री गणेशमूर्ती देखील मंदिरात आहे. गणेशोत्सवानिमित्त दरवर्षी येथे यात्रा भरते. ‘एक गाव, एक गणपती’ उपक्रमाबरोबर पर्यावरणातील प्रदूषण रोखण्यासाठी इको फ्रेंडली गणेशमूर्तीचा आग्रह अलीकडच्या काही वर्षांत शासनाने धरला आहे. त्यासाठी विविध बक्षीस योजनादेखील राबवून लोकांना व गावांना प्रोत्साहित केले जात आहे. नरवण्यात मात्र सुरवातीपासून स्थानिक कुंभारांकडून मातीची भरीव गणेशमूर्ती बनवली जाते. गावातील घराघरांतही मातीच्याच गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना केली जात असल्यामुळे अप्रत्यक्षपणे पर्यावरणाबाबत आगळा संदेश दिला जात आहे.

येथे पूर्वी गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी बैलगाडीचा वापर केला जात असे. आता मात्र स्थानिक धावड कलाकारांनी बनवलेल्या लाकडी रथातून ही मिरवणूक काढली जाते. त्यामुळे स्थानिक कलाकारांना व बलुतेदारांना मान देण्याची परंपरादेखील येथे जोपासली जात असल्याचे पाहायला मिळते.

आध्यात्माचा वारसा असल्यामुळे सुरवातीपासूनच टाळ-मृदंगाच्या गजरातच ‘श्रीं’चे आगमन आणि विसर्जन मिरवणूक काढली जाते. त्यामुळे आवाजाच्या भिंती आणि गुलालविरहित मिरवणुकीची परंपरादेखील येथे अबाधित राखली आहे.

गणेशोत्सवाच्या काळात पहाटे महापूजा, हरिनाम सप्ताह आदी कार्यक्रम सलग १३ दिवस सुरू असतात. या धार्मिक कार्यक्रमाबरोबरच दरवर्षी सांस्कृतिक कार्यक्रम व विविध मैदानी स्पर्धांचेही आयोजन करण्यात येते. अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी पौर्णिमेला सायंकाळी ‘श्रीं’ची मूर्ती विसर्जनासाठी रथात बसवली जाते. मिरवणुकीत दर्शनासह भारुडी भजनाने संपूर्ण रात्र जगविली जाते. पहाटे गणेश विसर्जन केले जाते. या सर्वच उपक्रमांत कोणताही भेदभाव केला जात नाही. सर्व जाती- धर्माच्या लोकांचा समावेश यात्रा समितीत असल्याने येथील हिंदू-मुस्लिम ऐक्‍यासह सामाजिक सलोखा पूर्वीइतकाच घट्टपणे टिकून आहे. नेमक्‍या कारणासाठी व योग्य पद्धतीने गणेशोत्सव साजरा करणारे आणि गावात एकही गणेश मंडळ नसणारे गाव म्हणून नरवण्याची वेगळी ओळख निर्माण झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganeshotsav 2019 Celebration Festival Narawane Village