गणपतीच्या मातीतून फुलविली परसबाग 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 6 September 2019

पर्यावरण विषय शिकविताना शिक्षकांमार्फत मोठमोठे दाखले आणि उदाहरणे विद्यार्थ्यांना दिले जातात. अनेकांचे पर्यावरण प्रेम शाळेपुरतेच मर्यादित असते. मात्र, शुभांगी तिवारी या शिक्षिका त्यास अपवाद असून त्यांनी मातीच्या गणपतीची स्थापना करून विसर्जनानंतर त्याच्या मातीतून परसबागच फुलविली आहे. 

नागपूर - पर्यावरण विषय शिकविताना शिक्षकांमार्फत मोठमोठे दाखले आणि उदाहरणे विद्यार्थ्यांना दिले जातात. अनेकांचे पर्यावरण प्रेम शाळेपुरतेच मर्यादित असते. मात्र, शुभांगी तिवारी या शिक्षिका त्यास अपवाद असून त्यांनी मातीच्या गणपतीची स्थापना करून विसर्जनानंतर त्याच्या मातीतून परसबागच फुलविली आहे. 

शुभांगी तिवारी या १९९९ साली घाटंजी येथील श्रीसमर्थ हायस्कूलमध्ये विज्ञान विषयाच्या शिक्षिका म्हणून रुजू झाल्या. २००० साली सरकारने पर्यावरण हा विषय अभ्यासक्रमात टाकला. त्यामुळे हा विषय शिकविण्याची जबाबदारी त्यांच्यावर आली. पर्यावरणसंवर्धन हा विषय केवळ पुस्तकातून शिकविण्यापेक्षा त्यांनी कृतीतूनच उतरविण्याचा प्रयत्न केला. प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा गणपतीऐवजी घरीच मातीचे गणपती तयार करीत, त्यांना तलाव वा नदीत विसर्जित करण्याऐवजी घरात एका बादलीत विसर्जित करण्यासाठी पुढाकार घेतला. विसर्जित झालेल्या गणपतीची माती एकत्रित करून त्या मातीचा उपयोग विविध फुले आणि झाडांच्या कुंड्यांसाठी केला. या उपक्रमातून चार ते पाच वर्षांतच त्यांनी घाटंजी येथील घरी परसबाग फुलविली. त्यांचा उपक्रम गावकऱ्यांनी बघून स्वत:ही अशाचप्रकारे झाडे लावण्यास सुरुवात केली. केवळ मातीचा  गणपतीच नव्हे तर त्यावेळीच त्यांनी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून प्लॅस्टिक जमा करण्याचे काम सुरू केले होते. दोन वर्षांपूर्वीच त्या सेवानिवृत्त झाल्यात. आता त्या मनीषनगर येथील घरी वास्तव्यास आहे. मात्र, याठिकाणीही त्यांनी हा उपक्रम सुरू ठेवला असून घरच्या गणपतीच्या मातीचा उपयोगाने तीन ते चार कुंड्यांत मोगरा, इन्सुलीन प्लान्ट आणि चाफ्याची रोपटी फुलविली आहे. शिवाय त्याच्या निर्माल्यापासून खतही तयार करण्यास सुरुवात त्यांनी केली आहे. 

पर्यावरण वाचविण्याची जबाबदारी प्रत्येक व्यक्तीची आहे. ती ओळखूनच या उपक्रमास वीस वर्षांपूर्वीच सुरुवात केली. गणेशोत्सवातून पर्यावरणाला हानी होऊ नये यासाठी नागरिकांनीही पुढाकार घेण्याची गरज आहे.  
- शुभांगी तिवारी,  सेवानिवृत्त शिक्षिका.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: garden through Ganapati soil