esakal | ऍमेझॉन खोऱ्यात ब्राझीलचे लष्कर; वणवा विझविण्यासाठी मोहीम
sakal

बोलून बातमी शोधा

ऍमेझॉन खोऱ्यात ब्राझीलचे लष्कर; वणवा विझविण्यासाठी मोहीम

ब्राझीलमध्ये ऍमेझॉन नदीच्या खोऱ्यातील सदाहरित वनांमध्ये भडकलेल्या वणव्याचे आंतरराष्ट्रीय पातळीवर तीव्र पडसाद उमटू लागले असताना आज तेथील सरकार आणि सुरक्षा यंत्रणा खडबडून जागी झाली.

ऍमेझॉन खोऱ्यात ब्राझीलचे लष्कर; वणवा विझविण्यासाठी मोहीम

sakal_logo
By
वृत्तसंस्था

रिओ दि जानेरो : ब्राझीलमध्ये ऍमेझॉन नदीच्या खोऱ्यातील सदाहरित वनांमध्ये भडकलेल्या वणव्याचे आंतरराष्ट्रीय पातळीवर तीव्र पडसाद उमटू लागले असताना आज तेथील सरकार आणि सुरक्षा यंत्रणा खडबडून जागी झाली.

ही आग विझविण्यासाठी लष्करी विमाने आणि ब्राझीलच्या सुरक्षा दलांनी जंगलांमध्ये धाव घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. आज याच मुद्यावरून अध्यक्ष जेर बोल्सोनॅरो यांनी बचावात्मक पवित्रा घेताना याआधीच जंगलतोड करण्यात आलेल्या परिसरामध्ये ही आग भडकली होती त्यानंतर ती इतरत्र पसरल्याचा दावा त्यांनी केला. दरम्यान, या भीषण आगीचे पडसाद "जी-7' उमटण्याची शक्‍यता आहे.

हा वणवा विझविण्यासाठी 44 हजार तुकड्या ब्राझीलमधील जंगलांमध्ये पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला असून, हे जवान लवकरच सहा राज्यांमध्ये रवाना होतील, असे संरक्षणमंत्री फर्नांडो अझेवेडो यांनी सांगितले. रोरायमा, रोंडोनिया, टोकानटिन्स, पॅरा, एकर आणि मातो ग्रोसो या राज्यांना या वणव्याची मोठी झळ बसली आहे. आग विझविण्याची पहिली मोहीम रोंडोनिया राज्याची राजधानी पोर्तो व्हेल्हो येथे राबविली जाणार असून, त्यामध्ये सातशे तुकड्या सहभागी होतील. 

सी-130 हर्क्‍युलस या विमानांच्या माध्यमातून आग लागलेल्या भागांमध्ये बारा हजार लीटर पाणी टाकण्यात येईल, सध्या धुरामुळे या भागांतील दृश्‍यमानता कमी झाली असून, यामुळे लष्करालाही आग विझविताना मोठ्या आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. अमेझॉनच्या जंगलांमध्ये भडकलेल्या या आगीवरून राजकारणही तापले असून, अध्यक्ष बोल्सोनॅरो यांना टीकेला सामोरे जावे लागत आहे. ब्राझील आणि युरोपियन देशांतील संबंधही या आगीमुळे आणखी ताणले गेले आहेत. 

आंदोलनाचा भडका 
आज युरोप आणि लॅटिन अमेरिकी शहरांमधील ब्राझीलच्या उच्चायुक्तालयांसमोर पर्यावरणवादी संघटनांनी आंदोलन केले तसेच ब्राझीलमध्ये अनेक ठिकाणांवर मोर्चे काढण्यात आले होते. मेक्‍सिको सिटीतील ब्राझीलच्या दूतावासासमोर आज ठळक संदेश लावण्यात आला होता, त्यामध्ये पृथ्वीचे फुफ्फुस जळत असून, चला त्याला वाचवू या, असे म्हटले आहे. 

ऍमेझॉनच्या जंगलांतील ही आग अर्थकारणातही पोचली असून, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्यूएल मॅक्रोन यांनी याच मुद्यावरून ब्राझील आणि युरोपियन युनियन व दक्षिण अमेरिकी देशांमध्ये झालेल्या करारांमध्ये अडथळे आणण्याची धमकी दिली आहे. जर्मनीच्या चॅन्सलर अँजेला मर्केल यांनीही शनिवारी प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओ संदेशामध्ये सात देशांचा समूह यावर गप्प राहू शकत नाही, असे म्हटले आहे. 

ऍमेझॉन नदीच्या खोऱ्यामध्ये भडकलेल्या आगीमुळे आम्ही चिंतित आहोत, हे जंगलांचे फुफ्फुस पृथ्वीसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. - पोप फ्रान्सिस 

loading image
go to top