अमेरिकेत समर्थकांच्या गोंधळानंतर ट्रम्प नरमले; म्हणाले, सत्तेच्या हस्तांतरणासाठी तयार पण...

टीम ई सकाळ
Thursday, 7 January 2021

अमेरिकन काँग्रेसनं जो बायडन हेच अमेरिकेचे पुढचे राष्ट्राध्यक्ष असतील आणि कमला हॅरिस या उप राष्ट्राध्यक्ष असतील अशी घोषणा केली आहे. काँग्रेसच्या संयुक्त सत्रात सध्याचे उपराष्ट्राध्यक्ष माईक पेन्स आणि नॅन्सी पलोसी यांच्यासह जाहीर केलं.

वॉशिंग्टन - अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्रम्प यांना पराभव पत्करावा लागला. त्यानंतर ट्रम्प यांच्याकडून सातत्याने पराभव स्वीकारणार नसल्याची वक्तव्ये करण्यात आली आणि निकालाविरोधात न्यायालयात आव्हानही दिलं. मात्र तिथेही त्यांच्या विरोधात निकाल देण्यात आले. पेन्सिल्वेनिया आणि अरिझोनातील मतांवर आक्षेप घेतला होता. सिनेट आणि हाउस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज मध्येही फेटाळून लावल्यानंतर इलेक्ट्रोरल मतांना मान्यता दिली गेली. या प्रक्रियेसाठी सदनात चर्चा सुरु होती. तेव्हा कॅपिटल बिल्डिंगवर ट्रम्प समर्थकांनी हल्ला केला. यात 4 जणांचा मृत्यू झाला आहे. 

अमेरिकेत झालेल्या गोंधळानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटर अकाउंट 24 तासांसाठी ब्लॉक करण्यात आलं आहे. त्यामुळे ट्रम्प यांनी एका त्यांच्या प्रवक्त्याच्या ट्विटरवरून एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे. त्यात ट्रम्प यांनी सत्तेच्या हस्तांतरणासाठी तयार असल्याचं म्हटलं आहे. मात्र निवडणुकीत भ्रष्टाचार झाल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. निवडणूक निकालाशी आपण असहमत आहे. पण तरीही 20 तारखेला सत्ता सोपवली जाईल असंही त्यांनी प्रवक्त्यांच्या ट्विटरवरून सांगितलं आहे.  

दरम्यान, ट्रम्प समर्थकांच्या या गोंधळामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचा उर्वरीत 13 दिवसांचा कार्यकाळही अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यांच्याविरोधात महाभियोग चालवला जाऊ शकतो. दुसरीकडे अमेरिकन काँग्रेसनं जो बायडन हेच अमेरिकेचे पुढचे राष्ट्राध्यक्ष असतील आणि कमला हॅरिस या उप राष्ट्राध्यक्ष असतील अशी घोषणा केली आहे. काँग्रेसच्या संयुक्त सत्रात सध्याचे उपराष्ट्राध्यक्ष माईक पेन्स आणि नॅन्सी  पलोसी यांच्यासह जाहीर केलं. 

ट्रम्प समर्थकांच्या हल्ल्यानंतर संसदेचं काम पुन्हा सुरु केलं होतं. चर्चेवेळी काही समर्थकांनी इमारतीत घुसण्याचा प्रयत्न केला तेव्हा हे काम थांबवलं होतं. घुसखोरांना रोखण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला. यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला अशी माहिती वॉशिंग्टन डीसी पोलिसांनी दिली.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: america capitol violence trump ready to transition power to biden