esakal | अबब! अमेरिकेत एका दिवसांत 865 जणांचा मृत्यू

बोलून बातमी शोधा

newyork

अमेरिकेत कोरोनाबाधितांची संख्या आणखी प्रचंड वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे येथील रुग्णालयांनी आगामी धोका ओळखून तयारी सुरु केली आहे. पुढील काही दिवसांत रुग्णसंख्या प्रचंड वेगाने वाढण्याची शक्यता गृहित धरुन सर्व यंत्रणा राबविण्यात येत आहे.

अबब! अमेरिकेत एका दिवसांत 865 जणांचा मृत्यू
sakal_logo
By
वृत्तसंस्था

न्यूयॉर्क : अमेरिकेत आणि विशेषत: न्यूयॉर्कमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत असून, अमेरिकेत एका दिवसांत तब्बल 865 जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाने दिलेल्या अहवालानुसार, सोमवारी रात्री साडेआठवाजेपर्यंत अमेरिकेत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 3008 इतकी होती. मंगळवारी रात्री साडेआठ वाजता ही संख्या 3873 इतकी झाली होती. अमेरिकेत आतापर्यंत 1,88,172 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. इटली, चीन, स्पेन या देशांमधील बाधितांच्या संख्येपेक्षा ही संख्या जास्त आहे. 

अमेरिकेत कोरोनाबाधितांची संख्या आणखी प्रचंड वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे येथील रुग्णालयांनी आगामी धोका ओळखून तयारी सुरु केली आहे. पुढील काही दिवसांत रुग्णसंख्या प्रचंड वेगाने वाढण्याची शक्यता गृहित धरुन सर्व यंत्रणा राबविण्यात येत आहे. न्यूयॉर्कमध्ये दहा दिवसांपूर्वी कोरोनाबाधितांची संख्या 463 होती. ती आता 36 हजारांपर्यंत गेली आहे. आपली परिस्थिती इटलीप्रमाणे होऊ नये यासाठी अमेरिका सरकारही युद्धपातळीवर प्रयत्न होत आहेत. इटलीमध्ये सर्व रुग्णालये ‘ओव्हरफ्लो’ झाली असून नव्या रुग्णांसाठी कोणत्याही रुग्णालयांत जागा नाही.

कोरोना संसर्गाविरोधातील लढ्यात पुढील तीस दिवस अमेरिकेसाठी महत्त्वाचे आहेत, असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील ‘सोशल डिस्टन्सिंग’ची कालमर्यादा 30 एप्रिलपर्यंत वाढविली असून त्याची कठोर अंमलबजावणी करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. नागरिकांनी महिनाभर सरकारच्या सूचनांचे कठोर पालन करण्याचे आवाहन केले आहे. पुढील तीस दिवस अत्यंत महत्त्वाचे असून या काळात आपल्याला मोठा संघर्ष करावा लागणार आहे, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. 

कोरोनाच्या उद्रेकांमुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसणार असून, त्यामुळे अनेकांच्या नोकऱ्या जाऊ शकता. पुढील काही महिन्यांमध्ये अमेरिकेतील परिस्थिती आणखी बिघडू शकते, असे आर्थिक तज्ज्ञांचे मत आहे. 21 मार्च रोजी संपलेल्या आठवड्यापर्यंत अमेरिकेत 33 लाख जणांनी नोकरी गेल्याचे सरकारला कळविले आहे. अमेरिकेत 4.7 कोटी नागरिकांवर बेरोजगारीची वेळ येऊ शकते, अशी शक्यताही वर्तविण्यात येत आहे.