टायग्रीसच्या पात्रात अतिप्राचीन शहराचे अवशेष; कांस्य युगामध्ये मित्तानी राजवटीत शहराची उभारणी

कुर्दिस्तान भागात टायग्रीस नदीतील पाण्याची पातळी खालावल्याने तब्बल ३ हजार ४०० वर्षांपूर्वीच्या शहराचे अवशेष उघड झाले आहेत.
ancient city in Tigris river city built during Mittani dynasty in Bronze Age Baghdad
ancient city in Tigris river city built during Mittani dynasty in Bronze Age Baghdad sakal

बगदाद : वैश्विक तापमानवाढीचा सामना करणाऱ्या इराकमधील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली असून यामुळे येथील दुष्काळाची तीव्रताही वाढताना दिसून येते. कुर्दिस्तान भागात टायग्रीस नदीतील पाण्याची पातळी खालावल्याने तब्बल ३ हजार ४०० वर्षांपूर्वीच्या शहराचे अवशेष उघड झाले आहेत. उष्णतेमुळे ही नदी आटली असून त्यामुळे नदी पात्रातील कांस्य युगातील शहराचे अवशेष उघड झाले आहेत. अभ्यासकांनी देखील हे पात्र पाण्याने भरण्यापूर्वीच या अवशेषांचा बारकाईने अभ्यास करायला सुरूवात केली आहे. जर्मन आणि कुर्दीश पुरातत्त्व शास्त्रज्ञांच्या पथकाने या ठिकाणी अभ्यास करायला सुरूवात केली आहे. हे शहर मित्तानी राजवटीमध्ये साधारणपणे ख्रिस्तपूर्व १५५० ते १३५० या काळामध्ये उभारण्यात आले असावे असा संशोधकांचा अंदाज आहे.

जर्मनीतील फ्रेईबर्ग विद्यापीठातील पुरातत्त्वशास्त्रज्ञांचे पथक या ठिकाणी अभ्यास करत आहे. याबाबत प्रसिद्ध केलेल्या निवेदनामध्ये डॉ. इव्हाना पुलझिज यांनी म्हटले आहे की, ‘‘ हे शहर टायग्रीस नदीमध्ये उभारण्यात आले होते त्यामुळे मित्तानी साम्राज्यामध्ये त्याला खूप महत्त्वाचे स्थान असावे असे दिसून येते. हे साम्राज्य आताच्या ईशान्य सीरियापर्यंत पोचलेले होते. मेसोपोटामिया आणि सीरिया या दोन्ही देशांच्या दृष्टीने हे शहर महत्त्वाचे व्यापारी केंद्र होते.’’

आणखी उत्खनन करणार

या अतिप्राचीन शहराची व्याप्ती आणि त्याचा विस्तार लक्षात घेतला असता एक बाब स्पष्टपणे लक्षात येते ती म्हणजे, या ठिकाणी आणखी मोठ्या प्रमाणामध्ये अतिप्राचीन वस्तूंचे अवशेष सापडू शकतात त्यामुळे आमचा या ठिकाणी आणखी उत्खनन करण्याचा इरादा असल्याचे संशोधकांनी सांगितले. या शहरामध्ये त्याकाळी उभारण्यात आलेल्या मातीच्या भिंतींचा अभ्यास केला असता एक बाब आपल्याला स्पष्टपणे दिसून येते ती म्हणजे भूकंपाचे धक्के सहन करता येईल अशा पद्धतीने त्यांची उभारणी करण्यात आली होती. या अवशेषांचे तात्पुरते जतन करण्यासाठी त्यावर प्लॅस्टिकचे आच्छादन अंथरण्यात आले आहे, असे संशोधकांकडून सांगण्यात आले.

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com