
गणरायाची आराधना करताना नैवेद्य म्हणून मोदकांप्रमाणेच बंगाली मिठाईचा वापर करण्याचे प्रमाण गणेशोत्सवात वाढले आहे. त्यामुळे बंगाली मिठाईचे भाव यंदा १० ते २० टक्क्यांनी वाढले आहेत.
नवी मुंबई : गणरायाची आराधना करताना नैवेद्य म्हणून मोदकांप्रमाणेच बंगाली मिठाईचा वापर करण्याचे प्रमाण गणेशोत्सवात वाढले आहे. त्यामुळे बंगाली मिठाईचे भाव यंदा १० ते २० टक्क्यांनी वाढले आहेत. या मिठायांमध्ये ड्रायफूटचे कलिंगडापासून, स्ट्रॉबेरीपर्यंत, पेढा, काजुकतरीपर्यंत विविध प्रकार बाजारात उपलब्ध आहेत.
दरवर्षी गणेशोत्सवात मराठमोळ्या घरांमध्ये गणपतीच्या आवडीचे उकडीचे किंवा तळणीचे मोदक बनवले जातात, पण आता तयार मोदक मिळू लागले असून, चॉकेलट, मावा, सुकामेवा अशा विविध पदार्थांनी बनवलेल्या मोदकांचाही वापर करण्यात येत आहे. मात्र आता बंगाली मिठाईही ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे. मोदकांबरोबरच काजुकतरी, मोतीचूर लाडू, कंदी पेढा, बागडी पेढा आदी पेढ्यांचे प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. या मिठाईलाही ग्राहकांची पसंती आहे.
मोदकांप्रमाणेच उकडीचे व तळणीच्या मोदकांप्रमाणेच स्पेशल केशरी मावा मोदक, स्पेशल ड्रायफ्रूट मोदक, स्पेशल काजू मोदक, स्पेशल अंजीर किंवा बटरस्कॉच मोदक, स्पेशल कंदी मावा मोदक आदी प्रकार विक्रेत्यांकडे उपलबध आहेत. ४०० ते ८०० रुपये किलो दराने ते बाजारात उपलब्ध आहेत. मलाई मोदकांमध्ये पिस्ता, स्ट्रॉबेरी, अंजीर, रोझ हे मोदक उपलब्ध आहेत. काजू मोदकांमध्ये काजूसोबत केशर, केवडा, गुलाब, खस यांचे अर्क मिसळलेले आहेत. हे मोदक ८०० ते १००० रुपये किलो दराने बाजारात मिळत आहेत.
२० टक्क्यांनी वाढ
साखर आणि गुळाच्या किमतीत वाढ झाल्याने, तसेच वाहतुकीचा खर्च यामुळे यंदा मिठाईच्या किमतीत २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. पाच किंवा दहा दिवस गणपती असतात. तेव्हा दररोज वेगवेगळ्या चवीचे मोदक हल्लीच्या तरुणाईला हवे असतात. त्यामुळे तशा स्वरूपाची मागणी असल्याचे विक्रत्यांनी सांगितले.