सणासुदीत गूळाचा गोडवा कमी

सकाळ वृत्तसेवा
Monday, 2 September 2019

बाजारात गुळाची कमतरता जाणवत असून, मागणीइतका पुरवठा होत नसल्याने गुळाच्या भावात किलोमागे १० ते १५ रुपयांची वाढ झाली आहे.

नवी मुंबई : मुंबईच्या घाऊक बाजारात कोल्हापूरमधून गुळाची आवक होते. मात्र, येथील पूरस्थितीमुळे यावेळी गणेशोत्सवादरम्यान येणारा गूळ आलेला नाही. परिणामी बाजारात गुळाची कमतरता जाणवत असून, मागणीइतका पुरवठा होत नसल्याने गुळाच्या भावात किलोमागे १० ते १५ रुपयांची वाढ झाली आहे. मात्र, गणेशोत्सवात गूळ आवश्‍यक असल्याने नागरिक मिळेल त्या भावात खरेदी करत आहेत.

गणपतीला नैवेद्य म्हणून लागणाऱ्या मोदक, खीर बनवण्यासाठी गुळाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. गुळाला या उत्सवादरम्यान मागणी वाढते. घाऊक बाजारात कोल्हापूरमधील गुऱ्हाळातून गूळ येतो. मात्र, यावेळी गुळाचे प्रमाण मात्र कमी झाले आहे. बाजारात ६० रुपये किलो असणारा काळा गूळ, सध्या मात्र ७२ रुपये किलो झाला आहे; तर ५६ ते ५८ रुपये किलो असलेला कोल्हापुरी गूळ ६४ ते ६८ रुपये किलो आहे. कोल्हापूरातील पूरपरिस्थितीमुळे गूळ उद्योगाला मोठी झळ बसली आहे. अनेक गुऱ्हाळांत पाणी साचल्याने गुळाचे उत्पादन थांबले असून, साठवणीतील गूळ पाण्यात गेला. त्यामुळे आता वाढत्या मागणीला पुरवठा करता येईल इतका गुळाचा पुरवठा होत नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

कोल्हापुरातील पूरस्थितीमुळे गूळ उद्योगाला मोठा फटका बसला. अनेक गुऱ्हाळांत पाणी साचल्याने गुळाचे उत्पादन थांबले असून, साठवणीतील गूळ पाण्यात गेला आहे. त्यामुळे मागणीइतका पुरवठा होत नसल्याने भाववाढ झाली आहे.
- कांतिलाल जैन, व्यापारी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jaggery became expensive at the ganesh festival