Bangladesh General Election : विरोधकांच्या बहिष्काराला ‘स्मार्ट बांगलादेश’ची टक्कर; येत्या रविवारी सार्वत्रिक निवडणूक

येत्या सात जानेवारी रोजी बांगलादेशमध्ये १२ वी संसदीय निवडणूक होत असून विरोधी पक्ष बीएनपीने या निवडणुकीवर बहिष्कार घातला आहे.
Bangladesh Election
Bangladesh Electionsakal

ढाका - येत्या सात जानेवारी रोजी बांगलादेशमध्ये १२ वी संसदीय निवडणूक होत असून विरोधी पक्ष बीएनपीने या निवडणुकीवर बहिष्कार घातला आहे. ३५० सदस्यीय संसदेत ३०० सदस्य थेट मतदानातून निवडून येतात. अन्य ५० जागा महिलांसाठी राखीव असून त्या मतदानाच्या टक्केवारीच्या आधारावर नियुक्त केल्या जातात.

दरम्यान, बांगलादेश नॅशनालिस्ट पक्षाने निवडणुकीच्या विरोधात उद्या (ता. ५) देशव्यापी मोर्चाचे आयोजन केले आहे. राजकीय अराजकता संपवून उज्ज्वल भवितव्यासाठी देशातील तरुण मतदार मतदानाचा हक्क बजावतील.

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी बांगलादेशला २०४० पर्यंत ‘स्मार्ट बांगलादेश’ करण्याची हमी दिली आहे. तसेच २०३० पर्यंत देशातील दीड कोटी तरुणांना रोजगार देण्याचे आश्‍वासन दिले आहे. पंतप्रधान शेख हसीना या गेल्या चौदा वर्षांपासून सत्तेत आहेत. दुसरीकडे माजी पंतप्रधान खालिदा झिया यांच्या बीएनपीने निवडणुकीवर बहिष्कार घालण्याची घोषणा केली आहे.

बांगलादेश मुस्लिमबहुल देश असून कधीकाळी तो जगातील सर्वांत गरीब देशांपैकी एक देश म्हणून ओळखला जायचा. मात्र शेख हसीना यांच्या नेतृत्वाखाली बांगलादेशने आर्थिक आघाडीवर यश मिळवले आणि वेगाने विकसित होणाऱ्या अर्थव्यवस्थेत बांगलादेशचा समावेश झाला आहे. बांगलादेशातील नागरिकांचे उत्पन्न तीन पट वाढले आहे.

जागतिक बँकेच्या अंदाजानुसार गेल्या दोन दशकांत देशातील अडीच कोटी नागरिक दारिद्र्यरेषेबाहेर आले आहेत. जीडीपीत १.२३ टक्के वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कोरोनाचा फटका बांगलादेशच्या अर्थव्यवस्थेलाही बसला आहे. चीननंतर बांगलादेश हा जगातील सर्वांत मोठा कापड निर्यातदार देश आहे. गेल्या वर्षात बांगलादेशने ४५ अब्ज डॉलरपेक्षा अधिक मूल्याच्या कपड्यांची निर्यात केली आहे.

शेख हसीनांवरचे आरोप

बांगलादेशचा विरोधी पक्ष बांगलादेश नॅशनालिस्ट पार्टी (बीएनपी) ने सार्वत्रिक निवडणुकीवर बहिष्कार घातला आहे. पंतप्रधान शेख हसीना यांच्यावर विश्‍वास नसल्याचे बीएनपीचे म्हणणे आहे. देशात हंगामी सरकार स्थापन करत त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका घेण्याची मागणी केली आहे. मात्र शेख हसीना यांनी मागणी फेटाळून लावली. बीएनपीचे नेते अब्दुल मोईन खान यांनी आगामी निवडणूक फसवी असल्याचे म्हटले आहे.

निवडणूक प्रक्रिया

बांगलादेशात दर पाच वर्षांनी निवडणूक होते. बांगलादेशच्या संसदेत एकूण ३५० जागा असून त्यापैकी ३०० जागांवर थेट निवडणूक होते. उर्वरित ५० जागा महिलांसाठी राखीव आहेत आणि तेथे निवडणूक होत नाही. महिलांची थेट निवड केली जाते.या ५० जागा मतांच्या टक्केवारीच्या आधारावर पक्षांना दिल्या जातात.

३०० पैकी १५१ जागा जिंकणाऱ्या पक्षाला बहुमत मिळते. बांगलादेशात भारताप्रमाणेच बहुपक्षीय व्यवस्था आहे आणि दोनपेक्षा अधिक पक्ष निवडणुकीत उतरू शकतात. आवामी लीग आणि बीएनपीशिवाय जमाते इस्लामी, जातीय पार्टी, कम्युनिस्ट पार्टी देखील मैदानात आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com