
लालबागच्या राजाला पूरग्रस्ताचे भावनिक पत्र. पत्रातून मांडले गाऱ्हाणे वाचून मंडळाचे कार्यकर्तेही गहिवरले...
मुंबई : "अरे आमचं छप्पर गेलं तरी तुझ्या डोईवर झालर आणि तुला बसायला पाट आणला असता रे... तुला शुचिर्भूत होताना बघण्यासाठी माझी "स्वरा' गाय आसुसली होती... आपल्या दुधाचा पान्हा तुझ्यासाठी मोकळा करण्याआधीच पुराने तिला आपल्यात वाहवून घेतलं रे! आमच्यावर तू रुसला आहेस का बाप्पा...' असे भावनिक पत्र एका पूरग्रस्ताने "लालबागच्या राजा'ला लिहिले आहे. पूरग्रस्तांच्या भावना वाचून मंडळाचे सर्वच कार्यकर्ते गहिवरून गेले.
गेल्या काही वर्षांपासून बाप्पाला पत्र लिहून आपले गाऱ्हाणे त्याच्याकडे मांडले जात आहे. आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी यंदाही अनेक गणेशभक्तांनी लालबागच्या राजाच्या दानपेटीत आपली पत्रे टाकली आहेत. त्यातील एक पत्र कोल्हापूरमधील महापुरात उद्ध्वस्त झालेल्या पूरग्रस्ताचे आहे. बाप्पाला लिहिलेल्या पत्रात तो म्हणतो, "या वर्षी आमच्यावर तू रुसला आहेस बाप्पा... म्हणूनच तू बहुतेक माझ्या घरी नाही आलास. लंबोदर असणाऱ्या तू आमच्या चुकांना तुझ्यात सामावून घे. दुष्काळ आणि पुराच्या आपत्तीला कुठे ना कुठे आम्हीदेखील जबाबदार आहोत याची जाणीव सर्वांना होऊ दे. आम्हाला माफ कर आणि पुढच्या वर्षी नक्की ये रे गजानना... अंगणातल्या रांगोळीचा सडा नक्कीच तुझी वाट बघेल.'
लाखो गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असणाऱ्या मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येत आहेत. दर्शनासाठी येणारे भाविक दान तर करतात; पण त्याचसोबत दानपेटीत अनेक पत्रेही टाकतात. गणेशभक्तांनी यंदाही आपल्या अडचणींचे गाऱ्हाणे बाप्पासमोर पत्रातून मांडले आहे. विघ्नहर्ता आपल्या इच्छा नक्कीच पूर्ण करील, अशा भावनाही काही जणांनी व्यक्त केल्या.
अशी भक्ती... असे मागणे
विद्यार्थीदशेत असलेल्या भक्तांना परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण कर, अशी मागणी गणेशचरणी केली आहे. वयात आलेल्या तरुणांची लग्न होऊ दे, संसाराचा गाडा हाकणाऱ्या एका बायकोने नवऱ्याची दारू सुटू दे, सुशिक्षित तरुणांनी नोकरी लागू दे आदी प्रकारच्या मागण्या बाप्पाकडे केल्या आहेत.
विविध भाषांतील पत्रे
लालबागच्या राजाची कीर्ती जगभरात पसरल्याने केवळ मराठीतूनच नव्हे तर सर्व भाषांतून भक्तांनी आपल्या भावना पत्रातून मोकळ्या केल्या आहेत. मराठीसह, हिंदी, उर्दू आणि इंग्रजी भाषांतून अनेक पत्रे भाविकांनी बाप्पाला लिहिली आहेत.