
पर्यावरणाचे संरक्षण करत उत्सव साजरा करा हेच शास्त्र सांगते, असे मत व्यक्त करीत पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी कृत्रिम तलावातच विसर्जन करण्याचे आवाहन गणेशभक्तांनी केले...
मुंबई : गणेशमूर्तीचे विसर्जन पाण्यात करावे, असे शास्त्रामध्ये लिहिले आहे. त्यानुसार कृत्रिम तलाव, हौद किंवा घरच्या बादलीतील पाण्यात मूर्तीचे विसर्जन करता येते. त्यामुळे निसर्गाचा ऱ्हास होत नाही. पर्यावरणाचे संरक्षण करत उत्सव साजरा करा हेच शास्त्र सांगते, असे मत व्यक्त करीत पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी कृत्रिम तलावातच विसर्जन करण्याचे आवाहन केले.
शास्त्रानुसार गणेशमूर्ती मातीची व लहान असावी; परंतु आपल्याकडे मोठ्या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना केली जाते. अशा मूर्तींचे समुद्रात विसर्जन केले जात असल्याने जलप्रदूषण होते. अशा मूर्ती ‘पीओपी’च्या असल्याने त्यांचे विघटन होत नाही. पुण्यातही मोठ्या मूर्ती असतात; पण त्या केवळ मिरवणुकीपुरत्या. तिथे छोट्या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करून, त्यांचे विसर्जन करण्यात येते. असाच आदर्श मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी घ्यावा, असे मत दा. कृ. सोमण यांनी व्यक्त केले.
देवत्वाचे नव्हे; तर मूर्तीचे विसर्जन!
गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केल्यावर मूर्तीमध्ये देवत्व येते आणि उत्तरपूजा झाल्यावर ते संपुष्टात येते. त्यामुळे आपण गणेशमूर्तीतील देवत्वाचे नव्हे; तर केवळ मूर्तीचे विसर्जन करतो, असेही दा. कृ. सोमण यांनी संगितले.
भावनिकतेच्या मुद्द्यामुळे मर्यादा
केंद्रीय पर्यावरण व वने विभागाच्या जलप्रदूषण कायद्यांतर्गत १९७४ नुसार समुद्रात कोणत्याही प्रकारचा कचरा टाकण्यावर मनाई करण्यात आली आहे. कायद्याप्रमाणे एक लाखाचा दंड तर एक ते पाच वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाची तरतूद जलप्रदूषण कायद्यात आहे. महाराष्ट्रात गणेशोत्सव जल्लोषात साजरा होतो. इथे भावनिकतेच्या मुद्द्यामुळे कायद्याची अंमलबजावणी करण्यात अडथळा येत असल्याची कबुली महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (एमपीसीबी) अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे आम्ही पर्यावरणपूरक गणेशोत्सव, सजावट आदींबाबत जनजागृती करत आहोत. त्याला सर्व वयोगटांतून उत्तम प्रतिसाद मिळत आहे, अशी माहितीही ‘एमपीसीबी’च्या अधिकाऱ्यांनी दिली.
शाडूची माती अतिशय बारीक व चिकट असल्याने ती पाण्याला धरून ठेवते. पाण्यात गेल्यावर शाडूची माती पाणी शोषते आणि ते गढूळ करते. पाण्याची पारदर्शकता गेल्याने जलचरांच्या दृश्यमानतेवर परिणाम होतो. वनस्पती कुजल्यानंतर पाण्यातील ऑक्सिजन शोषून घेते. त्यामुळे शाडूची माती विशिष्ट प्रमाणातच पाण्यात मिसळली तरच जलप्रदूषण होत नाही.
- अविनाश कुबल, पर्यावरण तज्ज्ञ