esakal | अ‍ॅस्ट्राझेनेकाच्या लशीमुळे रक्तात गुठळ्या? ऑस्ट्रेलियानेही वापर थांबवला
sakal

बोलून बातमी शोधा

astrazeneca.

अ‍ॅस्ट्राझेनेकाची कोरोनावरील लस यापुढे ५० वर्षांखालील व्यक्तींना द्यायची नाही असा निर्णय ऑस्ट्रेलियानेही घेतलाय

अ‍ॅस्ट्राझेनेकाच्या लशीमुळे रक्तात गुठळ्या? ऑस्ट्रेलियानेही वापर थांबवला

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

सिडनी- अ‍ॅस्ट्राझेनेकाची कोरोनावरील लस यापुढे ५० वर्षांखालील व्यक्तींना द्यायची नाही असा निर्णय ऑस्ट्रेलियानेही घेतलाय. याआधी युरोप आणि इतर काही देशांनी या लसीचा वापर मर्यादित केला आहे. रक्तात गुठळ्या होण्याचे गंभीर प्रकार घडू लागल्यामुळे हा निर्णय झाला. त्यामुळे यापूर्वीच खंड पडलेल्या लसीकरणात आणखी अडथळा आला आहे, मात्र आता ५० वर्षांखालील व्यक्तींमध्ये पहिला डोस ज्यांना देण्यात आला आहे आणि ज्यांना कोणतेही दुष्परिणाम जाणवले नाहीत त्यांनाच या लसीचा दुसरा डोस दिला जाईल. ५० वर्षांवरील व्यक्तींनी मात्र ही लस घ्यावी असेही स्पष्ट करण्यात आले. पंतप्रधान स्कॉट मॉरीसन यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. अवास्तव काळजी घेण्याचा किंवा प्राथमिक माहितीवरून निष्कर्ष काढण्याचा सरकारचा पायंडा नसून प्राप्त परिस्थितीत शक्य असलेल्या सर्वोत्तम वैद्यकीय सल्ल्यानुसार योग्य काळजी घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

संसर्ग रोखला, पण लशीबाबत पिछाडी

कोरोनाचा संसर्ग रोखण्यात जगात सर्वाधिक यशस्वी ठरलेल्या देशांत ऑस्ट्रेलियाचा समावेश होतो. अडीच कोटी लोकसंख्या असलेल्या या देशात ३० हजार पेक्षा कमी रुग्ण (२९३८२) आणि एक हजारपेक्षा कमी बळी (९०९) अशी आकडेवारी आहे. सामुहिक संसर्गाचे प्रमाण जवळपास नगण्य आहे. लसीकरणात मात्र हा देश पिछाडीवर पडला आहे. गुरुवारपर्यंत केवळ दहा लाख डोस देण्यात आले होते. वास्तविक सरकारने गेल्या आठवडाअखेर ४० लाख डोस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. अॅस्ट्राझेनेकाच्या लसीचा युरोपात तुटवडा निर्माण झाल्यामुळे ऑस्ट्रेलियाला होणाऱ्या पुरवठ्यावर परिणाम झाला.

लॉकडाऊनमुळे कोरोना खरंच थांबेल? व्यापाऱ्यांचा सवाल

दरम्यान, अनेक देशांमध्ये लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली. कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण हाच एक प्रभावी मार्ग असल्याचं तज्ज्ञांकडून सांगण्यात आलं आहे. पण, अ‍ॅस्ट्राझेनेकाच्या लशीबाबत अनेक संभ्रम निर्माण झाले आहेत. लशीच्या वापरामुळे अनेकांच्या रक्तामध्ये गुठळ्या आढळून आल्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे अनेक देशांनी लशीच्या वापरावर मर्यादा आणल्या आहेत. यामुळे लसीकरण मोहीमेत अडथळा येणार असून सर्व नागरिकांपर्यंत लस पोहोचण्यास उशीर होणार आहे. 

loading image