Poland Missile Accident : अमेरिका-रशिया यांच्यात वादाची ठिणगी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Poland Missile Accident

Poland Missile Accident : अमेरिका-रशिया यांच्यात वादाची ठिणगी

न्यूयॉर्क : पोलंडमधील क्षेपणास्त्र दुर्घटनेचे पडसाद संयुक्त राष्ट्रांच्या (युएन) सुरक्षा समितीतही उमटले. या दुर्घटनेच्या जबाबदारीवरून अमेरिका व मित्रदेश समितीच्या बैठकीत रशियाशी भिडले. दरम्यान, रशिया व युक्रेनमध्ये गेली नऊ महिने सुरू असलेले युद्ध अधिक चिघळण्यापासून रोखण्याची गरज युएनच्या राजकीय प्रमुखांनी व्यक्त केली. प्रत्यक्षात नाटोचे प्रमुख व पोलंडच्या अध्यक्षांनी हा जाणीवपूर्वक केलेला हल्ला नव्हता, असे स्पष्ट केले होते. रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्याला प्रत्युत्तर देताना युक्रेननेच त्यांच्याकडील सोव्हिएत काळातील क्षेपणास्त्र सोडले होते.

अमेरिकेच्या राजदूत लिंडा थॉमस-ग्रीनफिल्ड म्हणाल्या, की पोलंडमध्ये क्षेपणास्त्र कोसळण्याची दु:खद घटना कधीही घडायला नको होती. मात्र, रशियाने विनाकारण युक्रेनवर आक्रमण केल्याने व युक्रेनवरील नागरी पायाभूत सुविधांवर नव्याने क्षेपणास्त्र हल्ले केल्याने ही घटना घडली, असा आरोप त्यांनी केला. रशियाचे युएनमधील राजदूत वॅसिली नेबेन्झिया यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले. युक्रेन आणि पोलंड हे रशिया व नाटोमध्ये थेट संघर्षाची चिथावणी देत आहेत, असे ते म्हणाले. अमेरिका व अल्बानियाने युक्रेनमधील गेल्या आठवड्यातील सद्य:स्थिती जाणून घेण्यासाठी सुरक्षा समितीची ही बैठक बोलाविली होती. मात्र, या बैठकीत पोलंडमधील क्षेपणास्त्र दुर्घटनेवर प्रामुख्याने चर्चा झाली. या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला होता.

अमेरिकेच्या राजदूत ग्रीनफिल्ड यांनी युक्रेनवर रशियाने मंगळवारी ९० क्षेपणास्त्रे डागली. नागरी पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्यात आले. रशियाचे अध्यक्ष पुतीन हे जाणीवपूर्वक करत आहेत, असा आरोप केला. रशियाने युक्रेनविरुद्ध युद्धच केले नसते तर पोलंडमधील निष्पाप नागरिकांचा क्षेपणास्त्र दुर्घटनेत मृत्यू झाला नसता, असे पोलंडचे राजदूत क्रिझिस्टोफ स्कझेरर्स्की म्हणाले. तर ब्रिटनचे राजदूत बार्बरा वूडवर्ड म्हणाले, की रशियाच्या बेकायदा व अन्यायकारक आक्रमणामुळेच पोलंडमधील दुर्घटना घडली.

युएनमधील राजकीय विभागाचे उपसचिव रोझमेरी डिकार्लो म्हणाल्या, की रशियाने युक्रेनवर आक्रमण सुरू केल्यापासून सर्वाधिक बॉम्बवर्षाव केला असून आगामी हिवाळ्यात त्याची तीव्रता आणखी वाढू शकते. आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार नागरिक व नागरी सुविधांवर हल्ले करण्यास मनाई आहे, असेही त्यांनी बजावले. मात्र, हे युद्ध संपण्याची चिन्हे नसून त्याची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.

हल्ल्यास भाग पाडू नका

वॅसिली नेबेन्झिया यांनी पोलंडमधील क्षेपणास्त्र दुर्घटनेला रशियाच जबाबदार असल्याच्या युक्रेनचे अध्यक्ष व पोलंडच्या अधिकाऱ्यांच्या सुरवातीच्या वक्तव्याकडे लक्ष वेधले. पाश्चिमात्य देशांनी युक्रेनला शस्त्रास्त्रे व दारूगोळा पुरविला नाही तर रशिया कोणतीही लष्करी कारवाई करणार नाही. युक्रेनी दलाच्या रशियाविरुद्धच्या दहशतवादी कारवाईवर पाश्‍चिमात्यांनी प्रतिक्रिया दिली तर रशियाला युक्रेनमधील नागरी पायाभूत सुविधांवरील हल्ल्यास भाग पाडले जाणार नाही, असेही ते म्हणाले.

युक्रेनमधील ओडेसावर प्रथमच क्षेपणास्त्र हल्ला

किव : रशियाने युक्रेनवरील आक्रमणाची धार वाढविली असून युक्रेनच्या दक्षिणेकडील ओडेसा प्रांतावर पहिल्यांदाच क्षेपणास्त्र हल्ला केला. ओडेसातील पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्यात आले, अशी माहिती ओडेसाचे प्रादेशिक गव्हर्नर मॅक्झिम मार्चेन्को यांनी दिली. युक्रेनवरील मोठ्या भूभागावर क्षेपणास्त्रांचा प्रचंड मारा होण्याचा इशाराही त्यांनी दिला. नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.