
जागविल्या गावाकडील आठवणी
औरंगाबाद- शहरात स्थायिक झालो तरी गावाकडची ओढ स्वस्थ बसू देत नाही; पण वाढत्या आधुनिकीकरणामुळे गावाचे गावपण हरवत आहे. त्यातच गाव उत्सव, जुन्या प्रथा, परंपराही लुप्त होत आहेत. स्वाभाविकच आताच्या 10-15 वर्षे वयोगटातील मुलांना त्याबद्दल माहिती नाही. ही माहिती त्यांना मिळावी अन् गावाकडील आठवणीही जपल्या जाव्या, या हेतूने ठाकरेनगरातील शारदा देशमुख यांनी यंदा गौरीच्या सजावटीतून 'गावजत्रा' हा देखावा साकारला आहे.
गौरी-गणपती हा केवळ एक धार्मिक उत्सव नाही तर या माध्यमातून कुटुंबातील सदस्यच नाही तर शेजारी, मित्र परिवारही एकत्र येतो. उत्सव काळात ताणतणाव, हेवेदावे विसरले जातात. त्यामुळे सामाजिक भावना वाढीस लागते. याच उत्सवात साकारलेल्या देखाव्यातून जनजागृतीही केली जाते. ठाकरेनगरातील देशमुख कुटुंबही दरवर्षी वेगवेगळे देखावे, सजावटी करून महत्त्वाचे विषय समोर आणते. यंदा या कुटुंबाने गावजत्रा या संकल्पनेवर गौरीची सजावट केली आहे. परिसरात हा देखावा कौतुकाचा विषय ठरला आहे. या सजावटीसाठी जयराज देशमुख, हर्षद देशमुख, पुष्पा शेळके, वंदना देशमुख, मयूरी देशमुख, मैथिली देशमुख, पूजा विटोरे, शर्वरी देशमुख यांनी पुढाकार घेतला.
एक हजार वस्तूंचा वापर
अत्यंत सुंदर आणि आकर्षक पद्धतीने मांडलेला हा देखावा सर्वांना गावाकडच्या जत्रेत घेऊन जातो. या देखाव्यात त्यांनी जत्रेतील प्रत्येक छोटी-मोठी वस्तू मांडण्याचा प्रयत्न केला आहे. यात त्यांनी बांगड्या, कपडे, खेळणी, पूजेचे साहित्य विक्री करणाऱ्या महिला, त्यांची खेळत असलेली लहान मुले, हॉटेल, खेळणीच्या दुकानांचे तंबू, फुगे विक्रेता, देवीचे गडावरील मंदिर, रहाटपाळणे, मिठाई विक्रेते अशा जवळपास एक हजारांपर्यंत वस्तूंचा वापर करून ही सजावट करण्यात आली आहे. शिवाय सत्तरपेक्षा जास्त बाहुल्यांचाही वापर करण्यात आला आहे.