पुणे शहर मध्यरात्रीच होणार चकाचक

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 4 September 2019

गणेशोत्सवात शहराच्या मध्यवर्ती भागात मोठ्या प्रमाणात कचरा साठतो. त्यामुळे मध्यरात्रीच हा भाग स्वच्छ करण्याचा निर्णय महापालिकेच्या प्रशासनाने घेतला आहे. यावर देखरेख ठेवण्यासाठी रोज एका अधिकाऱ्याला जबाबदारी दिली आहे. 

पुणे - गणेशोत्सवात शहराच्या मध्यवर्ती भागात मोठ्या प्रमाणात कचरा साठतो. त्यामुळे मध्यरात्रीच हा भाग स्वच्छ करण्याचा निर्णय महापालिकेच्या प्रशासनाने घेतला आहे. यावर देखरेख ठेवण्यासाठी रोज एका अधिकाऱ्याला जबाबदारी दिली आहे. 

शहराच्या मध्यवर्ती भागात गणपती व देखावे पाहण्यासाठी नागरिक गर्दी करतात. परिसरात खाद्यपदार्थांचे स्टॉल, खेळणी व इतर वस्तू विक्रेत्यांची संख्या मोठी आहे. अशा ठिकाणी अस्वच्छता निर्माण होते. हे चित्र विशेषतः शुक्रवार पेठ, नारायण, सदाशिव, भवानी पेठ, रविवार पेठ, कसबा पेठेत सर्रास पाहायला मिळते. 

शहर स्वच्छ राहावे, यासाठी घनकचरा विभागाचे सुमारे ६०० कर्मचारी, अधिकारी दोन पाळ्यांमध्ये काम करणार आहेत. पहाटे सहा ते दुपारी एक या वेळेत शहरात स्वच्छता केली जाईल. रात्री १२ पर्यंत नागरिक देखावे पहाण्यासाठी गर्दी करतात. त्यानंतर पहाटे चारपर्यंत काम करून मध्यवर्ती पेठा, नदीचे घाट यांची स्वच्छता केली जाणार आहे. 

महापौर, आयुक्तांकडून पाहणी 
स्वच्छता कामाचा आढावा घेण्यासाठी महापौर मुक्ता टिळक, आयुक्त सौरभ राव यांनी मंगळवारी मध्यरात्री १२ ते ३ या वेळेत पेठा, नदी काठ येथे पाहणी केली. या वेळी मंडई परिसरात कचरा दिसला. त्यांनी तेथे त्वरित स्वच्छता करण्यास सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune city will be clean at midnight in ganesh festival