भारत-पोलंडमध्ये 'क्लोज फ्रेंडशिप' : मार्सीन प्रिझीदॅज

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 सप्टेंबर 2019

भारत व पोलंडमध्ये 'क्लोज फ्रेंडशिप' असून, कोल्हापूरकरांची आपुलकी आमच्यासाठी मोठा सन्मान आहे, असे प्रतिपादन पोलंडचे उपपरराष्ट्रमंत्री ‌मार्सीन प्रिझीदॅज यांनी आज येथे केले.

कोल्हापूर : भारत व पोलंडमध्ये 'क्लोज फ्रेंडशिप' असून, कोल्हापूरकरांची आपुलकी आमच्यासाठी मोठा सन्मान आहे, असे प्रतिपादन पोलंडचे उपपरराष्ट्रमंत्री ‌मार्सीन प्रिझीदॅज यांनी आज येथे केले. दोन्ही देशांमधील 'ह्यूमन कनेक्शन' यापुढेही जीवंत राहतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

भारत व पोलंडच्या मैत्रीचे ऋणानुबंध उलगडणाऱ्या वळीवडे वस्तुसंग्रहालयाच्या कोनशिलेचे आज अनावरण झाले. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. खासदार संभाजीराजे छत्रपती व युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांच्या पुढाकारातून जिल्हा प्रशासनातर्फे छत्रपती युवराज शाहू महाराज हायस्कूलच्या प्रांगणात कार्यक्रम झाला. 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जमिनी विकण्यासाठीच उदयनराजे भाजपमध्ये

प्रिझीदॅज म्हणाले, 'दुसऱ्या महायुद्धात पोलंडची वेळ दुर्दैवी होती. जर्मनी व सोविएत रशियाच्या हल्ल्यात अनेक पोलंडवासी व ज्यू लोक बळी ठरले. हे रक्तरंजित युद्ध  सुरू असताना वासियांना कोल्हापुरात आश्रय मिळाला. इथली माणुसकी आमच्या लोकांसाठी कल्पनेपलीकडची होती. या युद्धानंतर आम्ही आमचे स्वातंत्र्य पुन्हा मिळवले."

खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले, "पोलंडवासीय १९४३ ते ४८ च्या दरम्यान येथे आश्रयाला होते. त्यांचे वंशज कोल्हापूरकरांना अभिवादन व छत्रपती शिवराय राजश्री छत्रपती शाहू महाराजांना नतमस्तक होण्यासाठी आले आहेत. वळीवडेत आश्रयाला असलेल्यांपैकी तीस जण हयात असून, त्यातील दहा जण आज येथे आले आहेत. राजदूत अॅडम बुराकोवास्की त्यांच्या भेटीनंतर माझे पोलंडबरोबर नाते अधिक दृढ झाले आहे. पोलंडवासीय आजही कोल्हापूरला दुसरे घर मानतात. त्यांना 'स्टेट गेस्ट आॅनर' देऊन येथे आमंत्रित केले आहे."

पोलंडचे राजदूत अॅडम बुराकोवास्की यांनी 'नमस्ते कोल्हापूर' अशी भाषणाची केलेली सुरुवात टाळ्यांची दाद घेणारे ठरले. त्यांनी हिंदीमध्ये भाषण केले. ते म्हणाले, "आजचा क्षण फार महत्वाचा आहे. दुसऱ्या महायुद्धात पोलंडचे खूप नुकसान झाले होते. भारतीयांनी आम्हाला खूप मोठा आधार दिला. सर्व जगात युद्ध सुरू असताना येथे शांतता होती." 

कौन्सिल जनरल डॅमियन यांनी मराठीतून भाषण करत उपस्थितांची मने जिंकली. ते म्हणाले, "काळजी करू नका. मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. तुम्ही आमच्या पोलंडवासीयांच्या बायका-मुलांना संरक्षण दिले. छत्रपती घराण्याने आपुलकीने आम्हाला वागवले. इथल्या नागरिकांचे सर्वतोपरी सहकार्य मिळाले. पोलंड व भारतीय जनता एकत्र यावी, अशी आमची भावना आहे. मी आनंदी आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी दोन्ही देशातील संबंध मजबूत करण्यासाठी केलेले प्रयत्न निश्चित फायदेशीर ठरतील. दोन्ही देशात शांतता व भरभराट होईल."

प्रधान सचिव भूषण गगरानी यांनी दोन्ही देशांत भावनिक गुंतवणूक असल्याने त्यांच्या स्मृतींचे वळीवडेत संग्रहालय होत असल्याचे सांगितले. अध्यक्ष अॅड्रेंन्ज चेंडियन्सकी व वांंदा खुरासा यांनी पोलंडवासीयांच्या आठवणींना उजाळा दिला. 

या वेळी युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती, खासदार धैर्यशील माने, आमदार सतेज पाटील, जिल्हा परिषदेच्या‌ अध्यक्ष शौमिका महाडिक, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, जिल्हाधिकारी दौलत देसाई, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, कर्नल विजयसिंह गायकवाड, यौवराज शहाजीराजे छत्रपती, सरपंच अनिल पंढरे उपस्थित होते. कॅप्टन शिवाजीराव महाडकर व पंढरीनाथ कंदले यांनी सूत्रसंचालन केले.

डॅमियन यांनी भाषणाची सुरवात

नमस्कार अशी करत 'जय पोलंड, जय हिंद जय महाराष्ट्र' असा शेवट केला. त्यांचे मराठीतील भाषण वैशिष्ट्यपूर्ण ठरले. राजदूत अॅडम माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची 'किंतू चीर कर तम की छाती, चमका हिन्दुस्तान हमारा' ही कविता सादर करण्याचा मोह आवरता आला नाही. त्यांनी ही कविता सादर करत त्याला 'चमका कोल्हापूर हमारा' अशी जोड देताच टाळ्यांचा कडकडाट झाला.

ढोल-ताशांच्या ठेक्याने व पोलिस बॅंडने झालेल्या स्वागताने पोलंडवासीय भारावून गेले.‌ कोल्हापुरी फेटा बांधून त्यांना कार्यक्रमाच्या ठिकाणी आणण्यात आले. मराठमोळ्या नऊवारी साडीतील युवतींनी त्यांचे औक्षण केले. 

पोलंडच्या क्रिस्तियाना कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित होत्या. त्यांच्या आईने त्यांना बहात्तर वर्षांपूर्वी दिलेली बांगडी त्यांच्या हातात आजही असल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले. वळीवडेत पाच वर्षे राहिलेले डेनिसही दोन मुलींसह कार्यक्रमास आवर्जून आल्याचा उल्लेखही त्यांनी केला. यौवराज शहाजीराजे छत्रपती यांच्यासाठी ‌पोलंडवासीयांकडून स्थळ आल्याचे सांगताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Close Friendship between India and Poland says Marcin Prizidaz