#MyFriendGanesha : चिंचवडच्या सुप्रिया खासनीस यांना चांदीचा मुकुट

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 11 September 2019

बाप्पा गणरायाच्या जन्माची, अवतार कार्याची, सार्वजनिक गणेशोत्सवाची माहिती नवीन पिढीला व्हावी, या उद्देशाने ‘सकाळ माध्यम समूहा’ने गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर माय फ्रेंड श्रीगणेशा अर्थात कोण होईल बाप्पाचा मित्र ही अनोखी प्रश्‍नमंजूषा स्पर्धा आयोजित केली होती. त्यात चिंचवडच्या सुप्रिया खासनीस यांनी प्रथम क्रमांकाचा चांदीचा मुकुट पटकविला. आळंदी रोड- दिघी येथील शांताबाई स्वामी यांनी द्वितीय क्रमांक (चांदीचा हार) मिळविला आहे. चिंचवड- एम्पायर इस्टेटमधील अपूर्व जोशी याने तृतीय क्रमांकांचा ‘चांदीचा करंडा’ पटकावला.

पिंपरी - बाप्पा गणरायाच्या जन्माची, अवतार कार्याची, सार्वजनिक गणेशोत्सवाची माहिती नवीन पिढीला व्हावी, या उद्देशाने ‘सकाळ माध्यम समूहा’ने गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर माय फ्रेंड श्रीगणेशा अर्थात कोण होईल बाप्पाचा मित्र ही अनोखी प्रश्‍नमंजूषा स्पर्धा आयोजित केली होती. त्यात चिंचवडच्या सुप्रिया खासनीस यांनी प्रथम क्रमांकाचा चांदीचा मुकुट पटकविला. आळंदी रोड- दिघी येथील शांताबाई स्वामी यांनी द्वितीय क्रमांक (चांदीचा हार) मिळविला आहे. चिंचवड- एम्पायर इस्टेटमधील अपूर्व जोशी याने तृतीय क्रमांकांचा ‘चांदीचा करंडा’ पटकावला. 

‘सकाळ’च्या ‘माय फ्रेंड श्रीगणेशा’ प्रश्‍नमंजूषा स्पर्धेचे पारितोषिक वितरण औद्योगिक शिक्षण मंडळाच्या पिंपरीतील आयआयबीआर महाविद्यालयाच्या सभागृहात मंगळवारी (ता. १०) झाले. क्रिएटिव्ह ॲकॅडमी व द लर्निंग लेन्स ॲकॅडमी मुख्य प्रायोजक होते. द लर्निंग लेन्स ॲकॅडमीचे संचालक इमरान शेख, विनीत सुतार, आयआयबीएम ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या संचालिका शीतल वर्णेकर, न्यू पुणे पब्लिक स्कूलचे अध्यक्ष प्रदीप खंदारे, प्रियदर्शनी ग्रुप ऑफ स्कूलचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) राजेंद्र सिंह, पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, ‘सकाळ’चे सहयोगी संपादक अविनाश म्हाकवेकर आदींच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले. विजेत्यांना श्रीगणेशाची आभूषणे असलेल्या चांदीच्या वस्तू देऊन गौरविले. शांताबाई स्वामी बाहेरगावी असल्यामुळे उपस्थित राहू शकल्या नाहीत.

स्पर्धेतून शंभर विजेत्यांची नावे सोडत (ड्रॉ) पद्धतीने काढले होते. जाहिरात विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक मिलिंद भुजबळ यांनी सूत्रसंचालन केले.

‘माय फ्रेंड श्रीगणेशा’ प्रश्‍नमंजूषा उपक्रम म्हणजे वाचन-लेखनसंस्कृतीचे एक व्यासपीठ आहे. यामुळे वाचकांना सामान्य ज्ञान, समाजप्रबोधन, धार्मिक माहिती यांसह ऐतिहासिक, नैसर्गिक वारसा जपणुकीबाबतची माहिती सर्वांना मिळाली. 
- सुप्रिया खासनीस, प्रथम विजेत्या

आजीच्या मदतीने पुरवणीतील माहिती समजून घेतली. प्रश्‍नांच्या स्वरूपानुसार उत्तरे शोधली. त्यासाठी वाचन करावे लागले. आध्यात्मिक व पौराणिक माहितीबरोबरच चालू घडामोडींचीही माहिती मिळाली. ‘छिद्र’ या शब्दाला ‘क्षत’ हा पर्यायी शब्द पुरवणी वाचल्यामुळेच सापडला. 
- अपूर्व जोशी, तृतीय विजेता


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: My Friend ganesha Quiz Contest Result