Video : पाहा कोल्हापूर संस्थानचा खजिन्याचा गणेशोत्सव

सुधाकर काशिद
Monday, 2 September 2019

रणरागिणी ताराराणीच्या या संस्थानात तात्कालीन खजिन्यात गणेशोत्सव साजरा केला जायचा. ज्या ठिकाणी संस्थानकाळात नाणी तयार केली जायची तिथं गणपतीच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापणा केली जात होती. संस्थानकाळातील गणेशोत्सवाची ती परंपरा आजही कोल्हापुरात जपली जाते. 

कोल्हापूर : गणेशोत्सवाचा पारंपरिक बाज इतिहास जमा झाल्याचं अनेकदा आपल्याला पहायला मिळतं. पण, उत्सवाचं मूळ स्वरूप जपण्याचं कामही अनेक ठिकाणी केलं जातयं. कोल्हापूरचं संस्थान हे त्यापैकीच एक आहे. रणरागिणी ताराराणीच्या या संस्थानात तात्कालीन खजिन्यात गणेशोत्सव साजरा केला जायचा. ज्या ठिकाणी संस्थानकाळात नाणी तयार केली जायची तिथं गणपतीच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापणा केली जात होती. संस्थानकाळातील गणेशोत्सवाची ती परंपरा आजही कोल्हापुरात जपली जाते. 

आधुनिकतेची कास धरताना आपल्या परंपरांची जपणूक करणारं शहर म्हणून कोल्हापूरची ओळख सांगितली जाते. जागतिकीकरण, नवं तंत्रज्ञान या सगळ्याचा मारा झाल्यानंतरही या शहरानं आपलं जुनं पण जपलंय. त्यामुळचं हे शहर आजही इतरांसाठी आकर्षण ठरत असतं. कोल्हापुरातील राजघराणं असेल किंवा सामान्य व्यक्ती प्रत्येकजण आपल्या परंपरा जपण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असतो. अशी गणेशोत्सवाची एक परंपरा कोल्हापूरच्या राजघराण्यानं जपली आहे.

संस्थानकाळात खजिन्याच्या जागी गणेशोत्सव व्हायचा. आता संस्थान नाही. पण, सध्याचे श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या नेतृत्वाखालील शहाजी ट्रस्टच्या वतीने खजिन्याच्या गणेशोत्सवाची परंपरा जपली जाते. अत्यंत साध्या पद्धतीने संस्थानकालीन खजिन्याच्या खोलीत गणेश मूर्तीची स्थापना होते.अंबाबाई मंदिर परिसरातील जुना राजवाडा पोलिस ठाण्यातच ही खजिन्याची खोली आहे. कोल्हापूरचे ज्येष्ठ पत्रकार आणि सकाळचे मुख्य प्रतिनिधी सुधाकर काशिद यांनी या खजिन्याच्या गणेशोत्सवाची परंपरा या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितली आहे. कोणत्याही झगमगाटाशिवाय पारंपरिक पद्धतीने हा गणेशोत्सव साजरा होतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: khajina Ganesh Celebration at Kolhapur