esakal | मोहिम फत्ते, अफगाणिस्तान सोडण्याशिवाय पर्याय नव्हता - बायडेन
sakal

बोलून बातमी शोधा

मोहिम फत्ते, अफगाणिस्तान सोडण्याशिवाय पर्याय नव्हता - बायडेन

मोहिम फत्ते, अफगाणिस्तान सोडण्याशिवाय पर्याय नव्हता - बायडेन

sakal_logo
By
नामदेव कुंभार

अफगाणिस्तानच्या भूमीवर मागील वीस वर्षांपासून तालिबान्यांसोबत सुरू असलेला महासत्तेचा संघर्ष आज अखेर थांबला. अमेरिकेच्या शेवटच्या विमानाने काबूल विमानतळाची धावपट्टी सोडताच तालिबान्यांनी विजयाची घोषणा केली. अमेरिकी सैनिकांना घेऊन जाणारे ‘सी-१७’ शेवटचे विमान सोमवारी मध्यरात्री मायदेशाच्या दिशेने रवाना झाले. यानंतर अध्यक्ष बायडेन यांनी अफगाणिस्तानातील वीस वर्षांचे अमेरिकेचे लष्करी वास्तव्य संपल्याचे जाहीर केले. आणखी जीवितहानी होऊ न देता येथून माघार घेतल्याबद्दल त्यांनी लष्कराचे आभार मानले आहे. लष्कराचे प्रमुख आणि सर्व कमांडर यांच्या शिफारशीनुसार एकमताने ही पूर्वनियोजित सुटका मोहीम आम्ही संपवत आहोत. सैनिकांचे प्राण वाचवायचे असतील तर ही लष्करी मोहीम संपुष्टात आणावी असे त्यांचे मत होते. तसेच अफगाणिस्तान सोडू पाहणाऱ्या नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने देखील येथून माघार घेणेच श्रेयस्कर होते, असे ज्यो बायडेन यांनी म्हटले आहे. अफगाणिस्तानमधून सर्व सैन्य माघारी आल्यानंतर बायडेन देशाला संबोधित करत होते. यावेळी त्यांनी अफगाणिस्तानमधील मिशन यशस्वी झालं असून सैन्य माघारी घेण्याचा निर्णय योग्यचं असल्याचे सांगितलं. तसेच अफगाणिस्तान सोडण्याशिवाय कोणताही पर्याय नव्हता, तिथे कोट्यवधी डॉलर खर्च करण्यात आले आहेत. दिवसेंदिवस ही मोहिम अधिकच महागडी ठरत होती, असेही बायडेन म्हणाले.

डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?

अमेरिकेने आतापर्यंत एवढ्या वाईट पद्धतीने कधीच युद्धातून माघार घेतली नव्हती. तालिबानने अमेरिकेला शस्त्र परत केलेली नाहीत. ती शस्त्रे आपण परत घ्यायला हवी होती किंवा बॉम्ब टाकून ती नष्ट तरी करायला हवी होती.

तालिबानने काय म्हटलं?

या विजयाबद्दल अफगाणिस्तानचे अभिनंदन. यातून आक्रमकांनी योग्य तो धडा घ्यावा. अमेरिकेप्रमाणेच आम्हाला अन्य देशांसोबत देखील मैत्रीपूर्ण संबंध हवे आहेत. भारत देखील आमच्या दृष्टीने महत्त्वाचा देश आहे, असे तालिबानचे प्रवक्ता झबीउल्लाह मुजाहिद म्हणाले.

हेही वाचा: MPSC करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी

देशाला संबोधित करताना बायडेन काय म्हणाले?

  • अफगाणिस्तानमध्ये आम्ही जे केलं ते गौरवशाली आहे. आमच्या उपस्थितीमुळे अफगाणिस्तानमध्ये इतक्या वर्ष शांतता होती. अफगाणिस्तानमधील मोहिम यशस्वी ठरली. अफगाणिस्तानमधून परतण्याचा निर्णयही योग्यच असल्याचं मला वाटतेय. अफगाणिस्तानमधील युद्ध आता संपले आहे.

  • अफगाणिस्तानमधून सैन्य माघारी बोलवण्याच्या निर्णयाची जबाबदारी मी घेतोय. काहींच्या मते हा निर्णय आधीच घ्यायला हवा होता. पण याच्याशी मी सहमत नाही. जर आधीच सैन्य माघारी घेतलं असते तर तिथे अराजकता पसरली असती युद्धाची स्थिती निर्माण झाली असती. कोणत्याही संघर्षाशिवाय आणि जीवितहानीशिवाय युद्धविराम झाला आहे.

  • कुणीही अमेरिकेला हानी पोहचवण्याचा प्रयत्न केला तर सोडलं जाणार नाही. त्याला शोधून मारलं जाईल.

  • अफगाणिस्तानमधून एक लाख 25 हजारांपेक्षा जास्त लोकांना सुरक्षित बाहेर काढलं आहे.

  • अमेरिकेच्या हितासाठी काबूल सोडलं. याची सर्वस्वी जबाबदारी माझी आहे.

  • अफगाणिस्तानमध्ये तीन लाख सैनिकांना तयार केलं. दोन दशकामध्ये तिथे लाखो डॉलर खर्च केले आहेत.

  • अफगाणिस्तानमध्ये सध्या 100 ते 200 नागरिक अद्याप आहेत

  • अफगाणिस्तानचे राष्ट्रपती देश सोडून पळाले. त्यामुळे देशात अराजकता माजली. तालिबानने पाच हजार दहशतवाद्यांना तुरुंगातून सोडलं.

loading image
go to top