'मी लवकरच परत येईन'; विषप्रयोग झालेल्या नवाल्नी यांनी शेअर केला PHOTO

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 15 September 2020

 विमानात विषप्रयोग झालेले रशियातील विरोधी पक्षातील प्रमुख नेते अलेक्सी नवाल्नी यांनी रशियात परतण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

बर्लिन - विमानात विषप्रयोग झालेले रशियातील विरोधी पक्षातील प्रमुख नेते अलेक्सी नवाल्नी यांनी रशियात परतण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. नवाल्नी यांनी आज त्यांचे कुटुंबीयांबरोबरील छायाचित्रही इन्स्टाग्रामवर प्रसिद्ध केले आहे. त्यांना आता जीवरक्षक प्रणालीची आवश्‍यकता नसल्याचे या छायाचित्रावरून दिसत आहे. नवाल्नी म्हणाले की, मी नवाल्नी आहे. मला तुम्हा सर्वांची आठवण येत आहे. सध्या मी जास्त काही करू शकत नाही. पण मी काल पूर्ण दिवस स्वत:हून श्वास घेऊ शकलो. जीवरक्षक प्रणालीशिवाय मी श्वास घेतला. गळ्यात आता त्रास होत नाही असंही त्यांनी सांगितलं. 

अलेक्सी नवाल्नी हे २० ऑगस्टला विमान प्रवास करत असताना विमानातच बेशुद्ध पडले होते. त्यांना उपचारांसाठी तातडीने जर्मनीत हलविण्यात आले होते. त्यांच्यावर नोव्हीचोक विषाचा प्रयोग झाल्याचे तीन देशांच्या प्रयोगशाळांमध्ये झालेल्या चाचणीतून स्पष्ट झाले आहे.

नवाल्नी यांना रशियाचे अध्यक्ष ब्लादीमिर पुतीन यांच्याच आदेशानुसार विष देण्यात आल्याचा नवाल्नी समर्थकांचा आरोप असून रशिया सरकारने तो फेटाळून लावला आहे. ‘नवाल्नी हे रशियाला परतणार का, असे मला रोज सकाळी पत्रकार विचारत असतात. नवाल्नी यांनी रशियाला परतण्याशिवाय दुसरा विचारच केलेला नाही,’ असे त्यांच्या प्रवक्त्याने आज स्पष्ट केले. नवाल्नी यांनीही सोशल मीडियावरून रशियातील जनतेशी संवाद साधला.

50 वर्षे जुनं विष
नोव्हिचोक हे सोविएत संघाच्या काळातील एक नर्व्ह एजंट आहे. रशियाच्या गुप्तचर संस्था त्यांच्या एखाद्या शत्रूला मारण्यासाठी याचा वापर करतात असं म्हटलं जातं. 1960 ते 1970 च्या दशकात हे तयार करण्यात आलं होतं. विशेष म्हणजे 1990 च्या आधी जगाला या नर्व्ह एजंटबद्दल काहीच माहिती नव्हती. रशियातील डॉक्टर विल मिर्झानोव्ह यांनी त्यांच्या स्टेट सिक्रेट्स या पुस्तकात विषाबद्दल सांगितलं होतं. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: alexy navalny share photo from hospital say i will be back soon