"एकाचवेळी तिघींसोबत लग्न करेन"; अफगाण तरुणीने सांगितलं भयाण वास्तव

"सर्वकाही असं एका झटक्यात संपेल याची कल्पनासुद्धा मी केली नव्हती."
प्रतिकात्मक छायाचित्र
प्रतिकात्मक छायाचित्र

(काबूलमधील विद्यापिठात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने 'द गार्डियन'ला दिलेल्या मुलाखतीत तिथलं भयाण वास्तव मांडलं आहे.)

"रविवारी सकाळी विद्यापिठात जात असताना महिला डॉर्मिटरीमधून काहीजणी बाहेर धावत येताना दिसल्या. नेमकं काय झालं असा प्रश्न त्यातल्या एकीला मी विचारला असता तालिबान काबुलमध्ये आल्याने पोलिसांनी त्यांना डॉर्मिटरी रिकामा करण्याचे आदेश दिल्याचं तिने सांगितलं. ज्या महिलांनी बुरखा परिधान केला नसेल, त्यांना ते मारतील, असंही पोलीस म्हणाले. आम्हा सर्वांना सुरक्षित आपापल्या घरी पोहोचायचं होतं. पण आम्ही सार्वजनिक वाहनांचा वापर करू शकत नव्हतो. चालकांनी आम्हाला त्यांच्या कारमध्ये बसू दिले नाही, कारण त्यांना महिलांची वाहतूक करण्याची जबाबदारी घ्यायची नव्हती. बाहेरच्या देशांमधून काबुलमध्ये शिकायला आलेल्या महिलांसाठी ही परिस्थिती आणखी वाईट होती. कारण नेमकं आता कुठे जायचं याबद्दल त्यांच्या मनात भीती आणि गोंधळ होता."

"हे सर्व घडत असताना, जवळच उभी असलेली काही पुरुषमंडळी मुली आणि महिलांची खिल्ली उडवत होते. ज्या गोष्टीची दहशत आम्हाला सतावत होती, त्यावर ते मिश्किलपणे हसत होते. जा आणि स्वत:वर चादरी (बुरखा) ओढून घ्या, असं त्यातल्या एकाने कुत्सितपणे म्हटलं. तर रस्त्यावर मोकळेपणाने फिरण्याचा हा तुमचा शेवटचा दिवस आहे, असं दुसरा म्हणाला. मी एका दिवसात तुमच्यापैकी चौघींशी लग्न करेन, असं तिसऱ्याने बोलून दाखवलं."

"शासकीय कार्यालये बंद असल्याने माझी बहीण अनेक मैल धावून घरी परतली. माझ्या लोकांची आणि माझ्या समाजाची सेवा करण्यासाठी ज्या कम्प्युटरने गेली चार वर्षे माझी मदत केली, ते अत्यंत दु:खाने मी बंद केलं. साश्रू नयनांनी मी माझं डेस्क सोडलं आणि सहकाऱ्यांना निरोप दिला. मला माहित होतं की हा माझ्या नोकरीचा शेवटचा दिवस आहे, असं ती म्हणाली."

"मी अफगाणिस्तानातील दोन सर्वोत्कृष्ट विद्यापिठांमधून एकाच वेळी दोन पदव्या पूर्ण केल्या आहेत. नोव्हेंबरमध्ये मला अमेरिकन युनिव्हर्सिटी ऑफ अफगाणिस्तान आणि काबुल युनिव्हर्सिटीमधून पदवी मिळणे अपेक्षित होते, पण आज सकाळी सर्व आठवणी माझ्या डोळ्यांसमोर तरळत होत्या."

"आज मी जी व्यक्ती आहे, ती बनण्यासाठी गेले अनेक दिवसरात्र मेहनत करतेय. पण आज सकाळी जेव्हा मी घरी पोहोचले, तेव्हा माझी बहीण आणि मी सर्वात आधी आमच्या आयडी, डिप्लोमा आणि प्रमाणपत्र लपवण्यासाठी धडपडत होतो. हे खूप त्रासदायक होतं. ज्या गोष्टींचा आम्हाला अभिमान वाटला पाहिजे, त्या आम्हाला का लपवाव्या लागत आहेत? अफगाणिस्तानमध्ये आता आम्हाला आमची ओळख लपवावी लागेल."

"एक महिला म्हणून मला असं वाटतं की पुरुषांनी सुरु केलेल्या या राजकीय युद्धाची बळी मी ठरले. आता आम्ही मोठ्याने हसू शकत नाही, आवडती गाणी ऐकू शकत नाही, माझ्या आवडत्या कॅफेमध्ये माझ्या मित्रमैत्रिणींना भेटू शकत नाही, माझा आवडता पिवळा ड्रेस मी परिधान करू शकत नाही, लिपस्टिक लावू शकत नाही. इतकंच काय तर मी नोकरी करू शकत नाही किंवा गेल्या काही वर्षांपासून मी ज्या पदवीसाठी मेहनत घेतेय, तेसुद्धा मी विद्यापिठातून संपादित करू शकत नाही."

