कॅनडामध्ये चार दिवसांत एक नदी झाली गायब...

वृत्तसंस्था
मंगळवार, 18 एप्रिल 2017

रिव्हर पायरसीचा अभ्यास करण्यासाठी हजारो वा लक्षावधी वर्षांपूर्वीच्या भौगोलिक घटकांचा मागोवा घ्यावा लागतो. मात्र आता मात्र रिव्हर पायरसीचा हा प्रकार थेट 21 व्या शतकात घडला आहे

ओटावा - कॅनडामधील काही सर्वांत विशाल ग्लेशियर्स (हिमनदी)पैकी एक असलेल्या ग्लेशियरपासून वाहणारी एक मोठी नदी गेल्या वर्षी (2016) अवघ्या चार दिवसांत अक्षरश: गायब झाल्याचे अत्यंत संवेदनशील निरीक्षण शास्त्रज्ञांनी नोंदविले आहे.

गायब झालेल्या "स्लिम्स नदी'ची रुंदी काही ठिकाणी तब्बल 150 मीटर इतकी होती. कॅनडामधील युकून प्रांतामधील विशाल कास्कावुल्श ग्लेशियरपासून उत्पत्ती झालेली स्लिम्स नदी गेली शेकडो वर्षे या भागामधून वाहत येऊन पुढे क्‍लुएन नदीस येऊन मिळत होती. मात्र गेल्या वर्षी हे ग्लेशियर वेगाने वितळल्याने निर्माण झालेले पाणी अलेस्क या दुसऱ्याच नदीमध्ये मिसळून अलास्काच्या आखाताकडे गेले. मूळ ग्लेशियरपासून हे ठिकाण हजारो किमी अंतरावर आहे.

या ग्लेशियरचे पाणी याआधी स्लिम व अलेस्क या नद्यांमध्ये जात होते. मात्र यावेळी सर्व पाणी एकाच नदीमध्ये गेल्याचे आढळून आले. विशेष म्हणजे ही प्रक्रिया 26 ते 29 मे, 2016 अशी अवघ्या चार दिवसांत घडली. यामुळे गेल्या वर्षी अलेस्क नदीची रुंदी स्लिम्सपेक्षा तब्बल 60-70 पटींनी जास्त होती.

गेली काही वर्षे ग्लेशियरचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांच्या पथकाने हा असामान्य बदल नोंदविला. या बदलामुळे येथील भाग अमूलाग्र बदलून गेल्याचेही स्पष्ट झाले आहे.

"स्लिम्स नदीचा अभ्यास करण्यासाठी आम्ही या भागामध्ये गेले होतो. मात्र ही नदी पूर्णत: कोरडी पडल्याचे आढळून आले आहे. ज्या नदीचा अभ्यास करण्यासाठी आम्ही छोट्या नावा घेऊन जात होतो; तेथे आम्हाला धुळीचे लोट दिसले. येथे झालेला भौगोलिक बदल अत्यंत नाट्यमय आहे,'' असे इलिनॉईस विद्यापीठामधील भूगर्भशास्त्रज्ञ असलेल्या जेम्स बेस्ट यांनी सांगितले.

एका नदीचा प्रवास पूर्णत: दिशा बदलून दुसऱ्याच मार्गाने वाहू लागल्याच्या प्रकारास "रिव्हर पायरसी' अशी संज्ञा आहे. स्लिम्स नदीबाबतीतसुद्धा हाच प्रकार घडल्याचे शास्त्रज्ञांना आढळून आले आहे.

"भूतकाळामध्ये याआधी रिव्हर पायरसी घडल्याचे पुरावे आढळून आले आहेत. परंतु, ही प्रक्रिया सद्यकाळात घडल्याचे दिसून आलेले नाही. रिव्हर पायरसीचा अभ्यास करण्यासाठी हजारो वा लक्षावधी वर्षांपूर्वीच्या भौगोलिक घटकांचा मागोवा घ्यावा लागतो. मात्र आता मात्र रिव्हर पायरसीचा हा प्रकार थेट 21 व्या शतकात घडला आहे,'' असे या अभ्यास प्रकल्पाचे नेतृत्व करणारे भूगर्भशास्त्रज्ञ डॅन शुगर यांनी म्हटले आहे.

चार दिवसांत एक नदी अक्षरश: गायब झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर, जागतिक हवामान बदलाचे आव्हान व व्याप्ती आपल्या धारणेपेक्षा अत्यंत गंभीर असल्याची भावना शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Major Canadian river vanishes in four days