असा आहे अहमदनगरचा श्री विशाल गणपती 

अशोक निंबाळकर
Tuesday, 18 August 2020

अहमदनगर या नावातच वैशिष्ट्य आहे. कोणता काना नाही, मात्रा नाही आणि वेलांटी, उकारही नाही... अगदी सरळसाधे.

नगर : अहमदनगर या नावातच वैशिष्ट्य आहे. कोणता काना नाही, मात्रा नाही आणि वेलांटी, उकारही नाही... अगदी सरळसाधे. जगात हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्याच शहरांना स्वतः चा जन्मदिवस माहिती आहे. त्यात नगर आहे. या शहराचे ग्रामदैवत म्हणजे श्री विशाल गणेश! या गणेश मूर्तीचे आणि मंदिराचेही वैशिष्ट्य आहे. 

नगर शहराचे ग्रामदैवत असले तरी येथे संपूर्ण राज्यभरातून भक्त दर्शनासाठी येतात. नवसाला पावणारा बाप्पा म्हणून तो प्रसिद्ध आहे. सध्या या मंदिराच्या जीर्णोध्दाराचे काम सुरू आहे. राजस्थानातील मुस्लिम कारागीर या मंदिराचे बांधकाम करीत आहेत. हेही वैशिष्ट्यच म्हणावे लागेल. अनेक मुस्लिमही श्री विशाल गणेशाचे भक्त आहेत. अगदी औरंगजेबाच्या काळापासून ही प्रस्था चालत आली आहे. औरंगजेबही या बाप्पाला मानत होता, असे जुनेजाणते सांगतात. 

शहरात कोणत्याही शुभ कामाची सुरूवात श्री विशाल गणेशापासूनच होते. निवडणुकीत सत्ताधारी असो नाही तर विरोधक प्रचाराचा नारळ याच मंदिरात फुटतो. लग्न कार्यासाठी याच बाप्पाला अगोदर पत्रिका वाहिली जाते. नवस बोलणाऱ्याची आणि तो पूर्ण झाल्यानंतर फेडणाऱ्यांची दररोज रिघ असते. प्रत्येक चतुर्थीला येथे दर्शनासाठी मोठी झुंबड असते. 

मूर्तीचे वैशिष्ट्य 
ही मूर्ती विशाल आहे म्हणून तिला विशाल गणेश हे नाव पडले आहे. या मूर्तीची उंची साडेअकरा फूट आहे. या पूर्वाभिमुख उजव्या सोंडेच्या गणेशाची बैठक नेहमीपेक्षा वेगळी आहे. बाप्पाच्या बेंबीवर फणाधारी नाग आहे. डोक्‍यावर पेशवेकालीन पगडी परिधान केली आहे. ही मूर्ती विशिष्ट अशा मिश्रणातून तयार झाली आहे. शहरातील गणेशोत्सव मिरवणुकीत पहिला मान असतो. उत्सव काळात विविध प्रकारचे धार्मिक कार्यक्रम ट्रस्टतर्फे आयोजित केले जातात. जिल्ह्याचे पोलिस प्रमुखांच्या हस्ते उत्सवमूर्तीची स्थापना होते. उत्तर पूजा जिल्हाधिकारी करतात. 

पुजारी आहेत नाथपंथीय 
श्री विशाल गणेशाचे पुजारी हे नाथपंथीय आहेत. हे मंदिर एका नाथपंथीय सत्पुरूषाने स्थापन केले आहे. त्या नाथपंथीयाची आई ही गणेश भक्त होती म्हणून त्याने हे मंदिर स्थापन केले. त्यांची संजीवन समाधी मंदिरातील गाभाऱ्याच्या पाठीमागे आहे. तेथे एक महादेवाची पिंड आहे. मंदिरात पूजेपासून सर्वच धार्मिक विधी हे नाथपंथीयांप्रमाणेच होतात. येथे नगाऱ्यासह केली जाणारी आरती पुलकीत करून टाकते. गेंडानाथ महाराज यांचे शिष्य संगमनाथ महाराज सध्या पुजारी आहेत. या मंदिरात नाथपंथीय साधू आसरा घेतात. कुंभमेळ्याला जाण्यापूर्वी ते विशाल गणेशाचे दर्शन घेतातच. 

अशी आहे अख्यायिका 
गणेश मंदिरातील विशाल आकाराची मूर्ती स्वयंभू समजली जाते. ती दररोज तीळाएवढी वाढते, त्यामुळेच ती एवढी मोठी झाली. ही मूर्ती वाढतच राहिली तर अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे या मूर्तीच्या डोक्‍यावर खिळा ठोकण्यात आला. त्यामुळे मूर्तीची वाढ थांबली. परंतु याला कोणताही पुरावा नाही. दुसरी अख्यायिका अशी ः प्रभूरामचंद्र दंडकारण्यात आले असताना त्यांनी या गणेशाची पूजा केली होती, असे काही भाविक सांगतात. औरंगजेब नगरमध्ये आला असताना त्याने या गणेशाची अवहेलना केली. मात्र, त्याला या कृत्यामुळे त्रास झाला. त्यामुळे मंदिराच्या दिवाबत्तीची व्यवस्था केल्याचे काही इतिहासकारांचे म्हणणे आहे. गणेश पुराणातही या मंदिराचा उल्लेख असल्याचे श्रीपाद मिरीकर यांनी सांगितल्याची आठवण मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष ऍड. अभय आगरकर सांगतात. 

कोरोनामुळे मंदिर सहा महिन्यांपासून बंद 
कोरोनामुळे सध्या अभूतपूर्व स्थिती निर्माण झाली आहे. मंदिर सहा महिन्यांपासून बंद आहे. गणेशोत्सवातही तीच स्थिती राहणार आहे. श्री विशाल गणपती माळीवाडा देवस्थान ट्रस्टने उत्सव काळातील सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. गणेश यागाची परंपरा कायम ठेवली जाणार आहे. सन 1952-53मध्ये गणपतराव आगरकर यांनी या ट्रस्टची स्थापना केली होती. त्यानंतर त्यांचे चिरंजीव जगन्नाथ आगरकर यांच्याकडे ही धुरा आली. आता त्यांचे चिरंजीव माजी नगराध्यक्ष ऍड. अभय आगरकर हे ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. 

गेल्या तीन पिढ्यांपासून आमच्या कुटुंबाकडे श्री विशाल गणेशाच्या सेवेचा मान आहे. कोरोनामुळे यंदा सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. मात्र, मंदिरावर आकर्षक रोषणाई, फ्लॉवर डेकोरेशन, कमान वगैरे अशा गोष्टी केल्या जातील. सध्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे. मंदिराचे काम करताना बऱ्याचदा आमच्याकडचे पैसे संपतात. मात्र, अचानक कोणी तरी रात्रीतून दानदाता उभा राहतो आणि ते काम तडीस जाते. देशात बिर्ला मंदिर ज्यांनी बांधले, ते कारागीर सध्या येथील मंदिराचे बांधकाम करीत आहेत. हे देवस्थान सर्वच शहरवासीयांच्या श्रद्धेचे स्थान आहे. 
- ॲड. अभय आगरकर, अध्यक्ष, श्री विशाल गणपती माळीवाडा देवस्थान ट्रस्ट, अहमदनगर 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A story telling the history of Shri Vishal Ganpati in Ahmednagar