esakal | कमाल! फक्त एका प्रवाशासाठी घेतलं विमानाने उड्डाण
sakal

बोलून बातमी शोधा

कमाल! फक्त एका प्रवाशासाठी घेतलं विमानाने उड्डाण

कमाल! फक्त एका प्रवाशासाठी घेतलं विमानाने उड्डाण

sakal_logo
By
शर्वरी जोशी

चीनच्या वुहान प्रांतातून प्रसार झालेल्या कोरोना (coronavirus) विषाणूने गेल्या वर्षभरात संपूर्ण जगाला कवेत घेतलं आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव कमी-अधिक प्रमाणात प्रत्येक देशावर झाला आहे. त्यामुळे हा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक देशांनी आंतरराष्ट्रीय वाहतुकीवर काही निर्बंध लादले आहेत. मात्र, अनेक एअर लाइन कंपन्या योग्य ती काळजी घेऊन त्यांची सेवाही पुरवत आहेत. यामध्येच Emirates International airline ही कंपनी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. या कंपनीने चक्क एका प्रवाशासाठी त्यांची विमानसेवा सुरु ठेवली. विशेष म्हणजे केवळ १८ हजार रुपयांचं (18k) तिकीट काढणारा हा प्रवासी संपूर्ण विमानात एकटाच बसला होता. (40-year-old-flies-solo-on-360-seater-mumbai-dubai-flight-for-rs-18k)

विमानाने प्रवास करण्याची अनेकांची इच्छा असते. त्यातही पहिल्यांदा विमान प्रवास करतांना विंडो सीटही हवी असते. परंतु, संपूर्ण विमानात तुम्ही एकटेच आहात आणि तुम्हाला कुठेही बसायची मुभा आहे असं समजलं तर तुम्ही काय कराल? असंच काहीसं भावेश झवेरी या प्रवाशासोबत झालं आहे. भावेश यांना मुंबई ते दुबई असा प्रवास करायचा होता. विशेष म्हणजे सध्याच्या कोविड काळात अनेक जण आंतरराष्ट्रीय प्रवास टाळत असल्यामुळे फारसे प्रवासी विमानतळावर दिसून येत नाही. परंतु, भावेश यांच्या विमानातही एकही प्रवासी नव्हता. मात्र, तरीदेखील विमानातील क्रू मेंबरनी त्यांची योग्य ती काळजी घेतल्याचं पाहायला मिळालं.

हेही वाचा: माणुसकी! कोविड ड्युटी करताना 'ते' भरतात मुक्या जनावरांचं पोट

"विमानात प्रवेश केल्यानंतर सगळ्या एअरहॉस्टेटसने माझं टाळ्या वाजवून स्वागत केलं. गेल्या कित्येक वर्षांपासून मी मुंबई-दुबई प्रवास करतोय. जवळपास २४० वेळा केलेल्या या प्रवासात असा एकही प्रवास नव्हता ज्यात मी एकटाच होतो. परंतु, हे पहिल्यांदाच घडतंय. परंतु, हा अनुभवदेखील छान आहे", असं भावेश म्हणाले.

पुढे ते म्हणतात, "मला एकट्याला पाहून खास विमानाचा वैमानिकदेखील बाहेर आला आणि त्याने माझ्याशी संवाद साधला. मी माझ्या 18A या आसनावर बसलो होतो. १८ हा माझा लकी क्रमांक आहे. विमानात प्रत्येक जण माझ्याशी आदबीने आणि दररोज प्रत्येक प्रवाशाला ज्या पद्धतीने वागवतात त्याच पद्धतीने आजही सगळे माझ्याशी वागत होते."

दरम्यान, सध्या सोशल मीडियावर भावेश झवेरी यांची चर्चा रंगली आहे. सोबतच Emirates International airline ने केवळ एका प्रवाशासाठी उड्डाण घेतलं याचंही सर्व स्तरामधून कौतुक होत आहे.