गणेशोत्सव2019 : विसर्जन मिरवणुकीची उत्साहात सांगता

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 14 September 2019

सकाळी ढोल - ताशांच्या निनादात आणि गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात कर्वे रस्त्यावरील विसर्जन मिरवणुकीला सुरवात झाली. सायंकाळी विविध गाण्यांच्या तालावर थिरकत तरुणाईने आपल्या लाडक्‍या बाप्पाला जड अंतःकरणाने निरोप दिला. तब्बल चौदा तासांनंतर रात्री दोन वाजता मंगलमय वातावरणामध्ये उत्सवाची सांगता झाली.

गणेशोत्सव2019 : कोथरूड - सकाळी ढोल - ताशांच्या निनादात आणि गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात कर्वे रस्त्यावरील विसर्जन मिरवणुकीला सुरवात झाली. सायंकाळी विविध गाण्यांच्या तालावर थिरकत तरुणाईने आपल्या लाडक्‍या बाप्पाला जड अंतःकरणाने निरोप दिला. तब्बल चौदा तासांनंतर रात्री दोन वाजता मंगलमय वातावरणामध्ये उत्सवाची सांगता झाली.

कर्वे रस्त्यावर सुरू असलेल्या मेट्रो प्रकल्पाच्या कामामुळे तसेच ध्वनिवर्धक भिंतींच्या बंदीमुळे सुमारे तीसहून अधिक मंडळांनी यंदाही मिरवणुकीत सहभाग घेतला नाही. दुपारी बाराच्या सुमारास विसर्जन मिरवणुकीस सुरवात झाली. खिलारेवाडीतील अमृत मित्र मंडळाच्या पारंपरिक ढोल- ताशांच्या गजरात मिरवणुकीस प्रारंभ झाला.

दशभुजा मित्र मंडळ, जय श्रीराम मित्र मंडळ, शिवशक्ती मित्र मंडळ, राजबाग मित्र मंडळ, देशप्रेमी मित्र मंडळ, कुमार युवक मंडळ, भैरवनाथ तरुण मंडळ, शिवशक्ती मित्र मंडळ, शिवांजली मित्र मंडळ, एरंडवणे मित्र मंडळ, जयदीप मित्र मंडळ आदी मंडळांनी मिरवणुकीत रंगत आणली. 
 
गर्दीने फुलला कर्वे रस्ता
ध्वनिवर्धक भिंतीवरील बंदीच्या निषेधार्थ अनेक मंडळांनी पारंपरिक पद्धतीने ढोल- ताशाच्या आवाजात होणारी मिरवणूक रद्द करून सायंकाळी गाण्यांच्या दणदणाटामध्ये मिरवणूक काढल्याने सायंकाळी कर्वे रस्त्यावर प्रचंड गर्दी झाली होती. पौड फाटा चौक ते खंडोजीबाबा चौक परिसर गर्दीने फुलून गेला होता. रात्री दहा वाजता तर गर्दीने उचांक गाठला.  

कोथरूड नियोजन समितीची मदत 
कर्वे रस्त्यावरील विसर्जन मिरवणुकीत पोलिसांच्या आणि प्रशासकीय यंत्रणांच्या खांद्याला खांदा लावीत कोथरूड गणेशोत्सव नियोजन समितीच्या सभासदांनी पोलिस आणि गणेशोत्सव मंडळे यातील समन्वयकाची जबाबदारी पार पाडली. मिरवणुकीत होणाऱ्या किरकोळ वादाचे प्रसंग मिटविण्यात समितीला यश मिळाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganeshotsav 2019 Ganpati Visarjan Karve Rasta