गणरायाच्या आगमनाला खड्ड्यांचे विघ्न

सकाळ वृत्तसेवा
Monday, 2 September 2019

गणेशोत्सवाआधी पंधरा दिवस पालिका प्रशासनाकडून खड्डे बुजवण्याचा केविलवाणा प्रयत्न करण्यात आला; मात्र गणरायाच्या आगमनाच्या चार दिवस आधी वरुणराजाचेही पुन्हा आगमन झाले. त्यामुळे पालिका प्रशासनाकडून बुजवण्यात आलेले खड्डे पुन्हा उखडले. त्यामुळे गणरायाचे आगमन खड्डेमय रस्त्यातूनच होणार आहे.

नवी मुंबई : गणेशोत्सवाआधी पंधरा दिवस पालिका प्रशासनाकडून खड्डे बुजवण्याचा केविलवाणा प्रयत्न करण्यात आला; मात्र गणरायाच्या आगमनाच्या चार दिवस आधी वरुणराजाचेही पुन्हा आगमन झाले. त्यामुळे पालिका प्रशासनाकडून बुजवण्यात आलेले खड्डे पुन्हा उखडले. त्यामुळे गणरायाचे आगमन खड्डेमय रस्त्यातूनच होणार आहे. याबाबत गणेश भक्तांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

जून महिन्याच्या सुरुवातीला पावसाने दडी मारल्यांनतर यंदा दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्‍यता असताना, पालिकेकडून जुलै महिन्यापासून पाणीकपात करण्यात आली होती. जुलै महिन्यात संततधार सुरू असणाऱ्या पावसामुळे नवी मुंबईकरांची दाणादाण उडवली होती; तर ऑगस्ट महिन्यात नारळी पौर्णिमा झाल्यांनतर पावसाने पुन्हा विश्रांती घेतली होती; मात्र त्यानंतर पुन्हा संततधार सुरू असणाऱ्या पावसामुळे नवी मुंबईतील ठाणे-बेलापूर मार्ग, सायन-पनवेल मार्ग, एमआयडीसीतील रस्ते, तसेच पालिकेच्या आठही नोडमधील अंतर्गत डांबरी रस्त्यांना जीवघेणे खड्डे पडले होते. यामुळे पालिकेचा कारभार चव्हाट्यावर आला होता. स्थायी समिती तसेच सर्वसाधारण सभेत लोकप्रतिनिधींनी पालिका प्रशासनाला खड्‌ड्‌यांचा जाब विचारत धारेवर धरले होते. पालिका प्रशासनानेदेखील गणेशोत्सवांनतर खडी व कच टाकून खड्डे बुजवण्याचा प्रयत्न केला. मात्र बुजवण्यात आलेल्या खड्डे पुन्हा उघडे पडले आहेत. त्यामुळे आता गणरायाला खड्डेमय रस्त्यांतूनच प्रवास करावा लागणार आहे.

शहरातील मुख्य रस्ते उघडे पडले
ऐरोली नॉलेज पार्क रस्त्याला पावसामुळे पुन्हा खड्डे पडले आहेत. ठाणे-बेलापूर रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या डांबराच्या पट्ट्याला जीवघेणे खड्डे पडले आहेत. एमआयडीसी परिसरात असणाऱ्या झोपडपट्टी भागात राहत असणाऱ्या इलठणपाडा, यादव नगर, चिंचपाडा, ऐरोली सेक्‍टर एक, तीन, घणसोली, जुईनगर, सानपाडा रेल्वे स्थानकासमोरील रस्त्यावरील खड्डे पडले आहेत.

गणेशोत्सव सुरू झाल्यानंतर पालिका प्रशासनाकडून सार्वजनिक मंडळांना परवानगी घेण्यासाठी तगादा लावला जातो; मात्र पालिकेने रस्त्यावरील खड्डे बुजवून मंडळांना दिलासा देणे गरजेचे आहे; तर गणेशाच्या आगमनावेळी चांगल्या स्थितीतील रस्ते देण्याची प्रशासनाची जबाबदारी आहे; मात्र याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे.
- अतुल आवरे पाटील, नागरिक.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The barrier of the pits on the arrival of ganesh festival