कराचीत स्टॉक एक्स्चेंजवर हल्ला

पीटीआय
Tuesday, 30 June 2020

कराची स्टॉक एक्स्चेंजमध्ये पोलिस तैनात केले जात नाही. या ठिकाणी खासगी सुरक्षा संस्था काम पाहते. काही दिवसांपूर्वी गुप्तचर यंत्रणांनी कराचीत मोठा दहशतवादी हल्ल्याची सूचना दिली होती. 

कराची  - पाकिस्तानच्या स्टॉक एक्स्चेंज इमारतीवर आज सकाळी सशस्त्र चार दहशतवाद्यांनी हल्ला केला. हा हल्ला परतावून लावताना चार सुरक्षा कर्मचारी आणि एक पोलिस उपनिरीक्षक ठार झाले. यावेळी झालेल्या कारवाईत चारही दहशतवादी मारले गेले. जिओ टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार दहशतवाद्यांनी स्टॉक एक्स्चेंजच्या इमारतीच्या प्रवेशद्वारावर येताच बेछूट गोळीबार केला आणि हातबाँब फेकले. दरम्यान. वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा हल्ला माजिद ब्रिगेड ऑफ बलुच लिबरेशन आर्मी  या संघटनेने केल्याचे सांगितले जात आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

बाजार सुरू होताच हल्ला
कराची येथील चुंदरीगर मार्गावर पाकिस्तान स्टॉक एक्स्चेंजची इमारत आहे. स्टॉक एक्स्चेंज स्थानिक वेळेनुसार दररोज सकाळी १०.३० वाजता सुरू होतो. तो नेहमीप्रमाणे आजही सकाळी सुरू झाला. यादरम्यान पाठीवर बॅग अडकवलेले चार दहशतवादी इमारतीजवळ आले आणि त्यांनी प्रवेशद्वारावर हातबाँब फेकला. इमारतीजवळ स्फोट झाल्याने पळापळ सुरू झाली. त्याचा फायदा घेत दहशतवादी इमारतीत घुसण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना रोखले. 

ट्रेडिंग हॉलपर्यंत पोचले नाही
आज सकाळी अन्य दिवसांच्या तुलनेत कमी गर्दी होती. त्यामुळे प्राणहानी अधिक झाली नाही. कोणताच दहशतवादी इमारतीतील ट्रेडिंग हॉलपर्यंत जाऊ शकला नाही. तोपर्यंत पोलिस आणि रेंजर्स दाखल झाले आणि त्यांनी कारवाई सुरू केली. या वेळी चारही दहशतवादी मारले गेले. यादरम्यान एक पोलिस निरीक्षक आणि चार सुरक्षा कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. तसेच पाच जण जखमी झाले. परिसरातील रस्ते सील केले. कालांतराने कामकाज सुरू झाले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

पोलिस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त नाही
कराची स्टॉक एक्स्चेंजमध्ये पोलिस तैनात केले जात नाही. या ठिकाणी खासगी सुरक्षा संस्था काम पाहते. काही दिवसांपूर्वी गुप्तचर यंत्रणांनी कराचीत मोठा दहशतवादी हल्ल्याची सूचना दिली होती. असे असतानाही स्टॉक एक्स्चेंजजवळ सुरक्षा दल तैनात केले नाही. दहशतवाद्यांकडून एके-४७ रायफल्स, हातबॉम्ब, मॅगझिन आणि अन्य स्फोटक साहित्य जप्त केले. 

दहशतवाद्यांची वेशभूषा
दहशतवाद्यांनी ड्यूटीवर नसलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची वेशभूषा घातली होती. दहशतवाद्यांकडे अत्याधुनिक शस्त्रे होते आणि त्यांच्याकडे स्फोटकांनी भरलेली पिशवीदेखील होती. दहशतवादी रेल्वे ग्राउंडच्या पार्किंग क्षेत्रातून इमारतीकडे आले आणि पीएसएक्स मैदानाबाहेर गोळीबार सुरू केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Attack on Karachi Stock Exchange