तरुणींनो.. यामुळे वाढतंय तुमचं नैराश्य!

वृत्तसंस्था
शनिवार, 17 ऑगस्ट 2019

लंडन : सोशल मीडियामुळे तरुणांमध्ये नैराश्‍याचे प्रमाण तसेच मानसिक आरोग्य बिघडण्याचे प्रमाण वाढत आहे. विशेष म्हणजे हे प्रमाण तरुणींमध्ये जास्त असल्याचे एका अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. ही समस्या आणखी जास्त जटील होत जाणार असल्याचा धोकाही तज्ज्ञांनी या अभ्यासात व्यक्त केला आहे. 

लंडन : सोशल मीडियामुळे तरुणांमध्ये नैराश्‍याचे प्रमाण तसेच मानसिक आरोग्य बिघडण्याचे प्रमाण वाढत आहे. विशेष म्हणजे हे प्रमाण तरुणींमध्ये जास्त असल्याचे एका अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. ही समस्या आणखी जास्त जटील होत जाणार असल्याचा धोकाही तज्ज्ञांनी या अभ्यासात व्यक्त केला आहे. 

"द लॅन्सेट चाईल्ड अँड अडोलेन्सेंट हेल्थ' या आरोग्याशी निगडीत जर्नलने प्रसिद्ध केलेल्या अहवालात हा निष्कर्ष नोंदवण्यात आला आहे. या जर्नलने इंग्लंडमधील 13 ते 21 वय असलेल्या 10 हजार तरुणाईशी संवाद साधून हा अहवाल तयार केला आहे. यामध्ये सोशल मीडियामुळे किशोवयीन तरुणींचा मानसिक छळ आणि मानसिक आरोग्य बिघडण्याच्या प्रमाणामध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे. तसेच या तरुणींचा शारीरिक व्यायाम आणि पुरेशी झोप कमी झाल्याचे समोर आले आहे. "स्वतःहून समाजमाध्यमांच्या वापरामुळे तरुणाईच्या मानसिक आरोग्यास घातक ठरत नाही. परंतु, त्याच्या वारंवार वापरामुळे हे नकारात्मक परिणाम होत आहेत', असे अहवालाचे सहअभ्यासक रसे टमेंट यांनी म्हटले आहे. 

या अहवालाचा अभ्यास करताना असे निदर्शनास आले, की फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट आदी समाजमाध्यमांवर दिवसातून तीनपेक्षा जास्त वेळा वापरल्यास जास्त वारंवारता असल्याचे नमूद करण्यात आले आहे. हे सोडून इतर संकेतस्थळांवर तरुणाई किती वेळ घालवते, यासंदर्भात अभ्यासासाठी तज्ज्ञांना काही मर्यादा असल्याने त्याची अचूक माहिती सध्या उपलब्ध नाही. सोशल मीडियाच्या आभासी जगामुळे आपण जगत असलेल्या आयुष्याबाबत ही मंडळी समाधानी आणि आनंदी नसतात. यामध्ये मुलींचे प्रमाण सर्वाधिक आहे. मुलींची पुरेशी आणि झोप होत नसल्याने त्यांच्यात चिडचिड आणि मानसिक तणाव स्पष्टपणे दिसून येत आहे. सोशल मीडियामुळे तरुणाईची बदललेली जीवनशैली तरुणाईस त्यातही विशेषतः मुलींच्या आरोग्यास हानिकारक ठरू नये, यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: social media effects on Girls