गणेशोत्सव2019 : लोणावळ्यात डीजेविरहित मिरवणूक

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 14 September 2019

ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण, पावसाच्या सरींची साथ अशा वातावरणात ‘गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या’ असा जयघोष करीत गणरायाला निरोप देण्यात आला. डीजेविरहित सात तास चाललेली मिरवणूक हे मिरवणुकीचे वैशिष्ट्य ठरली.

लोणावळा - ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण, पावसाच्या सरींची साथ अशा वातावरणात ‘गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या’ असा जयघोष करीत गणरायाला निरोप देण्यात आला. डीजेविरहित सात तास चाललेली मिरवणूक हे मिरवणुकीचे वैशिष्ट्य ठरली.

भांगरवाडीतील मारुती मंदिराजवळच्या इंद्रायणी नदी घाटावर विसर्जनाची सोय करण्यात आली होती. बहुतेक मंडळांनी येथे येथील पात्रात तसेच तलावात, तसेच नगर परिषदेने केलेल्या विसर्जन हौदात मूर्तींचे विसर्जन केले. मानाचा पहिला गणपती असलेल्या रायवूड सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात लोणावळा उपविभागीय पोलिस अधिकारी नवनीत कावत यांच्या हस्ते आरती झाली. दुपारी साडेतीन वाजता मार्गस्थ होऊन रायवूड मंडळ सायंकाळी पाच वाजता मावळा पुतळा चौकात दाखल झाले. 

नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील, नगरसेवक राजू बच्चे, मुख्याधिकारी सचिन पवार, माजी नगरसेवक विलास बडेकर, प्रमोद गायकवाड यांच्या हस्ते पूजा झाली. मानाचा दुसरा श्री तरुण मराठा मंडळ, मानाचा तिसरा संत रोहिदास मित्र मंडळ त्यानंतर गवळीवाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, वळवण येथील शेतकरी भजनी मंडळाचे गणपती विसर्जन मिरवणुकीत दाखल झाले. रात्री सातच्या सुमारास मानाच्या पहिल्या रायवूड गणेश मंडळाचे छत्रपती शिवाजी महाराज चौकात आगमन झाले. मानाचे पाचही गणपती येथून विसर्जनसाठी मार्गस्थ झाले. तानाजी युवक मंडळ, नेहरू मित्र मंडळ, इराणी चाळ मित्र मंडळाने मिरवणुकीस फाटा देत स्वतंत्र मिरवणूक काढली. ओंकार मित्र मंडळ, शिवाजी मित्र मंडळ, अष्टविनायक, राणाप्रताप नेताजी, शिवाजी उदय मित्र मंडळ, भोमे मंडळ, साई आझाद मित्र मंडळ, महात्मा फुले फळ-भाजी मंडई, इंद्रायणीनगर मित्र मंडळ, महाराष्ट्र मातंग समाज मंडळाच्या वतीने आकर्षक रथ सजविण्यात आले होते. 

छत्रपती शिवाजी पुतळा चौकात लोणावळा नगर परिषदेच्या वतीने स्वागत करण्यात येत होते. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे आदी पक्षांसह सत्यनारायण मंदिर कमिटी, स्वाभिमानी संघटना, मावळ वार्ता फाउंडेशनच्या, महिला दक्षता समिती वतीने मंडळांचे स्वागत करीत मंडळांच्या अध्यक्षांचा सन्मान केला. 

शिवसेनेच्या वतीने भाविकांना अन्नदान, लायन्स क्‍लब लोणावळा-खंडाळाच्या चहा तसेच रामदेव बाबा भक्त मंडळाच्या वतीने प्रसादाचे वाटप झाले. लायन्स सुप्रीमोज्‌च्या वतीने यंदा मूर्तीदानाचा उपक्रम राबविला.

लोणावळा पोलिस उपविभागीय पोलिस अधिकारी नवनीत कावत, पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganeshotsav 2019 Ganpati Visarjan Without DJ Lonavala