पुतीन यांचे कट्टर विरोधक नवाल्नी यांना जर्मनीला हलवलं

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 22 August 2020

शनिवारी सकाळी आठच्या सुमारास नवाल्नी यांना खास विमानाने जर्मनीला नेण्यात आलं. ओमस्क ते जर्मनी विमान प्रवास जवळपास साडेचार हजार किमी इतका आहे. त्यासाठी सहा तासांचा वेळ लागणार आहे.

मॉस्को - रशियातील विरोधी पक्षनेते आणि राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा कट्टर विरोधक असलेल्या अॅलेक्सी नवाल्नी यांना पुढील उपचारांसाठी ओमस्कमधून जर्मनीला हलवण्यात आले आहे. गुरुवारी विमान प्रवास करताना त्यांच्यावर विषप्रयोग झाल्याने प्रकृती अचानक बिघडली होती. तेव्हा इमर्जन्सी लँडिंग करून नवाल्नी यांना ओमस्क इथल्या रुग्णालायत दाखल कऱण्यात आलं होतं. मात्र ओमस्कमध्ये त्यांची प्रकृती खालावली आणि कोमातही गेले. गेल्या 24 तासात त्यांना जर्मनीला उपचारासाठी नेण्यावरून रुग्णालय प्रशासनासोबत वादही सुरु होता. 

रशियातील डॉक्टरांनी नवाल्नी यांची प्रकृती अस्थिर असल्यानं अशा अवस्थेत जर्मनीला उपचारासाठी नेणं धोक्याचं असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे नवाल्नी यांना जर्मनीला नेता येणार नाही असंही सांगितलं होतं. अखेर शनिवारी सकाळी आठच्या सुमारास नवाल्नी यांना खास विमानाने जर्मनीला नेण्यात आलं. ओमस्क ते जर्मनी विमान प्रवास जवळपास साडेचार हजार किमी इतका आहे. त्यासाठी सहा तासांचा वेळ लागणार आहे. 

रशियाच्या डॉक्टरांनी नवाल्नी यांच्यावर विषप्रयोग झाला नसल्याचं म्हटलं आहे. तसे कोणतेही पुरावे नसल्याचंही डॉक्टरांनी सांगितलं होतं. तसंच शुक्रवारी जर्मनीच्या तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक अद्ययावत वैद्यकीय साधने असलेल्या पथकासह आलं होतं. मात्र तरीही ओमस्क रुग्णालय प्रशासनाने नवाल्नी यांची प्रकृती अस्थिर असल्याचं कारण सांगत त्यांना जर्मनीला पाठवण्यास नकार दिला होता. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

नवाल्नी 44 वर्षांचे असून रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात. रशियात परत येत असताना विमानातच त्यांना अस्वस्थ वाटू लागलं आणि बेशुद्ध झाले. त्यामुळे इमर्जन्सी लँडिंग करत ओमस्क इथं उपचारासाठी दाखल केलं होतं. नवाल्नी यांच्या समर्थकांनी असा दावा केला की, त्यांना चहातून विष देण्यात आलं. दुसरीकडे अद्ययावत उपचारासाठी जर्मनीतील रुग्णालयात नेण्यासही मुद्दाम नकार दिला जात असल्याचा आरोपही समर्थकांनी डॉक्टरांवर केला आहे. 

नवाल्नी यांच्यासोबत काय घडलं?
अ‍ॅलेक्सी सायबेरियातील टोम्स्क इथून रशियाची राजधानी मॉस्कोला परत येत होते. त्यावेळी अचानक त्यांची प्रकृती बिघडली. अस्वस्थ वाटू लागल्यानंतर 800 किमी विमान उड्डाण झाल्यानंतर अचानक ओमस्क इथं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. सायबेरियातून अ‍ॅलेक्सी हे विमानातून परत येत होते. तेव्हा विमानात चहातून विष दिल्याचा संशय आहे. गरम चहामुळे शरीरात विष वेगानं मिसळल्याचंही डॉक्टरांचं म्हणणं आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: alexie navalny move to germany from omsk on saturday morning