अमेरिकेच्या खासदारांसमोर जगातल्या चार दिग्गज कंपन्यांचे CEO झाले हजर; गुगल-फेसबुकवर गंभीर आरोप

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 30 July 2020

जगातील सर्वत मोठ्या कंपन्या असलेल्या गुगल, अॅपल, फेसबुक आणि अॅंमेझॉनचे सीईओ बुधवारी अमेरिकन खासदारांसमोर हजर झाले होते.

वॉशिंग्टन - जगातील सर्वत मोठ्या कंपन्या असलेल्या गुगल, अॅपल, फेसबुक आणि अॅंमेझॉनचे सीईओ बुधवारी अमेरिकन खासदारांसमोर हजर झाले होते. कंपन्यांवर करण्यात आलेल्या गंभीर आरोपांना त्यांनी उत्तरे दिली. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांनी अमेरिकन सिनेटमध्ये डेमोक्रॅटस आणि रिपब्लिकन खासदारांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. अमेरिकन काँग्रेसच्या खासदरानी सीईओंवर प्रश्नांची सरबत्ती केली. 

अमेरिकेच्या अविश्वास उपसमितीचे अध्यक्ष डेव्हिड एन सिसिलाइन यांच्या नेतत्वाखाली संसदेच्या न्यायिक समितीसमोर फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग, अॅमेझॉने संस्थापक जेफ बेजोस, गुगलचे सीईओ सुंदर पिचाई आणि अॅपलचे सीईओ टिम कूक हजर झाले होते. सुनावणीच्या आधी चारही सीईओंनी खरं बोलेन अशी शपथ घेतली. जगातल्या या चार दिग्गज कंपन्यांची मिळून एकत्रित मार्केट व्हॅल्यू 5 ट्रिलियन डॉलर इतकी आहे. 

हे वाचा - Instagram ठेवतंय तुमच्यावर नजर? कंपनी म्हणते बग आहे

डेमोक्रॅटस आणि रिपब्लिकन खासदारांना कंपन्यांच्या सीईओंना प्रश्न विचारण्याची संधी देण्यात आली. या सर्व प्रश्नांवर सीईओंनी संयमाने उत्तर देण्याचा प्रयत्न केला. काहीवेळा सीईओंचा रागही अनावर झाला. तर एखाद्या प्रश्नावर उत्तर न देता गप्प बसणंही त्यांनी पसंत केलं. झुकेरबर्ग यांना प्रश्न विचारताना डेटा लीक प्रकरणावर जोर दिला तर गुगलवर अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणुकीवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. 

गुगलने कंटेट चोरी केल्याचा आरोप

अमेरिकेतील खासदार डेव्हिड सिसिलिन यांनी गुगलवर कंटेंट चोरीचा आरोप केला आहे. गुगल प्रामाणिक व्यावसायिकांकडून कंटेट का चोरते? अशा सवाल त्यांनी केला. सिसिलिन यांनी आरोप केला की, गुगलने येल्प इंकचा रिव्ह्यू चोरला आणि कंपनीला धमकी दिली की जर यावर आक्षेप घेतलात तर येल्पला गुगल सर्चमधून हटवण्यात येईल. यावर उत्तर देताना सुंदर पिचाई यांनी शांतपणे सांगितलं की, या आरोपांना तपशिलवार समजून घ्यायचं आहे. तसंच याच्याशी समहत नसल्याचं सांगत आरोप फेटाळून लावले. 

हे वाचा - भारतात iPhone 11 च्या निर्मितीमुळे चीनला बसणार दणका

फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांनी 2012 मध्ये खरेदी केलेल्या इन्स्टाग्राम कंपनीबाबतही अनेक प्रश्न विचारण्यात आले. त्यांच्या व्यवसायाला धोका निर्माण होईल म्हणून इन्स्टाग्रामची खरेदी केली का असा प्रश्न विचारला होता. यावर झुकेरबर्ग म्हणाले की, तेव्हा इन्स्टाग्राम एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म नव्हता तर फक्त एक फोटो शेअर करणारं अॅप होतं. आम्ही हा विचार केला नव्हता की इन्स्टाग्राम आमच्याशी स्पर्धा करत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: american cinet questioned to ceo of amazon apple facebook and google