पारंपरिक कला जोपासत गणेशोत्सव

सकाळ वृत्तसेवा
Friday, 6 September 2019

जसजसा काळ पुढे सरकत गेला तसतसा गणेशोत्सवाच्या सजावटीत आधुनिकतेचा साज वाढत गेला. तेल-तुपाच्या दिव्यांची जागा चायनीज इलेक्‍ट्रिक तोरणांनी घेतली. पाना-फुलांच्या सजावटीची जागा थर्माकोलच्या मखरांनी घेतली, पण आजही आगरी-कोळी कुटुंबात गणेशोत्सव पूर्णतः पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहाने व भक्तिभावाने साजरा केला जातो.

ठाणे - जसजसा काळ पुढे सरकत गेला तसतसा गणेशोत्सवाच्या सजावटीत आधुनिकतेचा साज वाढत गेला. तेल-तुपाच्या दिव्यांची जागा चायनीज इलेक्‍ट्रिक तोरणांनी घेतली. पाना-फुलांच्या सजावटीची जागा थर्माकोलच्या मखरांनी घेतली, पण आजही आगरी-कोळी कुटुंबात गणेशोत्सव पूर्णतः पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहाने व भक्तिभावाने साजरा केला जातो.

भिवंडीतील वळगाव येथील कलाकार हेमंत पाटील यांनी आपल्या घरी बाप्पाची प्रतिष्ठापना करताना डोळ्यांची पारणे फेडणारी परंपरागत इकोफ्रेंडली सजावट केली आहे. घरी येणाऱ्या पाहुण्यांचे आदरातिथ्य करण्यात आगरी-कोळी समाज नेहमीच एक पाऊल पुढे असतो. मग वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर घरी येणाऱ्या लाडक्‍या गणरायाचे आदरातिथ्य करण्यात तो कसा मागे राहील. भिंतीवर, कपड्यांवर, नैसर्गिक रंगांनी रंगीबेरंगी पाना-फुलांची चित्रे रंगवून गणरायाची त्यात प्रतिष्ठापना करण्याची पद्धत आगरी-कोळी समाजात फार पूर्वीपासून आहे. हीच पारंपरिक कला हेमंत पाटील यांनी जोपासली आहे. डोळ्यांची पारणे फेडणाऱ्या परंपरागत इकोफ्रेंडली सजावट पाहावयाची असल्यास गणेशोत्सवास नक्की भेट द्या, असे आवाहन हेमंत यांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganeshotsav celebrates traditional art