esakal | पत्रकारांच्या मृत्यूचे प्रमाण घटले; खून होण्याच्या प्रमाणात मात्र वाढ

बोलून बातमी शोधा

49 journalists murdered in 2019 Reporters Without Borders
  • येमेन, सीरिया धोकादायक देश
पत्रकारांच्या मृत्यूचे प्रमाण घटले; खून होण्याच्या प्रमाणात मात्र वाढ
sakal_logo
By
वृत्तसेवा

पॅरिस : जगभरात विविध संघर्षांमध्ये किंवा प्राणघातक हल्ल्यांमध्ये पत्रकारांचा मृत्यू होण्याच्या प्रमाणात यंदा घट झाली आहे. "रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर्स' या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार, 2019 मध्ये जगभरात 49 पत्रकारांचा मृत्यू झाला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

येमेन, सीरिया आणि अफगाणिस्तानमध्ये अंतर्गत संघर्ष सुरू असून, याच भागांमध्ये पत्रकारांचे मृत्यू अधिक प्रमाणात होतात. यंदाही याच देशांमध्ये पत्रकारांचे अधिक प्रमाणात मृत्यू झाले असले, तरीही गेल्या 16 वर्षांच्या तुलनेत ही संख्या सर्वांत कमी आहे. तरीही, हे तीन देश पत्रकारांसाठी अद्यापही धोकादायक असल्याचेही सिद्ध झाले आहे. गेल्या दोन दशकांमध्ये जगभरात सरासरी 80 पत्रकारांना विविध संघर्ष आणि हल्ल्यांमध्ये जीव गमवावा लागला आहे. पत्रकारांचे खून होण्याचे प्रमाण लॅटिन अमेरिकेमध्ये सर्वांत अधिक आहे. या खंडात एकूण 14 पत्रकारांचे या वर्षात खून करण्यात आले असून, त्यातील 10 घटना एकट्या मेक्‍सिकोमधील आहेत.

धाबे दणाणले ! भाजपच्या माजी पदाधिकाऱ्यासह सातजण तडीपार

संघर्षग्रस्त देशांमध्ये पत्रकारांचे मृत्यू होण्याचे प्रमाण घटले असतानाच लोकशाही असणाऱ्या देशांमध्ये त्यांचे खून होण्याचे प्रमाण वाढते आहे, ही बाब चिंताजनक असल्याचे "रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर्स' या संस्थेने म्हटले आहे. पत्रकारांचे अपहरण होण्याचेही प्रकार घडत असून सीरिया, येमेन, इराक आणि युक्रेनमध्ये या वर्षी 57 जणांना ओलीस ठेवण्यात आले होते.

तुरुंगातही डांबले जाते
अनेक देशांमध्ये पत्रकारांना तुरुंगात डांबण्याचे प्रकारही घडत आहेत. 2019 मध्ये जगभरात एकूण 389 पत्रकारांना विविध कारणांखाली तुरुंगात टाकण्यात आले. गेल्या वर्षीपेक्षा हे प्रमाण 12 टक्‍क्‍यांनी अधिक आहे. यातील निम्म्या घटना चीन, इजिप्त आणि सौदी अरेबिया या देशांमधील आहेत. तुरुंगात डांबलेल्या एकूण पत्रकारांपैकी एकट्या चीनने एकतृतीयांश पत्रकारांना डांबले आहे.