esakal | अमेरिकेतील भारतीयांकडून ४७ लाख डॉलरचा निधी

बोलून बातमी शोधा

American Dollar
अमेरिकेतील भारतीयांकडून ४७ लाख डॉलरचा निधी
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वॉशिंग्टन - कोरोनाशी झगडणाऱ्या भारताला मदतीसाठी अमेरिकेतील भारतीय वंशाच्या नागरिकांनी ४७ लाख डॉलरचा निधी सोशल मीडियाच्या माध्यमातून जमा केला. याशिवाय अनेक ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरही गोळा करण्यात आले आहेत.

‘एकत्रित प्रयत्नांतून हजारो जणांचे जीव वाचविता येतील, अनेकांना मदत मिळेल आणि भारताला कोरोनाविरोधातील लढाईत बळ येईल,’ असे निधी उभारणाऱ्या ‘सेवा फौंडेशन’ने म्हटले आहे. या संस्थेने भारतात पाठविण्यासाठी २,१८४ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर सज्ज ठेवले आहेत. निधी उभारण्यासाठी सोशल मीडियावर आवाहन केल्यानंतर १०० तासांच्या आत ६६ हजार ७०० हून अधिक भारतीय वंशाच्या नागरिकांनी ४७ लाख डॉलरचा निधी गोळा केला.

सेवा फौंडेशनही अमेरिकेतील भारतीयांची सर्वांत मोठी सेवाभावी संस्था आहे. भारतात ऑक्सिजनचा वेगाने पुरवठा करणे, हे आमचे प्राथमिक उद्दीष्ट असल्याचे या संस्थेने सांगितले. या संस्थेचे स्वयंसेवक रुग्णवाहिक, रुग्णालयांतील खाटांची परिस्थिती याबाबत माहिती देणारा डिजीटल हेल्प डेस्कही तयार केला जात आहे.

दक्षिण कोरिया ऑक्सिजन देणार

सोल : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी दक्षिण कोरिया भारताला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचा पुरवठा करणार आहे. याशिवाय, अनेक तपासणी उपकरणे आणि वैद्यकीय साहित्याचाही पुरवठा करणार आहे. भारतात असलेल्या दक्षिण कोरियाच्या नागरिकांना विमानाने परत आणले जाणार आहे.

कॅनडा, न्यूझीलंडकडूनही मदत

टोरांटो/वेलिंग्टन : कॅनडाकडून भारताला एक कोटी, तर न्यूझीलंडकडून रेड क्रॉस संघटनेला ७ लाख २० हजार डॉलर मदत मिळेल. संकटात भारताच्या पाठीशी असल्याचे या देशांच्या प्रतिनिधींनी सांगितले.