"आज घरी परतत असताना, रस्त्यावर असलेल्या ब्युटी पार्लरकडे माझी नजर गेली. जिथे मी मॅनिक्युर करायचे. मला नखांना नेलपेंट लावायला खूप आवडतं. ब्युटी पार्लरचा पुढचा दरवाजा मुलींच्या सुंदर फोटोंनी सजवलेला होता. रातोरात हे सर्व तिथून काढून टाकण्यात आलं. आता मला आजूबाजूला फक्त स्त्रियांचे भयभीत चेहरे, पाणावलेले डोळे आणि स्त्रियांचा तिरस्कार करणारे पुरुष, ज्यांना स्त्रियांनी शिक्षण घेणे, नोकरी करणे आवडत नाहीत असे कुरुप चेहरे पहायला मिळत आहेत. जे लोक स्त्रियांची खिल्ली उडवायचे, त्यांचे आनंदी चेहरे पाहून मला अधिक दु:ख होतं. आमच्या बाजूने उभं राहण्याऐवजी ते तालिबान्यांच्या पाठिशी उभे राहून त्यांना अधिक शक्तीशाली बनवत आहेत."

"जे काही थोडंफार स्वातंत्र्य मिळालं होतं, त्यासाठी सुद्धा अफगाणी महिलांना खूप त्याग करावा लागला आहे. मी अनाथ असल्याने शिक्षण पूर्ण करण्यासाठी मला कारपेट शिवण्याचं काम करावं लागलं. मी अनेक आर्थिक समस्यांचा सामना केला आणि भविष्यासाठी माझ्या अनेक योजना होत्या. सर्वकाही असं एका झटक्यात संपेल याची कल्पनासुद्धा मी केली नव्हती."

"माझ्या आयुष्याच्या २४ वर्षांत मी जे काही मिळवलं, ते सर्व जाळून टाकण्याची वेळ आली आहे असं दिसतंय. अमेरिकी विद्यापिठाकडून मिळालेले कुठलेले आयडी कार्ड किंवा पुरस्कार जवळ बाळगणंसुद्धा आता धोकादायक वाटतंय. जरी आम्ही ते आमच्याजवळ ठेवलं तरी त्यांचा आता काहीच उपयोग नाही. कारण आता अफगाणिस्तानमध्ये आमच्यासाठी नोकऱ्याच नाहीत."

"जेव्हा तालिबान सैन्य एकानंतर एक राज्य काबिज करत होते, तेव्हा मी माझ्या सुंदर स्वप्नांचा विचार करत होते. आईने जेव्हा त्यांच्या काळात स्त्रियांना तालिबान्यांनी दिलेल्या वागणुकीबद्दल सांगितलं तेव्हा मी आणि माझी बहीण रात्रभर झोपू शकलो नव्हतो. आम्ही पुन्हा एकदा सर्व मूलभूत अधिकारांपासून वंचित राहणार आहोत आणि २० वर्षे मागे जाणार आहोत याची अपेक्षा मी कधीच केली नव्हती. आपल्या हक्कांसाठी आणि स्वातंत्र्यासाठी २० वर्षे लढल्यानंतर आता पुन्हा एकदा आम्ही बुरखा शोधतोय आणि ओळख लपवतोय."

"गेल्या काही महिन्यांत तालिबानने विविध राज्यांवर सत्ता काबिज केल्यानंतर, अनेकजण त्यांची घरं सोडून पळून गेले. काहीजण बायकामुलांना वाचवण्यासाठी काबुलला आले. उद्यानांमध्ये, रस्त्यांवर ते लोक राहत होते. अमेरिकी विद्यापिठाच्या विद्यार्थ्यांनी पैसे आणि इतर गरजेच्या वस्तू जमा करून त्यांची मदत केली होती. या मदतकार्यात मीसुद्धा सहभागी झाले होते. त्यापैकी काही कुटुंबीयांच्या व्यथा ऐकून मला अश्रू अनावर व्हायचं. एका कुटुंबाने युद्धात त्यांच्या मुलाला गमावलं होतं. काबुलला येण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसे पैसे नव्हते. त्यामुळे त्यांनी वाहतुकीच्या खर्चाच्या बदल्यात सुनेला विकलं. एका महिलेचं मूल्य प्रवासाच्या खर्चाशी कसं कोणी ठरवू शकतं?"

आज जेव्हा तालिबान काबुलमध्ये पोहोचल्याचं ऐकलं, तेव्हा मीसुद्धा गुलाम होणार, असं मला वाटलं. ते माझ्या आयुष्याशी त्यांना हवंतसं खेळू शकतात. मी इंग्रजी भाषेच्या शिक्षण केंद्रात शिक्षक म्हणूनही काम केलंय. आता यापुढे मी त्या वर्गात उभं राहू शकत नाही, त्यांना एबीसी गाणं शिकवू शकत नाही. या सर्व विचारांनीच मला अस्वस्थ वाटू लागलंय. जेव्हा जेव्हा मला आठवतं की, माझ्या वर्गातील लहान मुलींना त्यांचं शिक्षण थांबवून घरी बसावं लागेल, त्या त्या वेळी माझ्या डोळ्यात अश्रू तरळतात."

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com