Bomb Cyclone : नाताळच्या उत्साहावर बर्फाची चादर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bomb Cyclone

Bomb Cyclone : नाताळच्या उत्साहावर बर्फाची चादर

वॉशिंग्टन : अमेरिकेला ‘बाँब’ या हिमवादळाने चांगलाच तडाखा दिला असून देशातील ६० टक्के जनतेला तीव्र थंडीची धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. नाताळ निमित्त देशभरात उत्साहाचे वातावरण असतानाच सर्वत्र थंडीची लाट पसरल्याने नागरिक घरातच अडकून पडले आहेत. या हिमवादळात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या २१ झाली आहे.

‘बाँब’ वादळामुळे अमेरिकेत काही ठिकाणी तापमानाचा पारा उणे ४५ अंशांपर्यंत खाली गेला आहे. अमेरिकेत ठिकठिकाणी स्थानिक प्रशासनाने जनतेसाठी धोक्याचा इशारा जारी केला आहे. त्यामुळे देशातील वीस कोटींहून, म्हणजे ६० टक्क्यांहून अधिक जनतेला या वादळाचा सामना करावा लागत आहे.

या हिमवादळाचा प्रभाव आणखी काही दिवस राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हिमवादळाशी संबंधित घटनांमध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या २१ वर गेली आहे. तीव्र थंडीमुळे यापैकी काही जणांचा मृत्यू झाला असला तरी बर्फामुळे रस्ते निसरडे झाल्याने अपघात होऊनही काहींचा मृत्यू झाला आहे. अनेक ठिकाणी वाहनांची एकमेकांना धडक बसून अपघात झाले आहेत.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, माँटाना येथे उणे ४५.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून आयोवा येथे उणे ३८ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले आहे. या थंडीच्या प्रचंड लाटेमुळे नागरिक आजारी पडण्याचे प्रमाणही वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. हिमवादळामुळे जोरदार वारेही वाहत असून त्यामुळे अनेक झाडे उन्मळून पडली असून विजेच्या ताराही तुटल्या आहेत. देशातील १४ लाख घरांचा वीज पुरवठा खंडित झाला आहे. अमेरिकेबरोबर कॅनडालाही हिमवादळाचा फटका बसला आहे.

हा गंभीर प्रकार : बायडेन

हिमवादळाचा सर्वाधिक फटका पेनसिल्वानिया, व्हर्जिनिया आणि उत्तर कॅरोलिना या राज्यांना बसला आहे. टेनेसी, न्यूयॉर्क, मेरीलँड आणि कनेक्टिकट येथेही धोक्याचा इशारा जारी करण्यात आला आहे. वादळामुळे आज दिवसभरात किमान पाच हजार विमान उड्डाणे रद्द करावी लागली. बेघर लोकांसाठी आणि वीज पुरवठा खंडित झालेल्या घरांतील लोकांसाठी तातडीने निवारागृहे सुरु करण्याची मागणी होत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी, हा हवामान बदलाचा परिणाम असल्याचे सुचविले आहे. ‘आपण लहान असताना हिमवर्षाव होत होता, हा तसा प्रकार नाही. हे गंभीर वातावरण निर्माण झाले आहे,’ अशी प्रतिक्रिया बायडेन यांनी दिली आहे.

टॅग्स :americaglobal news