रत्नागिरी : धरण फुटीने उद्‌ध्वस्त झालेल्या तिवरेकरांचा बाप्पावर भरोसा...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 सप्टेंबर 2019

चिपळूण - तिवरे भेंदवाडीतील आपद्‌ग्रस्तांनी अत्यंत कठीण परिस्थितीतही गणेशाची प्रतिष्ठापना केली आहे. धरण फुटल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे येथील आपद्‌ग्रस्तांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तरीही परिस्थितीशी दोन हात करत गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय येथील ग्रामस्थांनी घेतला. विघ्नहर्ताच आमच्यावरील विघ्न दूर करील, अशी भावना येथील ग्रामस्थांनी व्यक्त केली. 

चिपळूण - तिवरे भेंदवाडीतील आपद्‌ग्रस्तांनी अत्यंत कठीण परिस्थितीतही गणेशाची प्रतिष्ठापना केली आहे. धरण फुटल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे येथील आपद्‌ग्रस्तांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तरीही परिस्थितीशी दोन हात करत गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय येथील ग्रामस्थांनी घेतला. विघ्नहर्ताच आमच्यावरील विघ्न दूर करील, अशी भावना येथील ग्रामस्थांनी व्यक्त केली. 

तिवरे भेंदवाडीतील घराघरांत गणेशोत्सव साजरा केला जायचा. चाकरमानी व नातेवाईकांच्या उपस्थितीत ११ दिवस हा उत्सव अगदी उत्साहात साजरा व्हायचा. शेतीकडे लक्ष देणे, कौटुंबिक अडीअडचणी समजून घेणे, मुला-मुलींच्या विवाहाची बोलणी करणे आदी घरगुती कार्यक्रम व्हायचे. धरणावरील धबधब्यावर भिजण्याचा आनंद घेण्याबरोबर, मासे व खेकडे पकडण्यासाठी तरुणांची पावले हौसेने नदीकडे वळायची. २ जुलैला तिवरे धरण फुटले अन्‌ धरणाखालील १२ घरे आणि त्या घरात राहणारी २१ माणसे वाहून गेली. त्यांचे होते नव्हते ते सारे वाहून गेले. कोट्यवधीचे नुकसान झाले.

भेंदवाडी आणि फणसवाडीतील ग्रामस्थ आता जगण्याची लढाई लढत आहेत. सर्वस्व गमावलेल्यांपैकी १० जणांचे तिवरे गावातच तात्पुरते पुनर्वसन केले आहे. यातील तुकाराम शंकर कनावजे, नारायण रघुनाथ गायकवाड आणि कृष्णा बाळ कातुर्डे यांनी घरात गणेशाची प्रतिष्ठापना केली आहे. गेल्यावर्षी जे लोक गणेशोत्सव साजरा करताना आपल्याबरोबर होते ते यावर्षी नाही याची त्यांना खंत आहे; पण गणेशाच्या कृपेमुळेच आम्ही वाचलो. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गणेशाची पूजा साध्या पद्धतीने का होईना करावीच लागेल, या भावनेने या तिघांनी गणेशांची प्रतिष्ठापना केली आहे. ज्यांचे गावात काहीच शिल्लक राहिले नाही, अशा चाकरमान्यांनी या वर्षी गावाकडे येणे टाळले. भेंदवाडीतील इतर चौघांनी गणपती आणले आहेत.

दु:ख सोसत असताना ते गणेशाची पूजा करतात. कनावजे, गायकवाड आणि कातुर्डे यांच्या घरात होणाऱ्या आरतीला सर्वजण जमतात. एका रात्रीच्या घटनेने आम्ही खूप काही सोसले आहे. असा प्रसंग गावावर पुन्हा नको असे साकडे गणरायाला ग्रामस्थ घालतात.

‘‘गणरायाच्या आगमनाने दुःख विसरता यावे, घरात आनंद यावा, त्यांना समाधान लाभावे, या भूमिकेतून काहींनी गणपती आणले आहेत. कितीही दुःखाचा प्रसंग असला तरी अनेक वर्षांची परंपरा मोडायची नाही, या भावनेतून काहींनी गणेशाची प्रतिष्ठापना केली आहे.’’
- तानाजी चव्हाण,
तिवरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganesh Festival in Tivare Village in Ratnagiri