Ganesh Festival : सोशल मीडियावरही बाप्पाची धूम

संदीप लांडगे
Friday, 6 September 2019

आरती होतेय फेसबुकवर लाइव्ह; मोबाईलवर महामंत्र जप 

औरंगाबाद - पूर्वी गणपती बसवला की त्याला लायटिंग, झिरमाळ्या, विविध फुलांची सजावट असायची; मात्र बदलत्या काळात डिजिटलायझेशनमुळे सजावटीमध्ये विविधता आली आहे. सोशल मीडियावरही आपल्या घरी बसवलेला गणपती कशा पद्धतीने सजवला आहे, त्याचे व्हिडिओ, छायाचित्र, फेसबुक, व्हॉट्‌सऍप, इन्स्टाग्रामवर अपलोड करून लाइक्‍स मिळवले जात आहेत. दरम्यान, अनेक मंडळे आरतीचे फेसबुक लाइव्ह करीत आहेत तर काही ठिकाणी मोबाईलवर महामंत्र जप ऐकायला मिळत आहे. 

शहरातील विविध गणेश मंडळांनी यंदा विविध सजावटी केल्या असल्या तरी त्यामध्ये डिजिटल स्क्रीनचा वापर करून गणपतीला अंतराळात पाठवले आहे. दुसरीकडे डिजिटलायझेशनमुळे गणपतीची सर्व गाणी आता ऑनलाइनच्या माध्यमातून मिळत असल्याने पेन ड्राइव्ह, विविध मोबाईल ऍप्सला मोठ्या प्रमाणात महत्त्व प्राप्त झाले आहे. परिणामी सीडी, डीव्हीडीला मात्र अडगळीची जागा मिळाली आहे. दरवर्षी गणेशोत्सवासाठी काही कंपन्या खास गणपतीची लोकप्रिय गाण्यांच्या चालीवरील जुनी गाणी नव्या डीजे स्वरूपात तयार करून व्हायरल होताना दिसत आहेत. मोबाईलच्या प्लेस्टोअरवर गाणी, गणपतीचे थ्रीडी, फोरडी फोटो, आरती, भक्तिगीते, डेकोरेशन उपलब्ध असल्याने याचा हवे तेव्हा मंडळाने बसवलेल्या गणपतीच्या पाठीमागे डिजिटल स्क्रीन बदलून आरास, डेकोरेशन बदलता येत आहे. त्यामुळे गणपतीला आधुनिकतेची जोड मिळाल्याने यंदा गणपती उत्सव आधुनिक बनला आहे. 
 
डिजिटल स्क्रीनवर गणपती 
आधुनिकतेच्या काळात सर्व काही सहज शक्‍य झाले आहे. बऱ्याच ठिकाणी गणपतीची मूर्ती न बसवता फक्त डिजिटल स्क्रीन लावून फोरडी, फाइव्ह डी स्वरूपात गणपतीची स्थापना करण्यात आली आहे. या स्वरूपातील गणपतीमुळे प्रत्यक्षात गणपतीचे स्वरूप बदलणे, डेकोरेशन आपोआप बदलत आहे. त्यामुळे दहा दिवस हजारो प्रकारचे डेकोरेशन एका क्षणात बदलताना दिसत आहे. 
 
वॉलपेपर, प्रोफाईल पिक्‍चरवर गणपती 
व्हॉट्‌सऍप, फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटरवर अनेकांच्या प्रोफाईल पेजवर घरी बसवलेल्या गणपतीचा फोटो दिसत आहे. अनेकांनी शेअरचॅट, टिकटॉकवर घरी बसवलेल्या गणपतीचे व्हिडिओ अपलोड करून त्याला भक्तिगीतांची चाल लावून लाखोंच्या आसपास लाइक्‍स मिळवले आहेत. काही नेटिझन्सनी सोशल मीडियावर गणपतीचे फोटो स्टेटस म्हणून ठेवले आहेत.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganesh Festival on social media