गणेशोत्सवातील गर्दीवर ड्रोनची नजर

गणेशोत्सवात कडेकोट बंदोबस्त
गणेशोत्सवात कडेकोट बंदोबस्त

मुंबई : विघ्नहर्त्याच्या स्वागतासाठी भक्त सज्ज झाले असतानाच, गणेशोत्सवाच्या काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मुंबईत सुरक्षेचे जाळे अधिक घट्ट करण्यात आले आहे. सहा हजार सीसी टीव्ही कॅमेरे व 35 हजार पोलिसांच्या मदतीन कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. विशेष म्हणजे यंदा प्रथमच सहा ड्रोनच्या सहाय्याने गर्दीच्या ठिकाणाचे लाईव्ह चित्रीकरण पोलिसांना मिळणार आहे. 

गणेशोत्सव काळात राज्यात विशेषकरून मुंबईवर कुठलेही संकट नको म्हणून मुंबई पोलिसांनी तयारी सुरू केली आहे. गणेशोत्सवाच्या काळातच मोहरम येत असल्याने सुरक्षा अधिक कडक करण्यात आली आहे. दोन्ही सणांना गालबोट लागू नये म्हणून मुंबईत पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. मुंबई पोलिसांचे 35 हजार अधिकारी आणि अंमलदार बंदोबस्ताला तैनात असतील. दरम्यानच्या कालावधीत पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत.
 
पोलिसांसह राज्य राखीव दल, शीघ्र कृती दल, फोर्स वन आणि रॅपिड ऍक्‍शन फोर्स यांची अतिरिक्त कुमक राखीव ठेवण्यात आली आहे. होमगार्ड आणि स्वयंसेवी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची मदत घेण्यात येणार आहे. त्याशिवाय सहा हजार ड्रोन आणि सीसी टीव्हीच्या सहाय्याने हालचालींवर लक्ष ठेवले जाणार आहे. 

ध्वनिप्रदूषणावर विशेष लक्ष 
रुग्णालये आणि शांतता क्षेत्र परिसरात मर्यादेपेक्षा अधिक ध्वनिक्षेपकांचा वापर करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत. त्याशिवाय सकाळी सहा वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत ध्वनिक्षेपके वाजवण्यास मुभा आहे. दुसऱ्या, पाचव्या, गौरी विसर्जन आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी ध्वनिक्षेपणाची मर्यादा 12 वाजेपर्यंत करण्यात येणार आहे. 

अफवा रोखण्यावर भर 
उत्सवकाळात समाजकंटकांकडून गैरफायदा घेऊन अफवा पसरवण्यात येतात. त्यासाठी सोशल मीडियाचा दुरुपयोग केला जातो. अशा अफवा रोखण्यासाठी सोशल मीडियावर मुंबई पोलिसांच्या सायबर सेलचे विशेष लक्ष असणार आहे. अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. 

अतिरिक्त कुमक
मुंबई पोलिसांकडून अतिरिक्त बंदोबस्त मुंबईसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. मुंबईबरोबरच बाहेरून पोलिसांची मोठी कुमक मागवण्यात आली असून त्यांनी आणि अधिकाऱ्यांनी 1 सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता नेमलेल्या प्रादेशिक विभाग कार्यालयात हजर राहण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. 

प्रसादाबाबत विशेष सूचना 
प्रसाद वाटप करताना सतर्कता बाळगण्याचे आदेश मंडळांना देण्यात आले आहेत. अनोळखी व्यक्तीकडून घेऊन प्रसाद वाटू नका, अशा सूचनाही करण्यात आल्या आहेत. त्याच्या माध्यमातून घातपाताची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे सर्वच यंत्रणा त्याबाबत सतर्क आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com