गणेशोत्सव2019 : बाप्पाच्या स्वागतासाठी पुण्यनगरी सज्ज

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 सप्टेंबर 2019

भक्ती, चैतन्य, उत्साह यांचा त्रिवेणी संगम असलेल्या लाडक्‍या गणरायाच्या उत्सवाला आजपासून (सोमवारी) प्रारंभ होत आहे. त्याच्या स्वागतासाठी अवघी पुण्यनगरी सज्ज झाली आहे.

पुणे - भक्ती, चैतन्य, उत्साह यांचा त्रिवेणी संगम असलेल्या लाडक्‍या गणरायाच्या उत्सवाला आजपासून (सोमवारी) प्रारंभ होत आहे. त्याच्या स्वागतासाठी अवघी पुण्यनगरी सज्ज झाली आहे. मांगल्याची शिदोरी घेऊन येणारा, वैभव अन्‌ देदीप्याची प्रचिती देणारा हा उत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी गणेश मंडळांबरोबरच प्रशासकीय यंत्रणाही सज्ज झाली आहे.

गणेशाचे आगमन आज होत असल्याने काल दिवसभर घरोघरी लगबग सुरू होती. त्यातच रविवारची सुटी असल्याने बच्चेकंपनीच्या उत्साहाला उधाण आले होते. रात्री उशिरापर्यंत घराघरांत सजावटीचे काम सुरू होते. 

आज सकाळी लवकर प्रतिष्ठापना करण्यासाठी अनेकांनी कालच मूर्ती घरी नेल्या. मंडळांच्या कार्यकर्त्यांचीही रात्रभर धावपळ सुरू होती. गणेशभक्तांसाठी देखावा लवकर खुला करण्यासाठी अनेक मंडळांचे प्रयत्न सुरू आहेत.  शहरात काही भागांत दुपारी पावसाचा शिडकावा झाला. या पावसात देखाव्यांचे काम सुरू होते.

दुपारी साडेबारापर्यंत करा प्रतिष्ठापना
विद्येची देवता, विघ्नहर्ता श्री गजाननाच्या स्वागतासाठी संपूर्ण शहर सज्ज झाले असून, घरगुती गणपतींसह मंडळांच्या गणपतींची प्रतिष्ठापना करण्यासाठी उद्या (सोमवारी) सकाळी ६.२४ ते १२.३० हा उत्तम मुहूर्त आहे.

शारदा ज्ञानपीठमचे संस्थापक पंडित वसंतराव गाडगीळ म्हणाले, ‘‘सोमवारी सकाळी ६ वाजून २४ मिनिटांनी सूर्योदय होत आहे. त्यापूर्वी स्नान करून, देवपूजा व आईवडिलांना नमस्कार करावा. त्यानंतर सकाळी साडेनऊपर्यंतचा पहिला प्रहर गणपती प्रतिष्ठापना करण्यासाठी अतिशय उत्तम मुहूर्त आहे. दुसऱ्या प्रहरात साडेनऊ ते दुपारी साडेबारा हा उत्तम मुहूर्त आहे. दुपारी साडेबाराच्याआत प्रतिष्ठापना करून गणपतीला नैवेद्य दाखविणे गरजेचे आहे. साडेबारानंतर प्रतिष्ठापना केले जाणारे गणपती हे धर्मशास्त्रानुसार नाहीत, तर ‘सवड’शास्त्रानुसार बसविले जात आहेत.

बाप्पांच्या स्वागताला पाऊस
गणरायाच्या आगमनाच्या दिवशी (सोमवारी) आकाश सामान्यत- ढगाळ राहणार असून, हलक्‍या स्वरूपाचा पाऊस पडण्याची २५ ते ५० टक्के शक्‍यता आहे, असा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आला आहे. त्यानंतर म्हणजे येत्या मंगळवारपासून (ता. ३) पुढील पाच दिवस हलक्‍या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असेही खात्यातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Punekar ready for ganesh ustav